“दख्खनचा राजा ज्योतिबा माझा” मालिकेच्या शीर्षक गीताची गोष्ट…
स्टार प्रवाह वाहिनीवरील सध्या लोकप्रिय होत असलेली मालिका म्हणजे “दख्खनचा राजा ज्योतिबा माझा”. या मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे आहेत. गीतकार मंदार चोळकर याने या मालिकेचे शीर्षकगीत लिहिले आहे. तो म्हणतो, “जेव्हा एखाद्या दैवतावर, देवावर आधारित मालिका असते, तेव्हा त्या मालिकेसाठी शीर्षकगीत लिहिणे खूप आव्हानात्मक असते. ज्योतिबा हे तर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान. या दैवतावर मालिका येणार आणि त्यासाठी शीर्षकगीत लिहायची संधी मिळाल्यावर त्या दिशेने एक गीतकार म्हणून विचारांची प्रक्रिया सुरु होते. त्या संदर्भात कोणत्या कथा आहेत, याचाही विचार करावा लागतो. ते शीर्षकगीत परिपूर्ण असायला हवे, हा देखील विचार असतो.
हे देखील वाचा: दीनानाथ अभिषेकींचं मा. दीनानाथ मंगेशकर असं नामकरण कसं झालं?
ज्योतिबा हा शंकराचा अवतार आहे. तसेच खड्ग, त्रिशूळ ही आयुधे आणि डमरू हे वाद्य हे संदर्भ सुद्धा लक्षात घेणे महत्वाचे असते. ज्योतिबाच्या ठिकाणी मिळणारा गुलाल हा गुलाबी रंगाचा असतो, हा संदर्भ लक्षात घेऊन मी ओळ लिहिली, “गुलाबी गुलालानं डोंगर माखला, चैताच्या पुनवेचा रुबाब वेगळा”. चैत्र पौर्णिमेला तिथे यात्रा असते हा संदर्भ इथे मी वापरला. घोड्यावर आणि तेसुद्धा पांढऱ्या घोडयावर स्वार होणारा असा संदर्भ असल्याने मी “दौडत आला सफेद घोडा घेऊन देवाला, दख्खनचा राजा ज्योतिबा माझा” या ओळी लिहीत गेलो.”
मालिकेचे शीर्षकगीत ऐकताना आपल्या समोर ते दृश्य यायला हवे, असा एक विचार देखील इथे केला गेलेला दिसतो. शिवाय “डमरू” या वाद्याचा उल्लेख करताना “डमरू नाद डमडमला भिडे आभाळा” असा उल्लेख केलेला दिसतो. “ज्योतिबाच्या नावानं चांगभलं हो चांगभलं” अशी सुरुवात या गीताची आहे. गायक आदर्श शिंदे याच्या स्वरात हे गीत असून गुलराज सिंग हे या गीताचे संगीतकार आहेत. आज जेव्हा हे गीत ऐकलं जातं किंवा देवळाच्या परिसरात ऐकवलं जातं, तेव्हा या गीताची लोकप्रियता आपल्याला जाणवते.