‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
माझिया प्रियाला प्रीत कळेना
एखाद्या गीतकाराला गाण्याचे शब्द कुठे, कधी, कसे सुचतील हे नेमके सांगता येणे कठीण असतं. गीतकार अश्विनी शेंडे हिने अनेक मालिकांची शीर्षकगीते लिहिली आहेत. ती सांगते की तिला अनेकदा प्रवास करताना गाणी सुचतात. एखाद्या वेळी लॅपटॉप जवळ घेऊन किंवा पेन, कागद जवळ घेऊन जरी बसलो ना, तरी गीत सुचत नाही, पण प्रवासात अचानक शब्द सुचतात. प्रवासात सुचलेल्या अशाच एकाच शीर्षकगीताची आठवण म्हणजे ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ चे शीर्षकगीत. संगीतकार अशोक पत्की यांच्याबरोबर काम करायला मिळावं, हे प्रत्येक गीतकाराचे स्वप्न असते. २०१० सालची गोष्ट आहे. त्यावेळी; ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेचे संवाद लिहिण्याकरिता अश्विनीला बोलावले होते आणि अश्विनीने मालिकेच्या निर्मात्यांना विनंती केली की ज्या मालिकेचे संवाद मी लिहीत आहे, त्याच मालिकेचे शीर्षकगीत लिहायला मिळाले तर खूप आवडेल. २००८ आणि २००९ साली लागोपाठ दोन वर्षे झी मराठीचा सर्वोत्कृष्ट शीर्षक गीतकाराचा पुरस्कार अश्विनीला मिळाला होता. ‘माझिया प्रियाला’ या मालिकेचे संवाद अश्विनीच लिहीत असल्याने कथेचा आलेख, मालिकेतील पात्र ही अर्थातच तिच्या परिचयाची होती. मालिकेचा आशय तिला माहित होता. आजीवसन स्टुडिओ मध्ये ती संगीतकार अशोक पत्की यांना भेटायला गेली. ते हार्मोनियम वर एका गाण्याचे काम करत होते. त्यांच्याशी थोड्या गप्पा झाल्यावर अशोक पत्की आणि अश्विनी शेंडे यांच्यात मालिकेच्या कथेबाबत चर्चा झाली. गाणे कसे हवे, याचा आराखडा पत्की काकांच्या डोक्यात पूर्ण तयार होता.
बोलता बोलता ते अश्विनीला म्हणाले, “एक चाल आहे डोक्यात,ऐकवू का?” अश्विनी ती चाल कान टवकारून ऐकू लागली. त्या काळात मोबाईल वर फक्त रेकॉर्डिंग होत होते. अशोकजींनी ती चाल वाजवायला सुरुवात केली आणि अश्विनी त्यात गुंतत गेली. त्या चालीत आकर्षित करणारे काहीतरी आहे, ही जाणीव तिला झाली आणि ही चाल आपण रेकॉर्ड करून घ्यावी, असे तिला वाटले. पत्की काकांनी होकार दिला, त्यांनी पुन्हा ती चाल हार्मोनियम वर ऐकवली. गाण्याच्या शेवटी मालिकेचे शीर्षक यायला पाहिजे, हा पत्की काकांचा ट्रेंड इथेही चपखल बसणार होता. मालिकेचे शीर्षक म्हणजे ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ हे एका गाजलेल्या ठुमरीची ओळ होती. त्यामुळे मूळ गाण्याची चौकट मोडून आपलं गाणे तयार करणे हे संगीतकारापुढचे आव्हान होते. अर्थात ते आव्हान अशोक पत्की यांनी सहज पेलले होते. अश्विनीने ती चाल रेकॉर्ड केली आणि ती निघाली. पत्की काका तिला म्हणाले, “अश्विनी, मी ऐकलंय तुझ्याबद्दल की तू पटकन गाणी लिहून देतेस. या चालीवर सुद्धा लिहिशील ना पटकन ? “अश्विनी आजीवसन स्टुडिओतून निघाली आणि घरी रिक्षाने जाताना ती सातत्याने ती चाल ऐकत होती. पार्ला येईपर्यंत अश्विनीचे शब्द लिहून झाले होते आणि तिने ते शब्द पत्कीकाकांना ऐकवले. ते शब्द होते, “घेऊन येशी कोवळे, ऋतू सुगंधी सात हे, नवीन भाषा कोणती, नजर काही बोलते, साऱ्या सरी या माझ्याचपाशी, चिंब तू होईना, माझिया प्रियाला प्रीत कळेना”.
गायिका महालक्ष्मी अय्यर गायक स्वप्नील बांदोडकर
पत्की काकांना अश्विनीने लिहिलेले गीत आवडले. या संदर्भात अश्विनी असेही म्हणते, “कुठल्याही गीताच्या बाबतीत सगळ्या गोष्टी गीतकाराच्या हातात थोडेच असतात? जो कोणी वरती बसलेला आहे ना, त्याने शब्द फॉरवर्ड केले की ते गीतकाराच्या हातून कागदावर उमटतात. “हे शीर्षकगीत अभिजित खांडकेकर आणि मृणाल दुसानीस या कलाकारांवर चित्रित झाले होते. त्या गाण्याची व्हर्जन्स करावीत असे अश्विनीला सांगण्यात आले. आज या गाण्याची तीन व्हर्जन्स आहेत. स्वप्नील बांदोडकर आणि महालक्ष्मी अय्यर यांनी हे गीत गायले आहे. या गाण्यासाठी अश्विनीला सर्वोत्कृष्ट शीर्षक गीतकाराकरीता असलेला पुरस्कार मिळाला आणि तिची पुरस्कारांची हॅट्ट्रिक झाली .
गणेश आचवल