दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
सुपरहिट सिनेमांचा जादुगार – महेश कोठारे
नाट्य अभिनेता अंबर कोठारे यांचे सुपूत्र असणा-या महेश कोठारे यांचं बालपण कलापूर्ण वातावरणात गेलं.आई वडील दोघंही थिएटर आर्टीस्ट होते. महेश यांच्या वडिलांनी एका नाटकाची निर्मिती केली होती ज्याचं नाव होतं ‘जेथे जातो तेथे’. त्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक गजानन जहागीरदार यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याचे ठरवले. लहानग्या महेश कोठारे यांनी वडिलांकडे हट्ट धरला, मलासुद्धा सोबत न्या. अंबर कोठारे, दिग्दर्शक दत्ता भट यांच्यासोबत कॅडल रोड येथील गजानन जहागीरदार यांच्या बंगल्यावर महेश कोठारे गेले. आणि त्यांना पाहताच गजानन जहागीरदार म्हणाले, “ मला माझा ‘छोटा जवान’ सापडला”. इथून बालअभिनेता म्हणून महेश कोठारे यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात झाली. अनेक चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून प्रेक्षकांची मने जिंकली. मेरे लाल, छोटा भाई, राजा और रंक, हे त्यापैकीच काही चित्रपट. राजा और रंक मधील “ तू कितनी अच्छी है,तू कितनी भोली है” हे महेश कोठारे यांच्यावर चित्रित गीत आजही अनेकांना आठवत असेल. बालकलाकार म्हणून काम गेल्यावर अगदी तरुणपणी महेश कोठारे यांनी केलेल्या घरचा भेदी ,लेक चालली सासरला, थोरली जाऊ या चित्रपटातील भूमिका थोड्याशा खलनायकी स्वरुपाच्याही होत्या. या दरम्यान महेश यांचे काही चित्रपट फारसे चालले नाही. इथे महेश यांनी त्यांच्या एल.एल.बी शिक्षणाचा पूर्ण उपयोग करत काही काळ चक्क वकीली केली.
त्यानंतर आले १९८५ साल. तरुण वयात अभिनय आणि प्रौढ झाले की दिग्दर्शन हे गणित पूर्ण मोडत महेश कोठारे अगदी उमेदीच्या काळात चित्रपटदिग्दर्शनाकडे वळले. पहिल्यापासून त्यांना चित्रपटदिग्दर्शन करण्याची इच्छा होती. हिंदीतील ‘प्यार किए जा’ हा चित्रपट मराठीत तयार करता येऊ शकतो असं महेश यांना मनापासून वाटत होतं. शशी कपूर यांच्या भूमिकेसाठी स्वत:, किशोर कुमार यांच्या भूमिकेसाठी अशोक सराफ असं गणित त्यांच्या डोक्यात पक्कं होतं.पण हिंदीतील मेहमूद यांच्या भूमिकेसाठी तितकाच तगडा कलाकार हवा असं महेश यांना वाटत होतं. त्यादरम्यान एक घटना घडली. महेश यांचे आई-वडील आयएनटीचे कलाकार होते. ‘झोपी गेलेला जागा झाला’ या सुप्रसिद्ध मराठी फार्समधील हरहुन्नरी कलाकार बबन प्रभू यांचे त्यावेळी निधन झाले होते. त्यांना श्रद्धांजली म्हणून या नाटकाचा प्रयोग करण्याचे आयएनटीने योजले. या प्रयोगाला महेश यांनी हजेरी लावली. त्या प्रयोगात त्यांची भेट झाली अशा व्यक्तीमत्वाशी की ‘प्यार किए जा’ मधील मेहमूद यांची भूमिका करणारा मराठी कलाकार महेश यांना गवसला. जो पुढे जाऊन त्यांचा जिगरी दोस्त बनला. बबन प्रभू यांची भूमिका साकारणारा तो कलाकार होता लक्ष्मीकांत बेर्डे. पहिल्याच भेटीत महेश यांनी लक्ष्मीकांत यांना ‘लक्ष्या’ संबोधत आपल्या चित्रपटाविषयी सांगीतलं. त्यावेळी महेश यांचा ना स्क्रीन प्ले तयार होता ना फायनान्सर. पणायनिंग अमांऊंट म्हणून महेश यांनी लक्ष्मीकांत यांना एक रुपया दिला.लक्ष्मीकांत यांनीही तो गंभीरपणे स्वीकारला. हाच रिअल लाईफ सीन या चित्रपटात महेश यांनी खुबीने वापरला आहे. महेश कोठारे यांना दिग्दर्शक म्हणून ओळख मिळवून देणारा हा चित्रपट होता ‘धुमधडाका’.
त्यानंतर धडाकेबाज,थरथराट,दे दणादण, धांगडधिंगा,माझा छकुला, झपाटलेला, पछाडलेला, खतरनाक, खबरदार, जबरदस्त, जीवलगा, चिमणी पाखरे, शुभ मंगल सावधान अशी यशस्वी चित्रपटांची रांगच लागली. महेश कोठारे-लक्ष्मीकांत बेर्डे ह्या मराठी चित्रपटातील सुपरहिट जोडीने महाराष्ट्र गाजवला. दिग्दर्शक महेश कोठारे, चित्रपटात नायक असणारा इन्स्पेक्टर महेश जाधव आणि लक्ष्या यांचं समीकरण लोकांना भावलं. त्यांचा “डॅम इट” हा संवाद तर आजही लोकप्रिय आहे.
या सगळ्या प्रवासात महेश कोठारे यांची चित्रपटातील तंत्रावरची हुकुमत विशेष लक्षवेधी आहे. त्यांचा ‘धडाकेबाज’ हा मराठीतील पहिला सिनेमास्कोप चित्रपट. ‘चिमणी पाखरे’ या चित्रपटाद्वारे मराठीत पहिला डिजीटल डॉल्बी साऊंड आला. ‘झपाटलेला दोन’ मधून मराठी प्रेक्षकांनी पहिल्यांदा थ्रीडी सिनेमा अनुभवला.
महेश कोठारे यांच्या चित्रपटातील खलनायक हे तर विशेष अभ्यासाचा विषय! धडाकेबाजमधली ‘कवट्या महाकाळ’चा मेकअप आणि एंट्रीचं म्युझिक आजही आठवते. ‘झपाटलेला’ मधील तात्या विंचूच्या रूपाने पहिल्यांदा बाहुला खलनायक बनला. दिलीप प्रभावळकर यांचा प्रभावी आवाज आणि ‘ओम फट् स्वाहा’ची क्रेझ आताच्या पिढीतही आहे. माझा छकुला मधील टकलू हैवान किंवा ‘पछाडलेला’ मधील “ सूड दुर्गे सूड” म्हणणारा इनामदार… महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दमदार फॅन्सी खलनायक दिले.
काही कलाकार पुरस्कारांवर पुरस्कार जिंकून समीक्षक आणि जाणकार रसिकांची दाद मिळवतात तर काही कलाकार प्रेक्षकांची नस ओळखून अगदी तळागाळातील प्रेक्षकांनाही आनंदानुभव देतात. महेश कोठारे यांनी मराठी चित्रपट रसिकांची नाळ मराठी चित्रपटांशी अखंड जोडून ठेवली. प्रेक्षकांच्या हाताला धरुन त्यांना चित्रपटगृहात आणण्याचे महत्त्वपूर्ण काम महेश कोठारे यांनी केलं. त्यांच्या जन्मदिनी त्यांची ही कारकीर्द आठवताना त्यांचे सगळे चित्रपट डोळ्यांभोवती तरळतात आणि आपसूकच ओठांवर शब्द येतात. “डॅम इट! हे व्यक्तिमत्व तर त्यांच्या कामातून चिरतरुण आहे”. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा महेश सर!