‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
फोर मोर शॉर्ट्स प्लिज : पांढरपेशी समाजात गुंतलेला स्त्रीवाद
ऑनलाईन ॲप :
अमेझॉन प्राईम (Amazon Prime)
पर्व :दुसरे
स्वरूप :विनोदी ड्रामापट
दिग्दर्शक :अनु मेनन, नुपूर अस्थाना
मुख्य कलाकार :सयानी गुप्ता, बानी जे, कीर्ती कुल्हारी, मानवी गागरू, प्रतिक बब्बर, मिलिंद सोमण, लिसा रे
—
‘मला काहीच सुचत नाही आहे. मी पुलाच्या काठावर आहे आणि मला तुमची आठवण येत आहे. तोल सुटला तर मी कधीही पडू शकते,’ दारूच्या नशेत इस्तांबुल शहरातील पुलावरून चालणारी सिद्धी आणि मुंबईतील उमंग यांच्यातील फोनवरील या संभाषणापासून सिरीजच्या दुसऱ्या पर्वाची सुरवात होते. त्यानंतर उमंग कशाचीच तमा न बाळगता अंजना आणि दामिनीसोबत इस्तांबुल गाठते. हा एक प्रसंग खरतरं सिरीजची उत्सुकता वाढविण्यासाठी पुरेसा होता पण त्यानंतर कथानकाचा आलेख इतका खाली ढासळला जातो की सिरीजच्या दुसऱ्या भागापर्यंतच प्रेक्षक म्हणून थकवा जाणवू लागतो.
मुंबईतील खरतरं दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू कुटुंबातील चार स्त्रियांच्या मैत्रीची गोष्ट, हा सिरीजचा मुख्य गाभा. सिरीजच्या पहिल्या पर्वात दामिनीने शोधपत्रकारीतेचा वसा घेत स्वतःला त्यात वाहून घेतलेलं असतं. पण वेबसाईटच आर्थिक गणित सांभाळायच्या उद्देशाने तिला स्वतःचं स्थापन केलेल्या कंपनीतून दूर केलं जातं. बेजबाबदार नवऱ्यापासून विभक्त झाल्यावर अंजना आपला वकिली पेशा सांभाळत असतानाच एकटीने मुलीच्या संगोपनाची जबाबदारी घेत असते. रागाच्या भरात झालेल्या एका अपघातामुळे मुलीचा ताबा गमविण्याच्या पायरीवर ती असते. आपलं समलिंगत्व मुक्तपणे स्वीकारणारी उमंग प्रख्यात अभिनेत्री समारा कपूरच्या प्रेमात पडते. पण आपलं करीयर वाचविण्याच्या नादात समारा मात्र हे नातं नाकारते. उच्चभ्रू कुटुंबात वाढलेली पण लठ्ठपणामुळे लहानपणापासून आईचे टोमणे सहन करणाऱ्या सिद्धीला इंटरनेटमुळे स्वतःच्या शरीराकडे सकारात्मकतेने पहाण्याच बळ मिळत. पण त्याचवेळी स्वतःच्या आयुष्यातील खाचखळगे निस्तरताना झालेल्या चिडचिडीत त्या एकमेकांशी भांडतात आणि वेगळ्या होतात.
मुळात सिरीजला सुदैवाने उत्तम कथानक मिळालं आहे आणि यातील विषय एखाद्या ‘आर्टफ्लिम’ प्रमाणे तात्विक वादात हाताळण्यापेक्षा त्याला दैनंदिन आयुष्याचा भाग बनविण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. त्यात स्त्रियांच्या आयुष्यातील विषय मांडताना लेखन ते दिग्दर्शनापर्यंतच्या बहुतेक जबाबदाऱ्या महिलांनी पार पाडल्यामुळे कथानकाला सहाजिकच स्त्रीत्वाचा स्पर्श मिळाला आहे. त्यामुळे या चौघींमधील संवाद, त्यांच्यातील जवळीक, त्यांच्यातील थट्टामस्ती यात पुरुषीपणा जाणवत नाही. हा लेखनातील महत्त्वाचा दुवा आहे.
सिरीजच्या दुसऱ्या पर्वात नव्याने आलेल्या स्वातंत्र्यामध्ये रममाण असताना सिद्धीला स्वतःचं अस्तित्व शोधायचं असतं. कोणाचाही वरदहस्त पाठी नसताना पुन्हा नव्याने करीयरला सुरवात करताना आपल्या तत्वांना कुठेही धक्का न लावण्याची कसरत दामिनीला करायची असते. समलिंगत्व जगजाहीर झाल्यावर निराशेत गेलेल्या समाराला सावरून तिच्यात आत्मविश्वास जागा करण्याचं दिव्य उमंगला पार पडायचं असतं. तर आयुष्यात आणि ऑफिसमध्ये पदोपदी अनुभवायला मिळणाऱ्या पुरुषसत्ताक मनोवृत्तीला बाजूला सारून आपलं स्थान निश्चित करायची धडपड अंजनाला करायची असते. सिरीजच्या पहिल्या पर्वाच्या तुलनेने दुसऱ्या पर्वामध्ये लेखन आणि मांडणीमध्ये अधिक व्यवस्थितपणा जाणवतो. पण त्याचवेळी या चौघींच्या आयुष्यातील मुख्य समस्येला पकडून कथानक त्याभोवती फिरविण्यापेक्षा लेखिकेने अनेक उपकथानकांची जोड दिली आहे. त्यामुळे या चौघींच्याही आयुष्यातील समस्या जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने नाहीशाही होतात. प्रेक्षक म्हणून सिरीजमधील पात्र, त्यांची आयुष्ये यांच्याशी एकरूप होण्याची संधी निसटून जाते.
सिरीजचा विषय भारतीय माध्यमांसाठी धाडसी आणि नवीन आहे. इतके दिवस शोले ते जिंदगी ना मिलेगी दोबारापर्यंत सिनेमांमध्ये नायकांमधील मैत्री साजरी केली गेली आहे. स्त्रियांचं भावविश्व मैत्रीच्या नात्यातून रेखाटणारे सिनेमे, मालिका तशा हातावर मोजण्याइतक्या दुर्लभ आहेत. अगदी कित्येक सिनेमांमध्ये नायकाच्या अवतीभवती मित्रांची टोळी फिरत असते, तिथे नायिकेला एखादी मैत्रीण दाखवणंही दुर्लभ चित्र आहे. सहाजिकच या सिरीजकडून अपेक्षा होत्या. काहीअंशी सिरीज या अपेक्षा पूर्ण करतेही. पण या मुख्य विषयांना घट्ट धरून त्याभोवती कथानक फिरविण्याऐवजी सिरीजमध्ये अन्य फाफटपसाऱ्याला जास्त महत्त्व दिल्यामुळे कथानकाचा मूळ गाभा हरवला आहे. म्हणूनच उत्तम कलाकार, व्यवस्थित बजेट, उत्तम तंत्रज्ञ, चांगली कथा मिळूनही एक आशयघन सिरीज बनण्याऐवजी हा केवळ पोकळ स्त्रीवादाचा गोंडस सोहळा बनून राहतो.
नव्याने आलेल्या वेबसिरीजच्या माध्यमाला सेन्सरबोर्डची फारसे निर्बंध लागत नाहीत. त्यामुळे अर्वाच्य शिव्या, अतिभडक लैंगिक चित्रण, व्यसनाधीनता यांचं चित्रण कित्येक सिरीजमध्ये सरार्स होत असतं. किंबहुना हेच आजच्या तरुणाईचं वास्तव आहे असं ठसविण्याचा प्रयत्न कित्येक सिरीजमध्ये झालेला आहे. स्त्रियांचं दारू पिणं, स्वतःहून पबमध्ये जाण, आपल्या शारीरिक गरजांची जाणीव असणं, या पडद्यामागच्या गोष्टींना मुख्य प्रवाहात आणणं आणि हे करताना त्यात कुठेही अश्लिलता येणार नाही याची काळजी घेणं हे या सिरीजमध्ये व्यवस्थित मांडल आहे. पण या पायावर मुख्य कथानक रचण्याऐवजी याच मुद्द्यांना सिरीजमध्ये अवास्तव महत्त्व दिलं आहे. कंपनीत आपल्याला केवळ स्त्री असल्यामुळे मोठ्या जबाबदाऱ्या देणं नाकारलं जातंय हे लक्षात आल्यावर अंजना आणि तिच्या बॉसमध्ये झालेलं संभाषण किंवा सिद्धीच्या आईने मुलीसाठी नवऱ्याशी केलेलं भांडण असो असे काही निवडक प्रसंग उठून दिसतात. पण त्याचवेळी अंजनाच्या नवऱ्याच नव्या बायकोसोबतसुद्धा बेताल वागणं, समाराचं आयत्या प्रसिद्धीचा वापर करीयरसाठी करताना उमंगकडे दुर्लक्ष करणं, नवा प्रियकर आणि पोटच्या बाळाच्या बापामध्ये तिच्या मालकी हक्कावरून वाद रंगल्यावर दामिनीच व्दिधा मनस्थितीत अडकणं अशा कित्येक ठिकाणी या स्त्रीपात्रांना खुलवता आलं असतं, पण हे मुद्दे तितक्याशा प्रभावीपणे सिरीजमध्ये येत नाही. त्यामुळे चुकचुकल्यासारखं वाटतं. अर्थात या लॉकडाऊनच्या वेळेस हलकफुलक कथानक पहायच असेल तर ही सिरीज पहायला हरकत नाही.
माहिती आणि फोटो सौजन्य – अमेझॉन प्राईम (Amezon Prime)
– मृणाल भगत