सुकन्या पाचवीपर्यंत अभिनयापासून का राहिल्या लांब? त्यांनीच सांगितलं,’हे’ कारण
आज जी अभिनेत्री तिच्या नाटकातील एक से एक संवादासाठी ओळखली जाते, ज्या अभिनेत्रीने अनेक मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांची पसंती मिळवली ती अभिनेत्री अभिनयाची आवड असूनही वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत नाटकापासून लांब राहिली हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. ही उत्सुकता निर्माण झाली असेल की अशी कोणती अभिनेत्री आहे जिला नाटकात काम करण्याऐवजी नृत्यातून रंगमंचावर पहिले पाऊल टाकावे लागले?
ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी -मोने यांच्या आयुष्यातला हा खूप महत्त्वाचा आठवणीचा कप्पा आहे. पाचवीत असेपर्यंत सुकन्या या बोबडे बोलायच्या आणि त्यामुळेच त्यांना नाटकातील संवाद शुद्ध बोलता यायचे नाहीत. हेच कारण होतं, त्या दहाव्या वर्षापर्यंत नाटकापासून लांब राहण्याचे.
हे वाचलंत का: बॅकस्टेज आर्टिस्ट ते सुपरस्टार “लक्ष्या” चा लक्षात राहणारा प्रवास…
सुकन्या यांचे बालपण मुंबईतल्या दादर मध्ये गेले. दादरमध्ये त्यांच्या लहानपणी चाळ होती आणि चाळींमध्ये वेगवेगळे उत्सव साजरे व्हायचे. हे उत्सव म्हणजेच आजच्या प्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांच्या विविध कलागुणांना वाव देणारा तो रंगमंच होता. त्याकाळात दादरमध्ये सुकन्या कुलकर्णी ज्या चाळीमध्ये राहत होत्या त्या चाळीमध्ये दरवर्षी गणेशोत्सव आणि दीपोत्सव साजरा व्हायचा. दीपोत्सवमध्ये तर चाळीतल्या प्रत्येकाने काही ना काही कला सादर करायची असा अलिखित नियमच होता. सुकन्या यांना असलेली अभिनयाची आवड तसेच नृत्याची आवड यामुळे दीपोत्सवातील कार्यक्रमाच्या निमित्ताने कला सादर करण्याची संधी मिळायची पण या कलागुणांच्या मंचावर सुकन्या यांना नाटक सादर करता येत नव्हतं.
सुकन्या सांगतात, वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत मी बोबडी बोलायचे. पाचवीत असेपर्यंत मला शुद्ध उच्चार करता येत नव्हते. त्यामुळे नाटकातील संवाद मी जर बोबड्या शब्दांमध्ये बोलले तर ते प्रेक्षकांना समजणारच नाही अशी माझी अवस्था होती. त्यामुळेच आमच्या चाळीमध्ये कितीही नाटक करण्याची हौस मला असली तरी नाटकातील संवादच म्हणता यायचे नाहीत. म्हणूनच माझ्या मोठ्या बहिणीने माझ्यातल्या नृत्यकलेला वाव द्यायचं ठरवलं आणि मी शास्त्रीय नृत्य शिकले. माझ्या बोबडेपणावर उपचार म्हणून आईने मला आयुर्वेदिक औषध दिले आणि सहावीत गेल्यानंतर माझे शब्दोच्चार सुधरायला लागले.
हे देखील वाचा: यासाठी स्मिता पाटील यांनी उंबरठा ओलांडला…
त्यानंतर सातवीत असताना मी एक नृत्यनाटिका केली जी देवदासींच्या आयुष्यावर आधारित होती. त्या नृत्यनाटिकेमध्ये मला देवदासींची भाषा बोलायची होती. ती थोडीशी सातारी लहेजा आणि शिवराळ भाषा असल्यामुळे अभिनेते सयाजी शिंदे आम्हाला त्या देवदासींची भाषा कशी असते हे शिकवायला यायचे. त्या नाटकाच्या निमित्ताने माझं भाषेवरचे प्रभुत्व वाढत गेलं आणि आज मी ज्या क्षेत्रात काम करत आहे त्या अभिनयाच्या क्षेत्रांमध्ये सगळ्यात महत्त्वाची असलेली भाषाशैली, संवादफेक याचे कुठेतरी बाळकडू मला त्या नृत्यनाटिकेच्या निमित्ताने मिळाले.
अजून एक आठवण सांगताना सुकन्या म्हणाल्या, जन्म गाठ हे नाटक करत असताना त्यातील उमा या व्यक्तिरेखेला चक्कर आल्याचे दृश्य आहे आणि ती चक्कर आल्यानंतर तिच्या सहकारी सहकलाकार तिला धरतात असं दृश्य नाटकात होतं. मात्र एका प्रयोगाला मला चक्कर येताच मी खाली कोसळले मात्र माझ्या सहकलाकार मला धरायचं विसरल्या आणि त्यामुळे मी डोक्यावर पडले त्यानंतर माझ्या मेंदूमध्ये एक गॅप निर्माण झाली त्यामुळे मला पुढे बरेच दिवस डोळ्यावर अंधारी येत होती. चक्कर येत होती. काही दिवसांसाठी मी आंधळी झाले होते. मात्र उपचारानंतर मी पुन्हा एकदा अभिनय करायला सुरुवात केली. तो माझ्या आयुष्यातला अपघात मी कधीच विसरू शकणार नाही.
त्यानंतर पुन्हा एका मालिकेच्या शूटिंगच्या निमित्ताने मी सेटवर असताना जोराचं वादळ आलं आणि तेव्हा सेटवर लावलेला एक सिरामिकचा खांब माझ्या अंगावर पडला त्या अपघातानंतर माझ्या शरीराची एक बाजू लुळी पडली. त्या काळात आईने माझी खूप सेवा केली पण त्या अपघातांनी आयुष्यामध्ये फार खचून गेले होते. आता मी काहीच काम करू शकणार नाही, पुन्हा रंगमंचावर उभी राहू शकणार नाही, नाटकातील संवाद म्हणू शकणार नाही असं अशी माझी परिस्थिती होती. मात्र त्या काळात आईने मला पुन्हा तोच आत्मविश्वास दिला जो मी वयाच्या दहाव्या वर्षी बोबडी बोलत असताना, तुला संवाद म्हणता येणार नाही तर ठीक आहे पण तू डान्स करू शकतेस तर तू डान्स करण्यासाठी का असेना रंगमंचावर जा असं बोलून तिने मला बळ दिलं होतं.
हे वाचलंत का: मराठी रंगभूमीला जागतिक रंगभूमीशी जोडणारा घाशीराम कोतवाल.
माझ्या आयुष्यातील एका मोठ्या अपघातानंतर देखील आईने मला तसंच बळ दिलं. मी आता तुझी सेवा करणार नाही, तुला जर खरंच आयुष्यात काही करायचं असेल तर तुला काम केलं पाहिजे असे आई म्हणाली होती. त्यावेळेला मला अजिबात आत्मविश्वास नव्हता. संवाद पाठ करू शकेन की नाही याच्याबद्दल मला खात्री नव्हती. मात्र या सगळ्यावर मात करून मी पुन्हा एकदा उभी राहिले. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत शुद्ध बोलायलाही न येणारी मी आयुष्यातील दोन अपघात पचवून इथपर्यंत आले.
कोरोना काळात अनेक कलाकारांनी हातात काम नाही किंवा हातातलं काम गेलं म्हणून अत्यंत टोकाचे निर्णय घेतले, त्या वेळेला असं वाटलं कि आपल्या आयुष्यामध्ये कितीतरी अशा गोष्टी घडून गेल्या तेव्हा हे सगळं संपवून टाकावं अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण जर आपल्या कलेवर विश्वास असेल तर आयुष्यात कुठलीही गोष्ट अवघड नसते हे मला माझ्या आयुष्याने दाखवून दिले असेही सुकन्या सांगतात.
-अनुराधा कदम