दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
स्ट्रगलर ते सुपरस्टार मकरंद अनासपुरे
औरंगाबादमध्ये राहताना ‘रंगकर्मी’ या नाट्यसंस्थेसाठी मकरंद यांनी जवळपास ४००-५०० पथनाट्यं केली. या पथनाट्यासाठी जाताना मकरंद कधीच नाटकासाठी लागणारी प्रॉपर्टी घेऊन जात नसत. ज्या गावात प्रयोग असेल तिथंच जाऊन गप्पा मारता मारता..”मामा तुमची टोपी जरा देता? किंवा दादा मफलर भारीय राव..नाटकापुरता द्या की!” अशा गप्पागप्पातून नाटकाची प्रॉपर्टी गोळा होई.
ग्रामीण बोली, संवाद कौशल्य, हजरजबाबीपणा अशा अनेक गोष्टी त्यातून मकरंद यांना शिकता आल्या. त्यांच्या अभिनयात उत्स्फुर्तपणा आला. पण औरंगाबादवरुन आपलं नशीब आजमावण्यासाठी ते जेव्हा मुंबईत आले तेव्हा सुरुवातीपासून त्यांच्या वाट्याला आला तो संघर्ष!
आमदार निवास येथे राहण्याची सोय झालेल्या मकरंद यांना सीएसटीएम स्थानकावरून १५-२० मिनीटावरचे आमदार निवास शोधायलाच अडीज तास लागले. घरुन फक्त ५०० रु घेऊन मुंबईत नशीब आजमावण्यासाठी आलेल्या मकरंदच्या खिशात तंगी असायची. पण तो काळ शिकण्याचा होता. अनेक नाट्यस्पर्धा गाजवलेल्या मकरंद यांच्या अभिनयकौशल्याची अनेक दिग्गजांना जाणीवही होती. त्यातील चेतन दातार,वामन केंद्रे यांच्या कृपेने मकरंद यांना अनेक नाटकं विनापैशात पाहता आली.
नाटक पाहायला जाण्यापर्यंतचा किंवा काम शोधायला जाण्यासाठीचा प्रवास स्वखर्चाने करावा लागे. कधी कधी त्यासाठीही पैसे नसत.पास संपलेला असे. अशावेळी विनातिकीट प्लॅटफॉर्मवर उतरल्यावर टिसी असल्यास एक नाटक मकरंद आणि त्यांच्या सोबतचा होतकरू मित्र दोघे हमखास वठवत.एकजण स्टेशन जवळ आलं की आपल्या पॅण्टचा पट्टा काढून हातात गुंडाळत असे आणि दुसरा धावत सुटत असे.हातात पट्टा असणारा धावणा-याच्या मागे शिव्या देत भांडण झालंय असं नाटक वठवत जोरात पळत असे. असं धावतपळत स्टेशनबाहेर आलं की टिसीला टाळता येई. आलटुन पालटुन दोघं हे नाटक वठवत अशी आठवण मकरंद यांनी एका मुलाखतीत व्यक्त केली होती.
त्यानंतर ‘झालं एकदाचं’ या सुयोगच्या नाटकात मोजून ७ मिनीटांची मिळालेली भूमिका असो किंवा नंतर ‘जाऊबाई जोरात’ नाटकाने दिलेला मोठा ब्रेक असो….मकरंद अनासपुरे यांचा प्रवास सुपरहिट पदाच्या दिशेने निश्चितच झाला पण या प्रवासातील हे खाचखळग्यांनी भरलेले अनुभव नवोदित कलाकारांना खूप काही शिकवणारे आहेत. रातोरात कुणीही सुपरस्टार होत नाही.त्यासाठी मेहनत, चिकाटी, जिद्द लागते. आणि ती असेल तर मकरंद अनासपुरेंनी केलं तसं यशाचं शिखर सर होतंच होतं.