
पुलं भाषण विसरतात तेव्हा
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु.लं.देशपांडे. यांचा जन्मदिवस साजरा करताना सबकुछ पुलं आठवत राहतात. लेखक, नाटककार, संगीतकार, अभिनेता अशा अनेकविध भूमिका पुलंनी बहारदार निभावल्या. पुलंच्या जन्मदिनी आठवुया त्यांचा बालपणीचा काळ सुखाचा.
पुलंचा जन्म मुंबईतील गावदेवी भागातल्या किर्पाळ हेमराजच्या चाळीत झाला. पुलं आठ वर्षांचे होईपर्यंत त्यांचं बालपण जोगेश्वरीमधल्या ‘सरस्वतीबाग’ मध्ये गेलं. लेखनाचा वारसा पुलंना त्यांच्या आईच्या वडिलांकडून आजोबांकडून लाभला. ‘ऋग्वेदी’ या नावाने त्यांचे आजोबा लिखाण करत. पुलंना सूरांची आवड लहानपणापासूनच जडली होती. त्यांच्या आईचा गळा सुरेल होता.
पुलंचा ओढा पहिल्यापासूनच कलेकडे अधिक होता. सोसायटीत कीर्तन झालं की दुसऱ्या दिवशी घरात पुलंचं कीर्तन उभं राही. पहिली दुसरीत असताना शाहीर खाडीलकरांचे पोवाडे ऐकल्यावर घरातल्या सुपाचा डफ करुन पुलंचा पोवाडा सुरू होई. वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षी पुलंनी पहिले वहिले भाषण केले. आजोबांनी लिहून दिलेले वीर अभिमन्यूवरचे ते भाषण पुलंनी घडाघडा म्हटलं. पण शेवट विसरले. लगेच प्रसंगावधान राखून “असो, आता माझी दूध प्यायची वेळ झाली” असं म्हणून छोट्या पुलंनी वेळ मारुन नेली.
हे हि वाचा: पु लंच्या सिग्नेचर ट्यूनबद्दल ही बात आहे खास
या सगळ्या गंमतीजंमतीत पुलंच्या घरच्यांनी त्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले. नाटक, संगीत, अवांतर पुस्तकांचे वाचन त्यांना कधीच चोरुन करावं लागलं नाही. वयाच्या नवव्या दहाव्या वर्षी पुलं नकला, पोवाडे, भाषण, पेटीवादन करत. ‘ध्रुववीर’ नामक छोट्या मुलांच्या मेळ्यात गाणी म्हणणं, प्रहसन सादर करणं हे सगळं पुलंनी आनंदाने केलं. पुलंच्या घरातील मंडळी या नानाविध कलांचे पहिले प्रेक्षक होते. पुलंचे वडील गाण्यांचे फार शौकीन होते. पुलंच्या घरच्या ओसरीवर रोज संध्याकाळी गाण्यांचा अड्डा असायचा. “परीक्षा दरवर्षीच येते. म्हणून गाणं चुकवायचं की काय?” असं म्हणणारे वडील पुलंना लाभले होते. त्याकाळाचा विचार करता तर ते खासंच ह औऔगाण्याला जाऊ का? अशी परवानगी कधी पुलंना मागावी लागली नाही. गाण्याला जातोsss अशी घोषणा करुन बिनधास्त जाणं व्हायचं.
पुलंच्या वडिलांची फिरतीची नोकरी होती. प्रवास संपवून घरी येताना ते मुलांसाठी खाऊ आणि पुस्तकं घेऊन येत. अशाच एका प्रवासावरुन परतत असताना वडिलांचा मुक्काम पुण्यात होता. तिथून मेहंदळ्यांच्या दुकानातून त्यांनी पुलंना बाजाची पेटी आणून त्या काळात मुलासाठी २२ रुपयांची पेटी घेऊन देणेही खास आणि वेगळे होते. सुरुवातीला स्वत:च धडपड करुन कोणतंही रीतसर शिक्षण नसताना पुलं पेटी वाजवायला शिकले. आई वडिलांकडून या सा-या कलागुणांना प्रोत्साहन असल्याने लहानपणी कधी मार खायची वेळ पुलंवर आली नाही.

असा हा बालपणीचा काळ सुखाचा अनुभवत १९३५-३६ साली मॅट्रीकच्या वर्गात असताना ‘खुणेची शिट्टी’ ही पुलंची गोष्ट मनोहर मासिकात छापून आली होती. ती गोष्ट नंतर काही वर्षांनी परत वाचनात आल्यावर पुलंची टिप्पणी होती, “या मासिकाचे संपादक शं.वा.किर्लोस्कर यांनी ही विनोदी (?) गोष्ट केवळ भूतदयेपोटी स्वीकारुन छापली असावी असं वाटतं.” गंमत म्हणजे त्याआधी पुलंनी एका मासिकात पाठवलेला कारवारच्या प्रवासाचं वर्णन करणारा लेख साभार परत आला होता. त्यामुळे लेखन हे आपले क्षेत्र नसून गाणं बजावणं अभिनय ह्या क्षेत्रातच आपण रमलं पाहिजे अशी बालवयात पुलंची धारणा झाली; जी भविष्यात अर्थातच खोटी ठरली.
पुलंच्या विनोदी लेखनाने सा-या महाराष्ट्राला खळखळून हसवलं पण त्याची पाळेमुळे आपल्या आजोळी होती हे पुलंनी अनेकदा सांगितलेलं दिसतं. पुलंच्या आजीचा स्वभाव अतिशय विनोदी होता. आजी उत्तम टोपणनावं ठेवत असे. रोज संध्याकाळी कुणाला ना कुणाला जेवायला घेऊन येणा-या पुलंच्या आजोबांना ती “जगन्मित्र नागा” म्हणे. कुणा बाईचं वजन वाढलं की ‘खूपच कापूस पिंजलाय’ ही तिची स्वत:ची सांकेतिक भाषा होती. बालवयात आजीला अनुभवताना त्याच निखळ विनोदाचे संस्कार पुलंवरही झाले.
एकूणच या समृद्ध बालपणाने पुलंचे पाय पाळण्यात दिसले आणि संपूर्ण महाराष्ट्र भूमीला आपल्या विविध कलांनी वेड लावणारा एक अवलिया पुलंच्या रुपात महाराष्ट्राला लाभला.