‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘शान’ ने गाठली चाळीशी !
यशाचं सातत्य भल्याभल्यांना टिकवता येत नाही. रमेश सिप्पी यांच्या ‘शोले’ ने ‘न भूतो न भविष्यती’ असे दैदिप्य मान यश मिळवले. या अतिभव्य यशाच्या नंतर त्यांनी ‘शान’ हा सिनेमा बनविला. हा सिनेमा बनवताना त्यांना कायम प्रेक्षकांच्या अपेक्षांचे ओझे होते कारण तुलना थेट ‘शोले’ सोबत होणार होती. ‘शान’ बनविताना त्यांनी कुठे ही काही ही उणीव राहणार नाही याची पुरे पूर काळजी घेतली. स्टार कास्ट, संगीत, नेपथ्य, लोकेशन्स, तंत्रज्ञान, चित्रीकरण सारे कसे काळाच्या पुढचेच काचक होते. अगदी दृष्ट लागावा असा हा सिनेमा बनला होता. पण प्रेक्षकांच्या डोळ्यातील शोलेची धुंदी अद्याप उतरली नव्हती. ते फ्रेम टूफ्रेम शोले सोबत शानची तुलना करीत राहिले. प्रेक्षकच कशाला समीक्षकांनी देखील ‘शान’ चा स्वतंत्र सिनेमा म्हणून विचार केलाच नाही आणि ‘शान’ ला ‘शोले’ ची ‘शान’ नाही असे मथळे देत सिनेमाला झोडपले.
हे सर्व आज आठवण्याचे कारण म्हणजे १२ डिसेंबर १९८० साली ‘शान’ प्रदर्शित झाला होता या घटनेला आज चाळीस वर्षे पूर्ण होत आहेत. किमान आज तरी आपण तटस्थपणे या सिनेमाचा स्वतंत्रपणे विचार करू शकतो का? तसं बघितलं तर या सिनेमातील स्टंटस हॉलीवूडच्या सिनेमाला साजेसे होते. हिंदी सिनेमाच्या व्हीलनचा कंप्लीट मेकओव्हर इथे दिसला. हा सिनेमा जेम्स बॉंडच्या सिनेमा सारखाच कचकीत लोकेशन्स व भव्य सेट्सवर चित्रीत झाला होता. यातील पूर्ण पणे टक्कल असलेला खलनायक इयान फ्लेमिंगच्या ‘ब्लोफ्लेड’ या सुपर व्हीलन सारखा होता. शाकालचा सेट हे या सिनेमाचे मोठे आकर्षण होते. या सिनेमाचे काही चित्रण स्टीप होम या बेटावर केले. (शाकालच्या अड्ड्याचा बाह्य भाग) या सिनेमातील मुख्य शक्तीस्थाने पहा.
कलाकारांची निवड बिनचूक होती. अमिताभ, शशी, सुनील दत्त, राखी, परवीन बाबी, मजहर खान, आणि कुलभूषण खरबंदा नाव ठेवायला कुठेच वाव नाही. सिनेमाचे संगीत पंचमचे होते. (त्याला फिल्म फेअरचे नामांकन मिळाले होते). आधुनिक तंत्र, ट्रीक सीन्स, फाईट सीन्सयांची रेलचेल होती. कॉमेडीसाठी जॉनी वॉकर होता. डोळे दिपवणारा झगमगाट होता. अमिताभची मगरीशी झुंज, सुनील दत्तचा रानटी कुत्र्यांनी केलेला पाठलाग, सिनेमाच्या सुरूवातीचे आगीचे दृष्य सारं काही नवीन होतं. मग नेमकं बिघडलं कुठे?
एकतर सरळ सरळ शोले सोबतची तुलना, शोलेचा न उतरलेला हॅंगओव्हर, अमिताभ – शशीचा सिनेमाच्या पूर्वार्धातील टाईमपास, आणि मूळातच हे सूड नाट्य अपील न होणं ही प्रमुख कारणं सांगितली गेली. यातील गाणी शोलेतील गाण्यांपेक्षा जास्त गाजली. यातील टायटल्स अनोख्या रीतीने दाखवली होती. उषा उथप यांनी गायलेलं ’दोस्तो से प्यार किया दुश्मनो से बदला लिया’ गाणं जबरदस्त होतं. शिवाय ’यम्मा यम्मा’, ’प्यार करनेवाले प्यार करते है शान से’, ‘नाम अब्दुल है मेरा’, ’जानु मेरी जान’ गाणी सिनेमात फिट बसली होती. शाकाल अर्थात कुलभूषण खरबंदा याची डॉयलॉग डिलीव्हरी एक डोळा बारीक करून बोलणं त्याच्या व्यक्तीरेखेला साजेसे होते. शॉटगन शत्रुघ्न सिन्हाची बुलंद संवाद फेक जमून आली होती. सर्व व्यवस्थित असताना, कंप्लीट इंटरटेन्टमेन्ट पॅकेज असताना देखील ’आहे मनो हर तरी…’ चा अनुभव आला!
कदाचित ‘शान‘ हा सिनेमा शोलेच्या आधी बनला असता तर नक्कीच हिट झाला असता. पण एक गोष्ट नक्की हा सिनेमा रिपीट रनला चांगला धंदा करून गेला!