चंद्रकांत गोखले यांच्या जन्मशताब्दीची सांगता…
मराठी सिनेनाट्यसृष्टीने अनेक चरित्र नायकांना मानाचं पान दिलं. अशा नायकांमध्ये सहजसुंदर अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर करणारं आणि जुन्या नव्या पिढीशी अभिनयाच्या धाग्यानं जोडलं गेलेलं व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेता चंद्रकांत गोखले. (Chandrakant Gokhale) आज त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होताना त्यांच्या आठवणींना उजाळा देऊया.
भारतीय सिनेसृष्टीतील पहिली महिला कलाकार ठरलेल्या कमलाबाई गोखले यांचे सुपुत्र म्हणून जन्माला आलेल्या चंद्रकांत गोखले यांनी वयाच्या नवव्या वर्षी रंगभूमीवर पाय ठेवला. वडिलांच्या निधनानंतर घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. आई कमलाबाई गोखले नाटकातून कामं करत. अशावेळी चंद्रकांत यांचे शालेय शिक्षण शाळेत जाऊन होऊ शकले नाही. मात्र त्यांच्या आईने घरीच मुलाला व्यवस्थित शिक्षण मिळेल याची खबरदारी घेतली. विशेष म्हणजे स्वत: शाळेत न जाऊनही मिरजेच्या ब्राह्मणपुरीतील प्राथमिक शाळा क्रमांक एक मध्ये गोखले यांनी मुख्याध्यापक पद भुषविले.
हे देखील वाचा: दीनानाथ अभिषेकींचं मा. दीनानाथ मंगेशकर असं नामकरण कसं झालं?
चंद्रकांत गोखले एक अभिनेता म्हणून आपल्याला ज्ञात असले तरी त्यांनी ख्याल गायकीचं रितसर प्रशिक्षण घेतलं होतं. पुढे नाटकाशी संबंध आल्यावर मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या नाटक कंपनीत काम करताना त्यांच्याकडून संगीताचे धडे गोखले यांनी घेतले. त्यांना संगीताचे उत्तम ज्ञान होते. जवळच्या मंडळींच्या आग्रहास्तव केलेल्या गानमैफिलीत चंद्रकांत गोखले यांना ऐकण्यासाठी खुद्द पु.ल. देशपांडे, किशोरीताई आमोणकर यांनी उपस्थिती लावली होती अशी आठवण आहे.
चंद्रकांत गोखले यांची अभिनय कारकीर्द पाहता एक होता म्हातारा, झुंजारराव, पुण्यप्रभाव, विद्याहरण, भावबंधन, राजसंन्यास, बॅरिस्टर, पुरुष अशा वैविध्यपूर्ण नाटकातील त्यांच्या भूमिका गाजल्या. बॅरिस्टर नाटकात ‘हूं’ हा केवळ हुंकार त्यांना विविध प्रसंगात ५-६ वेळा द्यायचा होता. पण प्रत्येकवेळी तो हुंकार चंद्रकांत विविध पद्धतीने देत. त्यांचा अभिनय सहज होता. आता मी हसवतोय किंवा रडवतोय असा अभिनिवेश त्यात नसे. कामाच्या बाबतीत ते विलक्षण प्रामाणिक आणि अचूक होते. नागपुरात त्यांच्या एका नाटकाचा प्रयोग होता. कडाक्याच्या थंडीचे दिवस. नाटकात प्रसंग होता की, आंघोळ करुन उघडं अंग पुसत चंद्रकांत गोखले रंगमंचावर प्रवेश करतात. या प्रचंड थंडीत त्यांनी उघड्या अंगाने येऊ नये असं त्यांना सांगण्यातही आलं; पण तो संहितेशी अप्रामाणिकपणा ठरेल असं सांगत त्या कडाक्याच्या थंडीत चंद्रकांत गोखले यांनी ते दृश्य उघड्या अंगाने पार पाडलं.
हे वाचलंत का: अकाली एक्झिट घेणारा गगनभेदी नटसम्राट- यशवंत दत्त
अनेक हिंदी मराठी चित्रपटातही त्यांनी साकारलेल्या भूमिका चिरकाल लक्षात राहिल्या. धर्मकन्या, सुवासिनी, मानिनी, जावई माझा भला, माझं घर माझी माणसं, अगदी अलिकडचा वळू हे त्यापैकीच काही चित्रपट. “रायगडचा राजबंदी” या चित्रपटात त्यांनी शिवरायांची भूमिका अत्यंत तडफेनं साकारली होती.
वैयक्तिक आयुष्यात त्यांनी काही तत्त्वं कमालीच्या निष्ठेने पाळली. आपल्या उत्पन्नाचा ठराविक भाग ते जवानांना देत असत.
त्यांच्या अभिनय कारकीर्दीसाठी विष्णुदास भावे पदक आणि बालगंधर्व पुरस्कार अशा अनेक सन्मानांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं.
काही कलाकार अभिनेता म्हणून भावतात काही कलाकार व्यक्ती म्हणून आवडतात. पण या दोन्ही कसोट्यांवर रसिक मनाचा ठाव घेणं चंद्रकांत गोखले यांनी साध्य केलं होतं. आपला अभिनय वारसा सुपुत्र विक्रम गोखले यांच्याकडे त्यांनी सूपूर्द केला. साधेपणा, कामावरची प्रचंड निष्ठा आणि सहजता हे त्यांचे गुण पुढील पिढीसाठी आदर्शवत राहतील.