‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
हसमुख: खुनशी ‘फिल’मागचा हसरा चेहरा
ऑनलाईन ॲप : नेटफ्लिक्स
पर्व : पहिले
स्वरूप : विनोदी ड्रामापट
दिग्दर्शक : निखिल गोन्साल्व्हीस
मुख्य कलाकार : वीर दास, रणवीर शोरी, मनोज पाहवा, रवी किशन, अम्रिता बागशी, दीक्षा सोनालकर
कित्येकांना काम सुरु करण्याआधी एक किक हवी असते. काहीजणांना ही किक चहा कॉफीच्या एका फुरक्याने येते तर काहींना एखादं गाणं किंवा संगीत ऐकून येते. एखाद्याला सकाळी मस्त व्यायाम केल्यावर स्फूर्ती चढते तर एखाद्याला रात्रीची सात तास झोप झाल्यावर ही तरतरी येते. ‘किक’, ‘फिल’, ‘स्फूर्ती’ काहीही नावं द्या थोडक्यात काय तर एखादं काम सुरु करण्यासाठी लागणारी प्रेरणा हा त्यामागचा अर्थ असतो. एकदा काय किक मिळाली की हातातलं काम विनासायास अगदी सहजतेने होतं. पण एखाद्याला आपलं काम करण्यासाठी लागणारा ‘फिल’ हा कोणाचातरी खून करून मिळत असेल तर? आणि हा कोणीतरी पेशाने विनोदवीर असला तर? कोण विचार करेल की, व्यासपीठावर उभं राहून प्रेक्षकांना मनमुराद हसविणारा हा खिशात रक्तबंबाळ सुरा घेऊन वावरत असणार? या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर वीर दासची नवी सिरीज पहायला हवी.
हसमुख उत्तर प्रदेशातील छोट्याशा गावातील एक भोळाभाबडा तरुण. लहानपणीच आईवडिलांचं छत्र हरविल्यामुळे काकाकाकीसोबत रहाणारा. बरं म्हणून त्याचं बालपण आणि तारुण्य काही आनंदात गेलेलं नाही. त्याला सांभाळायची परतफेड म्हणून रोज रात्री दारूच्या नशेत येणाऱ्या काकांचा मार खाणे हे त्याच्यासाठी नित्यनियमाच होतं. त्याच्याच भाषेत सांगायचं तर, ‘काम ठरलेलं असायचं फक्त शस्त्र बदलायचं. कधी बेल्ट, तर कधी लाटण, कधीतरी लाथाबुक्के.’ या सगळ्यात एक गोष्ट होती जी हसमुखला दिलासा द्यायची ती म्हणजे पेपरात येणारे चुटकुले. शाळेत त्याला सतविणाऱ्या एका मुलाला त्याने विनोदाच्या मार्गाने धडा शिकविलेला असतो. तेव्हापासून मोठं झाल्यावर विनोदवीर बनायचं स्वप्न तो मनाशी बाळगून असतो.
मोठं झाल्यावर आपलं स्वप्न पूर्ण करायच्या उद्देशाने तो गावातील एका नावाजलेल्या विनोदवीर गुलाठीच्या हाताशी कामाला लागतो. त्याचे शो पाहतापाहता स्वतः व्यासपीठावर उभं रहायची तयारी करत असतो. पण ऐनवेळी गुलाठी त्याची टर उडवतो आणि हसमुख कधीही विनोदवीर बनू शकणार नाही म्हणून सुनावतो. त्यावेळी चिडलेला हसमुख रागाच्या भरात दारूच्या बाटलीने गुलाठीचा गळा चिरतो आणि त्याचं गुर्मीत व्यासपीठावर हजर होतो. हसमुख तो शो गाजवतो पण गुलाठीचा व्यवस्थापक असलेल्या जिमीला गुलाठीच प्रेत पाहून झालेल्या घटनेचा उलगडा होतो. पण पोलिसांच्या चौकश्यामध्ये अडकण्यापेक्षा तो हसमुखशी हातमिळवणी करतो आणि त्याला नवा विनोदवीर म्हणून व्यासपीठ मिळवून देतो. पण त्यानंतरच्या प्रत्येक शोमध्ये हसमुख व्यासपीठावर एक चकार शब्दही काढू शकत नाही. तेव्हा माशी कुठे शिंकतेय याचा विचार करताना दोघांच्या लक्षात येत की गुलाठीचा खून केल्यावर हसमुख उत्तम सादरीकरण करू शकलेला. थोडक्यात ज्याप्रमाणे गुलाठीला गरम भजी खाऊन सादरीकरण करायचा ‘फिल’ यायचा तसा हसमुखला खून करून ‘फिल’ मिळालेला. त्यामुळे नव्या शोसाठी जिमी त्याच्यासाठी कापायला म्हणून बकरा आणि कोंबड्याची सोय करतो. पण त्याने जे काम होत नाही ते त्याचवेळी हसमुखला खिजवायला आलेल्या काकाला मारून मात्र होतं.
या दोन प्रकरणानंतर हसमुख घाबरून पुन्हा व्यासपीठावर चढायला घाबरतो. पण ‘केवळ वाईट आणि दुष्ट लोकांनाच मारायचं’ या अटीवर जिमी त्याला तयार करतो. पुढे खून आणि विनोद हा हसमुखचा सिलसिला सुरु असताना त्याची चित्रफीत मुंबईकडे एका वाहिनीच्या हाती लागते आणि ते हसमुखला वाहिनीतील एका कार्यक्रमात सहभागी होण्यास आमंत्रण देतात. हसमुख आणि जिमी हे आमंत्रण स्वीकारून मुंबईत येतात आणि हसमुखचं आयुष्य पालटायला सुरवात होते. त्यासोबत त्याच्या खुनी कारवायासुद्धा कायम राहतात.
सिरीजमध्ये गुलाठी, हसमुखचे काकाकाकी, जिमी, वाहिनीचा स्त्रियांकडे आळशाभूत नजरेने पहाणारा मालक, कार्यक्रमाची आयोजक प्रोमिला आणि तिची सहाय्यक दिपिक्षा, स्पर्धक विनोदवीर केके आणि अजिंक्य अशी बरीच पात्र भेटतात. काही व्यक्तिरेखा त्याला मदत करतात तर काही विरोधात असतात. या सगळ्यांना सांभाळून खून करत लोकांच्या नजरेत न येण्याचं दिव्य हसमुख आणि जिमीला करायचं असतं. त्यात ही दोघं यशस्वी होतात का ते पाहण्यासाठी सिरीज पहावी लागेल.
गेल्या काही वर्षांमध्ये वीर दासने विनोदवीर म्हणून बरीच प्रसिद्धी मिळवली आहे. विशेषतः त्याच्या राजकीय टिपण्यासाठी तो ओळखला जातो. हसमुखच्या माध्यमातूनसुद्धा तो मोदी, ममता बॅनर्जी ते अगदी उत्तर प्रदेशातील पोलिसांवर टिपण्णी करण सोडत नाही. पण त्याचवेळी त्याच्या अभिनयावरील पकडसुद्धा वाखाणण्याजोगी आहे. कोणाशीही बोलताना बावरलेला पण खून करताना तितकाच शांत असलेला हसमुख हा बदल साकारताना त्याच्या अभिनयातील वैविध्य दिसून येतं. त्याच्या जोडीला रणवीर शोरी, मनोज पाहवा, रवी किशन, अम्रिता बागशी आणि दीक्षा सोनालकर अशी तगडी स्टारकास्ट आहे. त्यामुळे प्रत्येक भागांसोबत मालिका रंगत जाते. नवराबायकोच्या साध्याशा विनोदावर हसमुखला मिळणारी दाद असो किंवा गुलाठीचं भूत त्याच्या मानगुठीवर बसून हसणं असो या छोट्या प्रसंगातून मार्मिक टिपणी केली आहे. हसमुखच्या खून करण्याच्या मनोवृत्तीमागे लहानपणापासून त्याची झालेली कुचंबणा आणि त्यातून मनात खतखतणारा राग जबाबदार असतं. पण म्हणून तो निगरगट्ट होत नाही उलट प्रत्येक खून केल्यावर त्याच्या मनात पकडलो जाण्याची भीती असते. हसमुखच्यामागे लागलेल्या या खूनसत्रात त्याच्या मागे पोलिसांचा ससेमिरासुद्धा लागतो. काही भागांमध्ये कथानक संथ गतीने वाहत. तेव्हा सिरीजचा कंटाळा येतो. तसचं केके आणि हसमुखशिवाय इतर विनोद्विरांचा समावेश केला असता तर कथानकामध्ये खुसखुशीतपणा आला असता.