बीज अंकुरे अंकुरे
मुंबई दूरदर्शनवर १९८५ नंतरचा काळ हा मालिका क्षेत्रात क्रांती करणारा ठरला. अनेक दर्जेदार मालिकांची निर्मिती त्या काळात झाली होती. तेव्हा अशी पद्धत होती की एखाद्या मालिकेसाठी प्रथम एक भाग पायलट एपिसोड म्हणून चित्रित करून दिला जायचा. मग तो भाग आवडला तर मग तेरा भागांची साप्ताहिक मालिका सादर करण्याची परवानगी मिळायची.
एकदा दिग्दर्शक राजदत्त यांनी संगीतकार अशोक पत्की यांना फोन केला आणि सकाळी अकरा वाजता त्यांची भेट ठरली. राजदत्त म्हणाले की दूरदर्शनसाठी एक मालिका करत आहोत. ‘गोट्या’ हे त्या मालिकेचे नाव होते. ना धों ताम्हनकर यांच्या साहित्यकृतीवर आधारित ही मालिका होती. अशोक पत्की यांनी राजदत्त यांना मालिकेचे कथानक विचारले. आई वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या आजी आणि काकांकडे राहायला आलेला हा ‘गोट्या’ नावाचा मुलगा. त्या मुलाच्या आयुष्यावर ही मालिका होती.
हे ही वाचा: निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई! या अंगाई मागचा हा किस्सा तुम्हाला माहीत आहे का?
राजदत्त यांनी कवी मधुकर आरकडे यांनी लिहिलेले एक गीत अशोक पत्की यांच्यापुढे ठेवले. गीताचे शब्द काय आहेत, त्या मालिकेचा आशय काय आहे हे लक्षात घेणे आवश्यक असतं. अशोक पत्की यांनी ते शब्द वाचले. आणि अवघ्या पाच ते सात मिनिटात अशोक पत्की राजदत्त यांना म्हणाले,”मी तुम्हाला एक चाल ऐकवू का? “राजदत्त म्हणाले,” अजून पेटीला तुम्ही हात लावला नाही आणि चाल तयार झाली? “अशोक पत्की म्हणाले,” हे शब्द वाचताच माझ्या मनात एक चाल तयार झाली, ती चाल तुम्हाला ऐकवतो’’ ती चाल राजदत्त यांना खूप आवडली.
अरुण इंगळे यांच्या स्वरात अशोक पत्की यांनी संगीतबद्द केलेले ‘गोट्या’ मालिकेचे शीर्षकगीत ध्वनीमुद्रित झाले. गीताचे शब्द होते,
“बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात
बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर
लक्ख प्रकाश निर्मळ, त्यात कष्टाचा पाझर
हवी अंधारल्या राती, चंद्रकिरणांची साथ
कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात”
या शीर्षकगीताचे चित्रीकरण बघताना लक्षात येईल की ‘गोट्या’ हा मुलगा आपल्या काकांकडे येतो, हा प्रवास यात चित्रित केला आहे. जॉय घाणेकर याने ‘गोट्या’ ची भूमिका केली होती.
‘बीज अंकुरे अंकुरे’ च्या शीर्षकगीतात एकच कडवे वापरले आहे, मात्र मुळात ही कविता तीन कडव्यांची असून सातवीच्या मराठीच्या पाठयपुस्तकात ती मुलांना अभ्यासाला देखील ठेवण्यात आली होती. ‘गोट्या’ या मालिकेच्या शीर्षकगीतापासून मालिकांच्या जगात शीर्षकगीत हा गीतप्रकार लोकप्रिय होत गेला.