मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
परेश रावल… बहुरंगी, बहुआयामी, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व!!
एक हरहुन्नरी अभिनेता. एक परखड नेता. आणि एक अभिमानी पिता. या भूमिकांमधून परेश रावल परफेक्ट आहेत. चित्रपट सृष्टीत तब्बल 36 वर्ष त्यांचा दबदबा आहे. एका खलनायकाच्या भूमिकेतून त्यांची एन्ट्री झाली. पण केवळ खलनायकाच्या भूमिकांमध्येच ते अडकले नाहीत. जी भूमिका मिळाली त्याचं त्यांनी सोनं केलं. इन्स्पेक्टर तेजा म्हणून ते लक्षात राहीले. तसेच बाबूभैय्या म्हणूनही. आणि सरदारमध्ये त्यांनी तर आपल्या मनावर राज्य केलंय.
आज परेश एका अभिमानी वडीलांच्या भूमिकेत आहेत. त्यांचा मुलगाही चित्रपटसृष्टीत प्रवेश करतोय. वयाची पासष्ठी पार करणा-या या अभिनेत्याचा आज, 30 मे रोजी वाढदिवस आहे. या वयातही त्यांचे अनेक चित्रपट प्रदर्शनासाठी रांगेत उभे आहेत. परेश रावल कधी हिरोच्या भूमिकेत नव्हते. पण अनेक चित्रपटात ते हिरोपेक्षा जास्त भाव खाऊन गेले. या हरहुन्नरी कलाकाराच्या यशाचा आलेख कलाकृती मिडीयानं त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेतला. (Paresh Rawal)
परेश रावल मुळ मुंबईचेच… पार्ल्यात त्यांच बालपण गेलं आणि शिक्षणही झालं. त्यांच्या घराच्या बाजुलाच गुजराथी नाटकांचं सभागृह होतं. तिथे रात्री उशीरापर्यंत नाटकं व्हायची. त्या नाटकाच्या ओढीनं परेश या सभागृहात गेले. तिथे त्यांना नवीनभाई ठक्कर भेटले. त्यांना या लहानग्या परेशमध्ये काय दिसले ते माहित नाही, पण त्यांनी परेश यांना विनातिकीट नाटकाला येण्याची परवानगी दिली. त्याचा परिणाम असा झाला की, परेश थेट नाटकाच्या विंगेत जायचे.
हळूहळू सर्वच नाटकांची स्क्रीप्ट त्यांना तोंडपाठ झाली. मग स्टेजवरील एखाद्या कलाकराला प्रॉम्ट करायची वेळ आली तर परेशकडे ते काम सोपवलं जाई. या नाटकाचे सेटही त्यांना पाठ झाले होते. मोकळ्या वेळात परेश सेटही लावून देत असत. इथूनच रंगभूमीची ओढ त्यांना लागली. लक्षात घेण्यासारखं म्हणजे यावेळी परेश यांचं वय अवघं बारा वर्ष होतं.
शाळा आणि कॉलेजमध्ये असतांना नाटकात त्यांचा सहभाग असायचाच. नशिबाने त्यांना दोन्ही ठिकाणी शिक्षकांचे सहकार्य चांगले लाभले. अभ्यासापेक्षा अभिनयातच तुझी प्रगती आहे, तेच कर असं सांगून शिक्षकांनी परेश यांना पाठिंबा दिला. 1984 मध्ये रंगभूमीत रमलेला हा अभिनेता प्रथम पडद्यावर झळकला. होली हा चित्रपट पहिला. बॉलिवूडला जणू नवा व्हिलन मिळाला.
मग येणा-या प्रत्येक चित्रपटात परेश खलनायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आले. ह्या चित्रपटांची यादी केवढीतरी मोठी. मिर्च मसालामध्ये बेरकी गांवकरी, अर्जूनमध्ये अतिशय थंड डोक्यानं वावरणारा राजकारणी, नाम मधला राणा अशा अनेक भूमिका परेश यांनी केल्या. मरते दम तक, डकैत, सोने पे सुहागा, खरतों के खिलाडी, फलक, आखिरी अदालत, राम लखन, हथियार, शिवा, वर्दी, गुनाहो का देवता, क्रोध, आवारगी, स्वर्ग, गुनहगार, साथी, प्रेम कैदी, योद्धा, जुल्म की अदालत, जीना मरना तेरे संग, तिलक, दौलत की जंग, दुश्मन जमाना, दामिनी, किंग अंकल, फूल और अंगार, मुकाबला, कन्यदान, माया, दिल की बाजी, अंत, सर, रुप की रानी चोरो का राजा, मोहरा, लाडला, क्रांतिवीर, दिलवाले, अंदाज अपना अनपा, रावण राज, अकेले हम अकले तुम, मीलन, बाजी, मृत्यूदाता, गुप्त, जुदाई, गुलाम-ए-मुस्तफा, तमन्ना, अचानक, चायना गेट, सत्या, आ अब लौट चले, हसीना मन जायेंगी, खुबसूरत, वास्तव, हद कर दी आपने… अशी कधीच न संपणारी यादी. यापैकी बऱ्याच चित्रपटात परेश रावल यांच्या वाट्याला खलनायकाच्या भूमीका आल्या. बहुतेक चित्रपटात ते खूनशी स्वभावाचे इन्पेक्टर होते किंवा राजकरणी. तर कधी त्या राजकरण्यांचे पीए.
पण निगेटिव्ह भूमिका रंगवणारे परेश रावल हेराफेरीमध्ये पार बदलून गेले. धोतर आणि बंडी घातलेले. चष्मा म्हणून अक्षरशः मोठे भिंग घातलेले. थोडे कंबरेत वाकणारे. आणि भाडेकरुंच्या मागे पळणारे. बाबूभैया. या बाबूभैयानं इतिहास रचला. बाबू भैयासाठीच अनेकांनी कितीतरी वेळा पुन्हा पुन्हा हेरा फेरी बघितला. आताही हा चित्रपट टिव्हीला लागला की नवीन म्हणून पाहिला जातो. त्याचा आनंद घेतला जातो.
याच परेश रावल यांनी सरदारही केला. सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका करायची असेल तर परेश रावलच असं समीकरण झालं. हंगामामध्ये त्यांनी हंगामा केला. धोतर घालून वावरणारा उद्योगपती राधेश्याम तिवारी. साधा भोळा. बायकोबरोबर कचाकचा भांडणारा. दीवाने हुए पागलमध्ये त्याचा टॉमी असाच रंगला. वेलकमचा डॉक्टर घुंगरू. वेलकमचे अनेक भाग आले तरी डॉक्टर घुंगरु परेशच असणार हे हेही नक्की झालं.
=====
हे देखील वाचा: बॉलीवूडचे स्टंट मॅन ‘वीरु देवगण’ यांनी असे दिले आपल्या मुलाला ॲक्शन सीनचे धडे…
=====
चिनी कम मध्ये जावयापेक्षा आपण लहान म्हणून अस्वस्थ असणारा सासरा. अतिथी तुम कब जाओगेमध्ये त्रस्त करणारा लंबोदर चाचा आणि रेडीमधील बलिदान भारद्वाज. तसेच टायगर जिंदा है, संजू मधील भूमिकाही खासच आहेत. उरी – दी सर्जिकल स्ट्राईकमधील हुबेहुब अजित डोवल प्रेक्षकांना खूपच भावले.
परेश यांची अभिनयाची. भूमिकांची यादी मारुतीच्या शेपटीप्रमाणे आहे. कधीही न संपणारी. आताही लॉकडाऊननंतर कोणत्या अभिनेत्याचे सर्वाधिक चित्रपट प्रदर्शित होतील, तर तो अभिनेता परेश रावलच आहे. चित्रपटाचा आलेख उंच होत असतांना त्यांचे वैवाहीक जीवनही सुरु झाले. अभिनेत्री आणि मिस इंडिया स्वरूप संपत यांच्याबरोबर त्यांनी लग्न केले.
परेश यांना आदित्य आणि अनिरुद्ध अशी मुलं आहेत. त्यांचा मोठा मुलगा आदित्य चित्रपटाच्या दुनियेत येत आहे. लेखनाची आवड असलेला आदित्य रावल डिजिटल प्लॅटफॉर्ममधून अभिनयाच्या दुनियेत येत आहे. आदित्यनं चित्रपटाच्या स्क्रीप्ट लिखाणाबाबत परदेशात शिक्षण घेतलं आहे. आता ज्या चित्रपटाचं स्क्रीप्ट त्यांनी लिहीलं त्यातच तो हिरो म्हणून काम करतोय.
अभिनेत्याकडे नसतो तो एक गुण परेश रावल यांच्याकडे आहे, तो म्हणजे स्पष्टवक्तेपणा. परखडपणा. त्यातून हा अभिनेता खासदारही झाला. गुजरातच्या पूर्व अहमदाबादमधून ते बहुमतांनं निवडून आले. बरं एकदा खासदार झाल्यावर पुन्हा त्याच जागेसाठी अट्टहास करण्याची वृत्तीही नाही. पक्षांनं दिलंय तेवढं खूप आहे. जास्तीचा अट्टाहास नकोच ही राजकारणात न दिसणारी वृत्ती. परेश रावल हे खरचं वेगळे होते हे यावरुनच स्पष्ट होते.
=====
हे देखील वाचा: हेराफेरी चित्रपटात सुनील शेट्टीएवजी संजय दत्त साकारणार होता शाम ही भूमिका…
=====
या हरहुन्नरी अभिनेत्याचा पद्मश्री ने गौरव करण्यात आला आहे. परेश तीन वेळा फिल्म फेअरचे मानकरीही ठरले आहेत. अभिनेता म्हणण्यापेक्षा चांगला माणूस म्हणून आपली ओळख असावी एवढीच त्यांची इच्छा आहे. ओ माय गॉ़ड आठवतोय का. परेश रावल तसेच आहेत. जगाकडे कुठलाही चष्मा न घालता बघणारे. कुणाच्याही आधाराशिवाय आपली लढाई आपणच लढणारे. या अभिनेत्याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा…
1 Comment
Khup chhan lekh