दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
दीनानाथ अभिषेकींचं मा. दीनानाथ मंगेशकर असं नामकरण कसं झालं?
‘मंगेशकर’ हे आडनाव आज त्रिखंडात प्रसिद्ध आहे. पण त्यांचं मूळ घराणं हर्डीकरांचं. लुटारु पोर्तुगीज आणि इस्लामपासून आपल्या देवस्थानांचं रक्षण करण्यासाठी स्वत:च्या रक्ताचा अभिषेक केला म्हणून ते ‘अभिषेकी’ नावानं ओळखलं जाऊ लागलं. अशा अभिषेकी घराण्यातील गणेशभट्ट आणि येसुबाईंचे सुपुत्र म्हणजे दीनानाथ. गणेशभट्टांच्या वक्तृत्वकलेचा लौकिक मोठा होता. मायक्रोफोनशिवायही त्यांचा आवाज दूरवर इतका स्पष्ट येई की तो आवाज ऐकून त्यांचं आख्यान ऐकायला मंदिरात गर्दी उसळे. त्यांच्या पत्नी येसुबाई उत्सवात गात.
अशा मात्यापित्यांच्या पोटी जन्मलेले दीनानाथ गोट्या खेळताना किंवा तलावात डुंबताना जे गुणगुणत तेही सुरेल आहे हे त्यांच्या आईनं ओळखलं. सारंगी सारखं वाद्य मुलाला शिकवलं तर आयुष्यभर त्याला ददात राहणार नाही हे ओळखून त्यांनी दीनानाथांना सारंगी वादनाचे धडे गिरवायला एका गुरुंकडे पाठवलं. पण एकेदिवशी त्या गुरुंनी दीनानाथांना दारु आणायला सांगितली. दारुच्या दुष्परिणामांविषयी दीनानाथांनी इतकं ऐकलं होतं की घाबरून सारंगी घेऊन ते घरी पळून आले. तिथेच सारंगी शिक्षण संपलं.
त्यानंतर दीनानाथांचं गायन शिक्षण सुरू झालं.अल्पवयातच ते गुरुकृपेने उत्तम गाऊ लागले. स्त्री व पुरुष दोन्ही भूमिका ते कौशल्यानं साकारत. तेव्हा त्यांचं वय होतं केवळ १४. संगीतक्षेत्रातील अनेकांनी दीनानाथांना सल्ला दिला की, “तू बालगंधर्वांच्या रचना गात रहा.”पण स्वाभिमानी दीनानाथांना नक्कल अमान्य होती. ते प्रचंड स्वाभिमानी होते. आणि याच स्वाभिमानातून आपले पूर्वज,त्यांचं ब्राह्मण्य, गोत्र या गोष्टींना नाकारत आपल्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात पूर्णत: नव्या ओळखीने करण्याचा निर्णय घेतला. मूळ गाव मंगेशी, दैवत मंगेश यांचे स्मरण करत त्यांनी ‘मंगेशकर’ असे आडनाव लावण्याचा निर्णय घेतला. आणि ‘दीनानाथ अभिषेकी’ ‘दीनानाथ मंगेशकर’ झाले.
सुरुवातीला किर्लोस्कर नाटक कंपनीत राहून त्यांनी महाराष्ट्रच नव्हे तर दिल्लीपासून कोलकत्यापर्यंत हिंदी-उर्दू नाटकंही केली. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी बलवंत नाटक मंडळी स्थापन करून ‘शाकुंतल’ नाटकाने तिची सुरुवात केली.
त्यानंतर भावबंधन, मानापमान, पुण्यप्रभाव, रणदुंदुभी, राजसंन्यास या व अशा अनेक नाटकातील त्यांच्या भूमिका गाजल्या. कोल्हटकरांनी दीनानाथांना ‘मास्टर’ ही पदवी दिली.
आजही मा.दीनानाथांची पदं ध्वनिमुद्रीकेत उपलब्ध आहेत. मा. दीनानाथांची सुकन्या आशा भोसले यांनी त्यांची काही नाट्यपदं गाऊन त्या चाली, ताना अजरामर केल्या आहेत. दीनानाथांच्या पाचही अपत्यांनी त्यांचा वारसा समर्थपणे पुढे नेलेला दिसतो. मराठी संगीत रंगभूमीवरील या ‘संगीतसूर्याच्या’ कारकीर्दीला सादर प्रणाम.