एकाच या जन्मी जणू…
एकाच या जन्मी जणू…
अनेक मालिकांची शीर्षके पाहिली की, ती शीर्षके म्हणजे एखाद्या अतिशय गाजलेल्या लोकप्रिय गाजलेल्या गीताची ओळ असते, हे लक्षात येते . मग मनात प्रश्न येतात की, जेव्हा एखाद्या गीतकाराला त्या मालिकेचे शीर्षकगीत करायला सांगितले जाते ते त्याच्यासाठी किती मोठे आव्हान असेल.
असाच एक किस्सा आहे झी मराठीवरील ‘एकाच या जन्मी जणू ‘ या मालिकेच्या शीर्षकगीताचा. हे शीर्षक वाचल्यावर आपल्याही पटकन डोळ्यासमोर येते ते म्हणजे सुधीर मोघे यांनी ‘पुढचं पाऊल’ या चित्रपटासाठी लिहिलेले ‘एकाच या जन्मी जणू ,फिरुनी नवी जन्मेन मी’ हे गीत. गीतकार अश्विनी शेंडे हिला झी मराठीवरील ‘एकाच या जन्मी जणू’ या मालिकेचे शीर्षकगीत लिहायला सांगितले गेले. निलेश मोहरीर या शीर्षकगीताला संगीत देणार होता. गंमतीची गोष्ट ही, की या मालिकेच्या आधी अश्विनीनेच दुसऱ्या एका वाहिनीसाठी ‘फिरुनी नवी जन्मेन मी’ असे शीर्षक असलेल्या मालिकेचे शीर्षकगीत लिहिले होते आणि त्याला संगीत निलेश मोहरीरचेच होते.
अश्विनीने सहज म्हणून सुधीर मोघे यांच्या गीताचे शब्द आठवले आणि तिच्या मनात थोडेसे दडपण आलं की याच शीर्षकासाठी नवीन शब्द कसे लिहायचे? मग तिला निलेशचे शब्द आठवले; निलेशने तिला सांगितले होते की, जुन्या गाजलेल्या गीताचे शब्द आठवत बसू नको ,उगाच दडपण येत राहील. तिने मनाच्या पाटीवरून तात्पुरते ते प्रसिद्ध गीत बाजूला ठेवले. समोर जंगलातले प्राणी तळ्यावर येतात आणि संशोधक त्यांच्या पावलांच्या ठशांचा मागोवा घेत आहेत, असे दृश्य आले. अश्विनीने वही काढून शब्द लिहिले,
“मनाच्या तळ्यावरती आठवांचे पक्षी आले..
तुझ्या जुन्या पाऊलखुणा, त्यात माझे ठसे ओले.. “
अश्विनीला त्या शब्दातून पुढचा फ्लो मिळत गेला आणि गाण्याचा मुखडा झाला .तिने तो निलेशला ऐकवला. निलेशलाही या ओळी आवडल्या. पुढे गाण्याचे कडवे तयार झाले. गायिका वैशाली सामंत ते गीत गाणार होती ,हे म्हटल्यावर अश्विनीचा उत्साह अधिकच वाढला. पुढे शब्द सुचले..
“ओळखीचे अनोळखी एक नाव ओठावर..
सुख उतू जाता जाता ,थांबले रे काठावर.. “
शीर्षकगीतात ही ओळ नाही आहे, ही ओळ पूर्ण गाण्यात आहे. या मालिकेची नायिका तेजस्विनी पंडित होती. अश्विनी म्हणते की, या गाण्यात ‘गायिका’ वैशाली आणि ‘नायिका’ तेजस्विनी यांचा जसा ‘जीव’ आहे, तशा या गाण्यातील कडव्यातील ओळीमध्ये अश्विनीचा जीव आहे.तिच्या आयुष्यात तिने लिहिलेले हे सर्वात आवडते शीर्षकगीत आहे.