कुठल्याही भूमिका ‘सजीव’ करणारा ‘संजीव’
आपल्या अभिनयाच्या जोरावर दीड दशक रसिकांच्या हृदयावर साम्राज्य गाजविणारा कलाकार म्हणजे संजीव कुमार. वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेल्या या कलाकाराने तब्बल १४ वेळा फिल्म फेयर चे नामांकन मिळविले होते. त्याच्या अभिनयात जबरदस्त वैविध्यता होती. दस्तक, कोशिश, परिचय सारखे इमोशनल सिनेमे असो, अंगूर, बिवी ओ बिवी, स्वर्ग नरक सारखे विनोदी सिनेमे असो शोले, त्रिशूल, इमान धरम सारखे मल्टी स्टारर सिनेमे असो किंवा मनचली, सीता और गीता, अनामिका सारखे रोमांटिक सिनेमे असो संजीवकुमार कुठेच मिस फीट वाटला नाही. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या सुपरस्टार पदाच्या कालावधीत संजीव ने आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या अभिनयाच्या जोरावर आपला वेगळा क्लास निर्माण केला. अर्थात या साठी त्याने अथक परिश्रम घेतले. सुरुवातीची सात-आठ वर्षे सी ग्रेड सिनेमातून काम करून त्याने हळू हळू आपल्या अस्तित्वाची/ अभिनयाची दखल घ्यायला लावली. ‘कुठल्याही भूमिका सजीव करणारा संजीव’ अशी त्याची ख्याती होती. सत्तरच्या दशकात त्याने सत्यजित रे यांच्या ‘शतरंज के खिलाडी ‘या सिनेमात त्यांनी मिर्झा सज्जद अली मोठ्या ताकतीने रंगवला होता. के असिफ यांचा अर्धवट राहिलेल्या ‘love and god’ या चित्रपटाचा नायक देखील तोच होता. हा सिनेमा तब्बल २५ वर्षे निर्मिती अवस्थेत होता आणि १९८६ साली प्रदर्शित झाला. ‘नया दिन नयी रात’ या चित्रपटात नवरसावर आधारीत नऊ वेगवेगळ्या भूमिका करून एक नवा कीर्तिमान स्थापित केला. (वस्तुत: हा सिनेमा या पूर्वी तमिळ आणि तेलगु मध्ये शिवाजी गणेशन आणि ए नागेश्वरराव यांनी केल्या होत्या.)
संजीवकुमार यांची कारकीर्द ऋषिकेश मुखर्जी आणि गुलजार या दोन मातब्बर दिग्दर्शका सोबत चांगली बहरली. ऋषीदा सोबत ‘सत्यकाम’ आणि ‘आशीर्वाद’ हे त्याचे साठच्या दशकातील सिनेमे त्याच्यातील अभिनयाला घडविण्यासाठी पूरक ठरले. सत्तरच्या दशकाच्या मध्यावर आलेल्या ‘आलाप’ आणि ‘अर्जुन पंडीत’ या सिनेमाला भले ही व्यावसायिक यश मिळाले नसले तरी समीक्षकानी त्यावर पसंतीची मोहर उमटवली तसेच फिल्म फेयर देखील मिळाले. गुलजार यांचा संजीव कुमार हा लाडका अभिनेता होता. परिचय, कोशिश, आंधी, नमकीन आणि मौसम हे त्यांचे गुलजार दिग्दर्शित चित्रपट संजीव कुमार च्या कलाजीवनातीलच नव्हे तर भारतीय सिनेमाच्या इतिहासातील महत्वाचे चित्रपट ठरले! ‘आंधी’ मधील संजीव चा अभिनय लाजवाब होता. १९७० साली राजिंदर सिंग बेदी यांच्या ‘दस्तक’ या चित्रपटातील संजीवकुमारच्या भूमिकेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. गुलशन नंदा यांच्या ‘पत्थर के होठ ‘ या कादंबरी वरील ‘खिलौना’ हा चित्रपट संजीव च्या भूमिकेकारेता आठवावा लागेल. या भूमिकेला देखील पारितोषिक मिळाले.अमिताभ बच्चन यांच्या सोबतच्या शोले, इमान धरम, त्रिशूल, खुद्दार, काला पत्थर आणि सिलसिला मधील त्यांच्या भूमिका आणि अमिताभला त्यांनी दिलेली टक्कर प्रेक्षकांच्या अजून लक्षात आहे. दिलीपकुमार सोबतचा विधाता मधील त्यांनी रंगवलेला अबू बाबा भाव खाऊन गेला. ‘शोले’ मधील त्यांनी रंगवलेला ठाकूर हा लार्जर दान लाईफ असा होता. खरं तर हि भूमिका आधी धर्मेंद्र ला ऑफर झाली होती पण नंतर संजीव – हेमा हि होणारी पेयर धरमला धोक्याची वाटली आणि भूमिकांची अदलाबदल झाली. शोले तील ठाकूर प्रमाणेच ‘जानी दुश्मन’ मधील त्याने रंगवलेला ठाकूर टेरर होता. बासु भट्टाचार्य यांच्या ‘अनुभव’ आणि ‘गृहप्रवेश’ या क्लास सिनेमातील संजीव कुमारच्या भूमिका खूपच सराहनीय अशा होत्या.
विनोदी चित्रपटांची जेंव्हा चर्चा होते त्यात ‘अंगूर’चा विषय अपरिहार्य असतो. शेक्सपियर च्या ‘कॉमेडी ऑफ एरर’ वरील या सिनेमात संजीव कुमार आणि देवेन वर्मा यांच्या डबल रोल ने मजा आणली. संजीव चा ह्युमर सेन्स जबरा होता. ‘पती पत्नी और वो’ तसेच ‘बीवी ओ बीवी’ मधील भूमिका पाहताना याचे प्रत्यंतर येते.तरुण वयात वयस्कर भूमिका करण्यात त्याचा हातखंडा होता. जुन्या काळातील नूतन, माला सिन्हा सोबत त्यांनी नायकाचा रोल केला होता. प्रत्येक जॉनरचे चित्रपट त्यांनी केले.