‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
आठवणी गीतरामायणाच्या
यंदाचे वर्ष हे महाराष्ट्राचे प्रतिवाल्मिकी म्हणून ओळखले जाणारे ग. दि. माडगूळकर, तसेच गायक आणि संगीतकार सुधीर फडके अर्थात बाबूजी यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. गदिमा आणि बाबूजी यांच्या जोडीचा आपण जेव्हा उल्लेख करतो, तेव्हा अर्थातच मराठी गीत संगीतातील एक अजरामर काव्य ‘ गीतरामायणाची ‘ आठवण होते.
गीतरामायण हे काव्य घराघरात पोचले ते आकाशवाणीमुळे. त्याचीच ही जन्मकथा! १९५५ साली आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर सीताकांत लाड हे सहनिर्देशक होते. आकाशवाणीच्या माध्यमातून समाजप्रबोधन आणि मनोरंजन अशी दोन्ही उद्दिष्ट साधता येतात, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. अनेक साहित्यिक ,कवी,यांच्याशी त्यांचा संपर्क होता.
एकदा त्यांनी ग दि माडगूळकर यांना चर्चेसाठी बोलावले होते. तेव्हा रामचरित्र हे मराठी गाण्यांच्या माध्यमातून लोकांसमोर यावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. गदिमा यांनीच ती पूर्ण करावी असा आग्रह देखील केला. त्यांनी होकार दिला. आता गीतांसाठी संगीतकार म्हणून कोण असणार ?याची चर्चा सुरु झाली आणि मग सुधीर फडके यांचे नाव ठरले . १९५५ सालातील गुढीपाडव्याच्या साधारण महिनाभर आधी ही गोष्ट घडली . सीताकांत लाड ,गदिमा आणि बाबूजी यांच्या गप्पातून ‘गीत रामायण ‘ असे शीर्षकही निश्चित केले गेले. १९५५ साली रामनवमीपासून ते १९५६ च्या रामनवमीपर्यंत ही गाण्यांची शृंखला प्रसारित करण्याचे ठरले. दर आठवड्याला एक असे गीत माडगूळकरांना लिहून द्यायचे होते. बाबूजींना त्या गीतांना संगीतबद्ध करायचे होते. त्या वर्षी मराठी महिन्यांप्रमाणे अधिक महिना आला होता , त्यामुळे १९५५ मधील रामनवमी ते १९५६ सालची रामनवमी यामध्ये छप्पन आठवडे होते . म्हणून दर आठवड्याला एक या प्रमाणे ५६ आठवड्यांसाठी ५६ गीते लिहिली गेली .
आकाशवाणीच्या माध्यमातून पोचलेले हे काव्य आजही अजरामरच आहे. पूर्वी त्या काळात गीतरामायणाचे प्रयोग होत असत. त्यात पुरुषोत्तम जोशी निवेदन करत होते. वादकांमध्ये प्रभाकर जोग ,सदाशिव सुतार, अण्णा जोशी ,मधुकर गाडगीळ अशी वादकांची उत्तम टीम होती . आकाशवाणीवर जे मूळ गीतरामायण ध्वनिमुद्रित झाले ते सुधीर फडके ,ललिता फडके, राम फाटक, माणिक वर्मा, प्रमोदिनी जोशी, मंदाकिनी पांडे, वसंतराव देशपांडे आदी मान्यवरांनीं गायलेले आहे. आजही आकाशवाणीवर जेव्हा ही गीते मूळ गायकांच्या स्वरात प्रसारित होतात, तेव्हा लोकांना अभिमान वाटतो. गदिमा आणि बाबूजींच्या जन्मशताब्दी निमित्त या आठवणींना उजाळा दिला .
गणेश आचवल
फोटो सौजन्य – गुगल (Google)