‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
साधना १९५८
साधना १९५८ (Sadhna)
निर्देशक – बी.आर.चोप्रा (B.R. Chopra)
संगीतकार – एन. दत्ता
गीतकार – साहिर लुधियानवी
कथा – पंडित मुखराम शर्मा
कलाकार – वैजयंतीमाला (Vyjayanthimala), सुनील दत्त (Sunil Dutt), राधाकिशन, लीला चिटणीस (Leela Chitnis)
प्रभातचा आदमी (मराठीत माणूस) हा वेश्याजीवनावरचा प्रथम चित्रपट होता. त्यानंतर वीस वर्षांनी चोप्रांनी साधनामध्ये हा विषय आपल्या शैलीने हाताळला. साधनाची कथा, पटकथा, संवाद पं. मुखराम शर्मा यांचे होते. यातील वेश्याच्या मध्यवर्ती भूमिकेसाठी चोप्रांनी वैजयंतीमालेचा विचार सुद्धा केला नव्हता. सनातनी दाक्षिणात्य कुटुंबात जन्माला आलेली वैजयंती या भूमिकेला उचित न्याय देईल असे त्यांना बिलकुल वाटले नव्हते. वैजयंतीमाला ही आव्हानात्मक भूमिका करण्यासाठी जिद्दीला पेटलेली हो प्रत्यक्ष कोठीवर जाऊन मुजरा नृत्याचा अभ्यास केला व एक दिवस मुजरा नर्तिकेच्या पेहरावातच चोप्रांना स्टुडिओत भेटायला गेली चोप्रांचा त्यावर विश्वासच बसेना! वैजयंतीमाला हुबेहूब चंपा दिसत होती. (Sadhna 1958 by B R Chopra)
मोहनच्या (सुनील दत्त) वृद्ध मातेला (लीला चिटणीस) घरात सुंदर बहू आणण्याची घाई झालेली असते. एक दिवस घरातील जिन्यावरून ती वृद्ध माता धडपडते व बेशुद्ध अवस्थेत बिछान्याला खिळते. ग्लानीमध्ये ती सारखी बहू बहू पुटपुटत असते. मोहनला विवाह करण्यात विशेष रस नसतो. परंतु आता नाईलाजाने मोहन आईची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी विवाहाला राजी होतो. परंतु आयत्यावेळी बहू कुठून आणायची ते मोहनला समजत नाही. या प्रसंगी त्याचा चालू मित्र जीवन (राधाकिशन) मोहनला मदत करतो.
हे देखील वाचा: ‘बी. आर. फिल्म्स’ – पाच दशकांचा सुरेल प्रवास
मोहनच्या आईच्या समाधानासाठी, शहरातील नामचीन वेश्या चंपाला भाड्याची वधू रजनी बनवून जीवन त्या मायलेकांना उल्लू बनवितो. रजनीच्या प्रेमळ सहवासात ती वृद्ध खणखणीत बरी होते व मोहनही तिच्या प्रेमात पडतो. जीवन आणि चंपा त्यांना पुरेपूर लुटून एक दिवस फरार होता. पुढे चंपाला आपल्या दुष्कृत्याचा पश्चाताप होतो. त्या भोळ्या मातेच्या व मोहनच्या भाबड्या निरागस प्रेमाने तिच्यात आमूलाग्र बदल घडतो. आपले वेश्याजीवन कायमचे सोडून चंपा आदर्श गृहिणी ‘रजनी’ बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते. एका अर्थाने ही सुद्धा एक साधनाच आहे. चंपाचा हा प्रयत्न सफल होतो का??? आपली सून एक वेश्या आहे हे समजल्यावर त्या वृद्ध मातेला काय वाटेल??? मोहनची मनस्थिती काय होते??? हे सर्व नाटकीय प्रसंग पडद्यावर पाहण्यातच मजा आहे.
साधनासाठी वैजयंतीमालाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार (Filmfare Awards) मिळाला. तर वेश्या जीवनावरील विचारोत्तेजक कथेसाठी पंडित मुखराम शर्मा यांना सर्वोत्कृष्ट कथालेखनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. साधना १९५८ मधील सर्वात जास्त चर्चित फिल्म होती. साधनाच्या यशामुळे फिल्मी उद्योगात चोप्रांची प्रतिष्ठा व कीर्ती वाढली.