सुरेल गळ्याची गायिका
विविध कार्यक्रमांमधून आपण सर्वांनी तिला बघितलेलं आहे.टेलिव्हिजन शोज , रेकॉर्डिंग , लाईव्ह मैफली सर्वच माध्यमातून आपण तिच्या गाण्यांना दाद दिली आहे.आयडिया सारेगमपमधूनसुद्धा आपण तिचा आवाज अनुभवला आहे. अशी गोड गळ्याची गायिका म्हणजे केतकी भावे जोशी. आज मुंबईतील आघाडीची गायिका म्हणून आपण सर्वजण केतकीला ओळखतो. भावपूर्ण आणि सुरेल गाण्यांसाठी केतकी ओळखली जाते.
केतकीचं बालपण माटुंग्यातलं लहानपणापासूनच तिला गाण्याची आवड होती. घरातच तिच्यात गाण्याचे संस्कार झाले आणि आज त्यामुळेच एक प्रसिद्ध गायिका म्हणून आपण तिला ओळखतो. केतकीची आई सुधा भावे यांनी स्वतः गाण्याचे शिक्षण घेतलेले. लहानपणी केतकीची आई तिच्याकडून गाणी बसवून घेत असे. तसेच लहान मुलांची नाटक बसवून तिची आई चारही बहिणींना आकाशवाणीला घेऊन जायची. बालदरबार या कार्यक्रमात तर केतकीने अनेकदा सादरीकरणसुद्धा केलेलं आहे. त्यामुळे त्यातूनच गाण्याचे संस्कार हळू हळू केतकीला मिळाले.घरी होणारं दत्ताचं भजन, बाबांची गाण्यातील आवड , बहिणींचा पाठिंबा आणि शिकायला मिळणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी यामुळे तर गाणं अधिकचं खुललं.
आकाशवाणीमध्ये केतकीच्या लहानपणीचा एक किस्सा आहे. त्यावेळी रेकॉर्डिंग असताना काही कारणाने केतकीचा आवाज लागला नव्हता. त्यामुळे तेथील अधिकाऱ्यांनी केतकीच्या आईला सांगितलं की हिचा आवाज गाण्यायोग्य नाही. त्यावेळी तिच्या आईला आणि केतकीला वाईट वाटलं होतं. आज पुढे जाऊन केतकी आकाशवाणीची ग्रेडेड आर्टिस्ट तर आहेच पण आकाशवाणीच्या अनेक उपक्रमांसाठीसुद्धा ती गात असते त्यामुळे त्यावेळीची ती आठवण पुसण्याचं समाधान असल्याचं केतकी सांगते.
शालेय शिक्षण झाल्यानंतर साचेबद्ध शिक्षणात अडकण्याची केतकीची इच्छा नव्हती. त्यामुळे एसएनडीटी मधून संगीत हा विषय घेऊन तिने पदवी घेण्याचे ठरवले. त्याचवेळी तिच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट आला. तो म्हणजे यशवंत देव यांचे मिळालेले मार्गदर्शन . पंडित यशवंत देव यांचा सुगम संगीताचा कोर्स करावा असं केतकीच्या आईने तिला सुचवलं.त्यातूनच पुढे केतकीच्या गुरू वर्षा भावे यांच्याशी तिची ओळख झाली. शास्त्रीय संगीताचे शास्त्रोक्त शिक्षण वर्षा भावेंकडे तिने घेतलं. त्यातूनच संगीतात एम ए, गांधर्व महाविद्यालयातून विशारदची पदवी तिने मिळवली. आज उत्तम शब्दोचार , आवाजाची फेक , प्रत्येक गाण्याचा आवाज ओळखून त्यानुसार आवाज लावण्याची लकब यांसारख्या गुणांमुळे केतकी एक आघाडीची गायिका म्हणून ओळखली जाते आहे.
केतकी जवळपास गेली १२ वर्षे वर्षा भावे यांच्याकडे शिक्षण घेत आहे. त्याचबरोबर सध्या ती प्रभाकर कारेकर यांच्याकडेसुद्धा शिक्षण घेत आहे. याशिवाय यशवंत देव यांच्याकडे अनेक वर्षे तिला मार्गदर्शन मिळाले आहे. यशवंत देव यांच्यामुळे कॉलेजच्या काळात केतकीला भावपूर्ण गाणे , गाण्यातील बारकावे आणि बऱ्याच गोष्टी आपोआप समजल्या आणि त्याचा तिला आजही फायदा होतो.
यशवंत देव यांच्याप्रमाणेच संगीतकार श्रीनिवास खळे यांचा सहवास केतकीला लाभला. केतकीला संगीत संयोजक कमलेश भडकमकर यांच्यामुळे श्रीनिवास खळे यांच्या भेटीची संधी मिळाली. त्यावेळी त्यांच्यासमोर जाहल्या काही चुका हे गाणं केतकीने सादर केले. खळे काकांनी तिच्या लय आणि तालाची समज असण्याचे कौतुक त्यावेळी केले होते. ती दाद मोठी असल्याचे केतकी सांगते.
इटीव्ही चॅनलच्या स्वरसंग्राम कार्यक्रमामध्ये ती झळकली होती. त्याचबरोबर आयडीया सारेगमपमध्ये तिच्या गाण्याचे कौतुक झाले होते. अरुण दाते, श्रीधर फडके, द्वारकानाथ संझगिरी, स्वप्नील बांदोडकर, सचिन खेडेकर यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांसोबत केतकीने गायन केले आहे. याचबरोबर प्रथा, सामगान या व्यासपीठावरसुद्धा शास्त्रीय संगीताचे सादरीकरण तिने केले आहे.कार्यक्रम छोटा असो किंवा मोठा रसिकांना तितक्याच ताकदीने आणि तयारीने केतकी सामोरी जाते आणि सहजतेने रसिकांची दाद मिळवते.कलाकार छोटा असो किंवा मोठा सर्वांशी आपलेपणाने वागून कार्यक्रम यशस्वी करण्याचा केतकीचा नेहमीच प्रयत्न असतो असे कलाकार सांगतात. आकाशवाणी , सह्यादी,या व्यासपीठांवर केतकीने सादरीकरण केले आहे.
राजश्री सोल या चॅनल वरील भक्तीगीते, नाईन एक्स वाहिनीवरील सुरमई या कार्टूनला दिलेला आवाज आजही रसिकांच्या लक्षात असून याच वेगळेपणासाठी केतकी ओळखली जाते. याशिवाय वेगवेगळ्या भाषेतील रेकॉर्डिंग , लहान मुलांच्या आवाजांचं डबिंग यासाठीही केतकी ओळखली जाते.
पती अभिजित जोशी , आई बाबा , संपूर्ण जोशी कुटुंबीय या सगळ्यांचा मोलाचा पाठिंबा आणि मार्गदर्शन तिला नेहमीच मिळत आहे. अभिजीत स्वतः संवादिनी वादक आहे तर केतकीची मुलगी स्वरासुद्धा गाण आणि नृत्याचे धडे गिरवत आहे. या सगळ्यांच्या मदतीने केतकीचा सांगीतिक प्रवास सुरु आहे.
एक गोड गळ्याची गायिका म्हणून आपण सगळेच तिला ओळखतो. याचबरोबर तिच्या परफेक्शनची दाद रसिक श्रोते आणि सर्व आयोजक मंडळी देतात. केतकीचा हा सुरेल प्रवास असाच सुरू राहू दे या कलाकृती परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा
आदित्य बिवलकर