दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
‘रामप्रसाद की तेरहवी’- मरणाचा आनंददायी सोहळा
मार्च २०२० पासून करोनाच्या संकटाने चित्रपटगृहे बंद पडली आणि प्रदर्शनाच्या वाटेवर असणाऱ्या चित्रपटांना मोठा फटका बसला.अवघ्या चित्रपटसृष्टीचे आर्थिक गणित बिघडून गेलं.प्रेक्षकांनी घरबसल्या ओटीटी वर प्रदर्शित होणाऱ्या वेबमालिका आणि चित्रपट पाहून आपली मनोरंजनाची भूक भागवून घेतली. सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून चित्रपटगृहात सिनेमा प्रदर्शित करायला परवानगी मिळाली तरीही प्रेक्षक नसल्याने चांगले चित्रपट प्रदर्शित करायला निर्माते पुढे आले नाहीत. नवीन वर्ष सुरु होत असताना हे चित्र बदलत असल्याचे संकेत मिळत आहेत. क्रिस्टोफर नोलनच्या बहुचर्चित ‘टेनेट’ ला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिलाय. हिंदी मधील गेल्या वर्षी फिल्म फेस्टिवल मध्ये गाजलेले चित्रपट प्रदर्शित होऊ लागले आहेत. सीमा भार्गव-पहावा यांनी दिग्दर्शित केलेला ‘रामप्रसाद की तेरहवी’ (Ramprasad Ki Tehrvi) हा चित्रपट नुकताच सिनेमागृहात आलाय. संवेदनशील कथानक आणि सर्व अभिनेत्यांचा उत्तम अभिनय यामुळे ‘रामप्रसाद की तेरहवी’ प्रेक्षणीय झालाय.
हे देखील वाचा: बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारे हरहुन्नरी कादर खान !
१९८४ साली दूरदर्शनवर प्रक्षेपित झालेल्या ‘हम लोग’ या पहिल्या वहिल्या मालिकेतील बडकी [थोरली बहिण] या भूमिकेने सीमा पहावा यांना ओळख मिळवून दिली ‘आंखो देखी’, ‘फेरारी की सवारी’, ‘शुभमंगल सावधान’ या अलीकडच्या चित्रपटांतील त्यांचा अभिनय अव्वल दर्जाचा होता. सुमारे पस्तीस वर्षे अभिनयाच्या क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या या अभिनेत्रीने चित्रपट दिग्दर्शनाचा केलेला पहिलाच प्रयत्न आहे. महेश एलकुंचवार यांच्या ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाच्या कथानकाशी जवळीक साधणारा आशय ‘रामप्रसाद की तेरहवी’ मध्ये असला तरीही त्याची हाताळणी हलकीफुलकी आहे. विषयाचे गांभीर्य कायम ठेवून त्याला एक वेगळा आयाम देण्याचा सीमा पहावा यांचा प्रयत्न यशस्वी झालाय.
संगीत शिक्षक रामप्रसाद [नसिरुद्दीन शहा] यांच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी त्यांचे चार मुलगे आणि दोन मुली तसचं इतर नातेवाईक लखनौच्या घरी एकत्र येतात. आईच्या इच्छेनुसार वडिलांच्या तेराव्या पर्यंत मुलांना तिथेच राहावे लागते. या तेरा दिवसात कामानिमित दूर गेलेल्या आणि एकमेकांबद्दल मनात अढी असलेल्या बहिणभावांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मानसिकतेचा वेध सीमा पहावा घेतात. नातेसंबंधातील असोशी आणि व्यवहार, घरातील कर्त्या पुरुषाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांच्या आणि नातवंडांच्या उमटणाऱ्या स्वाभाविक प्रतिक्रिया , भेटायला येणाऱ्या मंडळीपुढे शोक व्यक्त करताना उडणारी तारांबळ अशा अनेक वास्तव गोष्टी टिपता टिपता सीमा पहावा समाधानी आयुष्याचे खरं साध्य काय, यावर सुद्धा भाष्य करतात.
हे वाचलंत का: नाना पाटेकर – आपला माणूस
रामप्रसादचा मृत्यू ही चित्रपटातील मुख्य आणि एकमेव घटना. तेरावाच्या विधीपर्यंत एकत्र राहताना भाऊ बहिणीं एकमेकांची उणीदुणी काढतात,आई वडिलांच्या न पटलेल्या स्वभावाबद्दल दबकत का होईना व्यक्त होतात आणि वडिलांनी घेतलेली कर्जाची रक्कम कोणी फेडायची यावर वाद सुद्धा घालतात . धाकट्या निशांतची [परमब्रता चटर्जी] अभिनेत्री बायको सीमा [कोंकणासेनगुप्ता] घरी आल्या नंतर या धुसाफुशीला अजूनच धार चढते. तेरावं झाल्यानंतर सगळी भावंड आपापल्या घरी परततात पण वडिलांनी घेतलेल्या कर्जाचे ओझे आणि आईची काळजी त्यांच्या सोबतीस असते.
जेव्हा चित्रपटाचे कथानक ओळखीच असते आणि त्याच्या शेवटचा अंदाज बांधणे शक्य असते अशावेळी त्या चित्रपटाची तांत्रिक बाजू सशक्त असणे आणि अभिनयाचा दर्जा उत्तम असणे गरजेचं असते . ‘रामप्रसाद की तेरहवी’ च्या या दोन्ही बाजू उजव्या असल्याने एक दर्जेदार कलाकृती पहिल्याचा आनंद प्रेक्षकांना मिळतो.
सुदीप सेनगुप्ताचा कॅमेरा पहिल्याच फ्रेम पासून रामप्रसादच्या हवेलीचा माग काढत जातो आणि त्यानंतर काही बाहेरच्या अवकाशातील मोजेके प्रसंग वगळता हवेलीत तेरा दिवस चाललेल्या खळबळीच चित्रण करतो. रामप्रसाद आपल्या तेरावाच्या विधी पाहात असतो तो प्रसंग प्रकाशचित्रणाच्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय झालाय. सागर देसाई यांनी सिनेमाचा मूड लक्षात घेऊन रचलेली गीते सुश्राव्य झाली आहेत.
‘रामप्रसाद की तेरहवी’ मध्ये अनेक कलाकारांना एकत्र आणून सीमा पहावा यांनी त्या सर्वांकडून प्रभावी अभिनय करून घेतलाय. पती निधनाच्या धक्क्यातून सावरणारी आणि मुलांनी कर्ज फेडायला असमर्थता दाखवल्यानंतर त्यावर उपाय शोधू पाहणारी अम्माची व्यक्तिरेखा सुप्रिया पाठकच्या कारकिर्दीतील उल्लेखनीय ठरावी. या घरात आपण उपऱ्या असल्याची भावना बाळगून अस्वस्थ झालेली सीमा कोंकणा सेनगुप्ताने तितकीच समर्थपणे उभी केलीय. वडील गेल्याचे दुःख मनात बाळगणारे आणि आपापल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांची ओझी वाहणारे रामप्रसादचे मुलगे अभिनित करणारे मनोज पहावा [गजराज], विनय पाठक [पंकज], निनाद कामत[ मनोज] आणि निशांत [ परमब्रता चटर्जी] हे कलाकार त्यांच्या नेहमीच्या सहजतेने वावरले आहेत. विक्रांत मेसी या हरहुन्नरी अभिनेत्याने केलेल्या राहुलच्या [थोरला नातू] भूमिकेला एक वेगळा आयाम आहे. सीमाकाकी बद्दल वाटणारे सुप्त शारीरिक आकर्षण त्याने देहबोलीतून संयतपणे व्यक्त केलयं. पुष्पा जोशी, विनीत कुमार, दीपिका अमीन,राजेंद्र गुप्त ,सादिया सिद्दिकी या कलाकारांच्या व्यक्तिरेखा सुद्धा तितक्याच तोलामोलाच्या आहेत. नसिरुद्दीन शहाच्या वाट्याला आलेली रामप्रसादची भूमिका लांबीने लहान असली तरीही त्यांच्या केवळ उपस्थितीने चित्रपटाला आवश्यक असलेल गांभीर्य प्राप्त होते.
‘रामप्रसाद की तेरहवी’ ची सुरुवात एका मृत्यूने होत असली तरीही हा चित्रपट गंभीर न करता त्याला खुशखुशीत ठेवण्यासाठी सीमा पहावा यांनी स्वाभाविक रीतीने येणारे विनोदी प्रसंग आणि संवाद पटकथेमध्ये पेरले आहेत. मात्र हे प्रसंग चित्रपटाला सवंग पातळीवर येऊ देत नाहीत हे विशेष!
हे नक्की वाचा: चौकटी बाहेरचा राज… राज कपूर…
एखाद्याच्या मृत्यूने इतरांचं जगणे थांबत नाही, मात्र हे आयुष्य जगताना आपल जगणं ज्यांनी सुसह्य केलय त्यांचे कधीतरी आभार मानावेत, त्यांना मनापासून thank you म्हणावं हा महत्वाचा संदेश अधोरेखित करणारा ‘रामप्रसाद की तेरहवी’ चित्रपट गृहात जाऊन पाहावा आणि आपल्या नवीन वर्षाची सुरुवात आनंददायी करावी.