दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
घाशीराम कोतवाल या नाटकाला ‘आंतरराष्ट्रीय महोत्सवात’ पाठवण्यासाठी झाला होता विरोध कारण…
रंगभूमीवर नाटकांचे प्रयोग होत असतात. पण काही नाटकं आपल्या शैलीने,सादरीकरणाने नाटककला पुढे नेतात. मराठी रंगभूमीला अशाप्रकारे पुढे नेणारं नाटक म्हणजे घाशीराम कोतवाल. विजय तेंडुलकर लिखीत या नाटकाचं दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल, नृत्य दिग्दर्शन कृष्णदेव मुळगुंद तर संगीत दिग्दर्शन भास्कर चंदावरकर यांनी केलं होतं. प्रोग्रेसिव्ह ड्रामाटिक असोसिएशनने १६ डिसेंबर १९७२ साली या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. आणि मराठी रंगभूमीवर एक नवं पर्व सुरू झालं.
मोहन आगाशे, रमेश टिळेकर, स्वरुपा नारके, मोहन गोखले, सुरेश बसाळे, रमेश मेढेकर, नंदू पोळ, आनंद मोडक, उदय लागू, चंद्रकांत काळे, रवीन्द्र साठे, सुषमा जगताप, अशोक गायकवाड, श्रीकांत राजपाठक, भोंडे अशा तगड्या कलाकारांची फौजच या नाटकाच्या दिमतीला होती. संध्याकाळी साडे-सहा ते रात्री दोन-अडीच अशी अखंड तालीम जवळ जवळ तीन-साडेतीन महिने सुरू होती.
नाटकाच्या रचनेत वेगळेपण होतं. नृत्य, संगीत यांचा उचित मेळ होता. रंगमंचावर एका रांगेत तालात झुलणारे कलाकार जणू एक मानवी पडदाच उभा करत. आणि त्यातून नाट्य उभं राही. हा अभिनव प्रयोग होता. नाटक अनोखं असलं तरी या नाटकालाही वादग्रस्ततेची झालर लागली.
घाशीराम कोतवाल नाटकाला बर्लिनच्या आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवाचं निमंत्रण आलं. दरम्यान, कोणीतरी आक्षेप घेतला की या नाटकामुळे नानासाहेब फडणीस यांची बदनामी होईल. खरे तर नाटककार विजय तेंडूलकर यांनी नाटकाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केलं होतं की, “हे नाटक ऐतिहासिक नाही. ही केवळ एक नृत्य संगीतमय दंतकथा आहे. कोणाला पेशवाई अथवा इतर काही संदर्भ शोधायचे असतील, तर संबंधीतांनी इतर ठिकाणी शोधा.” तरीही नाटकाला विरोध झाला.
इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळातील तत्कालीन आयएमडी मंत्री वसंत साठे यांनी त्यावेळी एक विधान केलं. ते म्हणाले, “घाशीराम कोतवाल हे नाटक बर्लिनला पाठवणे म्हणजे देशाची प्रतिमा मलीन होण्यासारखं आहे.” या वादावर तोडगा म्हणून विविध विषयांत प्रचंड काम केलेल्या कमलादेवी चट्टोपाध्याय, पुपूला जयकर, कपीला वात्सायन या तिघींची समिती नेमण्यात आली. त्यांनी नाटकाबद्दल अनुकूल मत दिलं आणि घाशीराम बर्लीनला जाणार यावर शिक्कामोर्तब झालं.
बर्लिन गाठण्यासाठी मुंबईपर्यंत ही मंडळी कारने जाणार होती आणि तिथून पुढे विमानाने बर्लीनचा प्रवास होणार होता. दरम्यान नाटक बर्लिन येथे सादर होऊ नये म्हणून दिग्दर्शक जब्बार पटेल, मुख्य कलाकार मोहन आगाशे, रमेश टिळेकर यांना पळवून नेणार अशी आवई उठली. या तणावग्रस्त वातावरणात राजकीय नेते शरद पवार यांनी नाटकाची पाठराखण केली. त्यांनी पुणे मुंबई विमानाची २५ तिकीटं जब्बार पटेल आणि मोहन आगाशे यांच्या हाती ठेवली. आणि अक्षरशः घरच्यांनाही न कळवता नाटकातील कलाकारांनी पुणे-मुंबई आणि मुंबई-बर्लीन असा विमानप्रवास करत बर्लिन गाठलं. तिथं या नाटकाची प्रचंड वाहवा झाली.
================
हे देखील वाचा: रंगभूमी गाजवलेलं सदाबहार नाटक ‘मोरूची मावशी’ ह्याचे काही रंगतदार किस्से तुमच्यासाठी
वंदना गुप्ते यांच्या रंगभूमीवरील एंट्रीची ही धमाल गोष्ट!
================
त्यानंतर भारतात परतलेल्या घाशीरामचं चक्क रेड कार्पेट वर स्वागत झालं. जगभरातील नाट्यरसिकांनी ‘घाशीराम कोतवाल’ला उत्तम प्रतिसाद दिल्यावर भारतात नाटक तुफान गाजलं. जगभरातील विविध नाट्यमहोत्सवांत घाशीराम सादर झालं. लंडन येथील हॅमरस्मिथमध्ये रिव्हरसाइड स्टुडिओ या नाट्यगृहात सलग आठ दिवस घाशीरामचे प्रयोग झाले. विविध वृत्तपत्रांचे नाट्यसमीक्षक पहिल्या दिवशीच समीक्षणासाठी हजर होते. सुप्रसिद्ध ‘गार्डीयन’ वृत्तपत्राने ‘नो पन इंटेंडेड’ (कोणत्याही टीकेशिवाय या अर्थाने) असं या नाटकाचं समीक्षण केलं होतं.
घाशीराम कोतवाल हे मराठी नाट्यसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेलं नाटक आहे. या नाटकाने खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमीची नाळ जागतिक रंगभूमीशी जोडली.