‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
घरगुती हिंसाचाराला सणसणीत ‘थप्पड’
चित्रपट बनतो, प्रदर्शित होतो, गाजतो किंवा पडतो. पण त्यापलीकडे चित्रपटाचं घडणं हा दरवेळेस नवा अनुभव असतो. जाणून घेऊया अशाच काही चित्रपटांचं मेकींग आणि पडद्यामागील चटपटीत किस्से.
उद्यापासून सुरु होणा-या नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक स्त्रीप्रधान चित्रपट आपल्याला आठवू लागतात.त्यातला अगदी अलीकडचा म्हणजे ‘थप्पड’. तापसी पन्नू, प्रवीण गुलाटी, कुमुद मिश्रा, रत्ना पाठक-शहा, तन्वी आझमी,राम कपूर,दिया मिर्झा अभिनीत आणि अनुराग सिन्हा दिग्दर्शित हा चित्रपट २८ फेब्रुवारी २०२० ला प्रदर्शित झाला.
चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी एक छोटासा गैरसमजही झाला होता. चित्रपटाचं शुटिंग सुरू असताना तापसीने सुप्रसिद्ध लेखिका अमृता प्रीतम यांचं एक विधान शेअर केलं होतं. when man denies the power of women, he is denying his own subconscious. शिवाय स्वत:च्या फोटो सोबत “एका अमृताकडुन दुसऱ्या अमृताकडे वळताना’ असेही विधान केले होते. ते वाचून अनेकांचा समज झाला की तापसी पन्नू अमृता प्रीतम यांच्या जीवनावर आधारित चित्रपट करतेय. प्रत्यक्षात ‘थप्पड’ मधील तापसूच्या पात्राचं नाव अमृता होतं.
या चित्रपटातील महिलांच्या सन्मानाचा आशय पहाता हा चित्रपट महिला दिनाच्या आसपास म्हणजे ६ मार्चला प्रदर्शित होणार होता. तुमचा महिला दिन थप्पड पाहून सेलीब्रेट करा. तुम्ही थिएटरमध्ये या आणि पुरुषांनाही सोबत घेऊन चित्रपट पहा अशा आशयाचे ट्विट चित्रपटाशी निगडित मंडळींनी केली होती. पण त्याच तारखेला बहुचर्चित बाघी ३ प्रदर्शित होणार होता. आपापसात तारखा धडकू नयेत म्हणून थप्पडच्या प्रदर्शनाची तारीख एक आठवडा आधी करण्यात आली आणि चित्रपट फेब्रुवारी २२ ला चित्रपटगृहात झळकला.
हेही वाचा : रेखाचा पहिला सिनेमा !
त्याआधी चित्रपटाच्या टिझरबाबतीत घडलेली खास गोष्ट म्हणजे या टिझरमध्ये तापसीच्या थोबाडीत बसण्याच्या प्रसंगानंतर स्वत: तापसीच हा व्हिडिओ रिपोर्ट करा, घरगुती हिंसाचार निष्क्रीयपणे पाहू नका असा सल्ला देत होती. चित्रपट महिलांवरील शारीरिक हिंसाचाराविषयी भाष्य करणारा असला तरी चित्रपटात एका थपडेने जोडप्यात निर्माण झालेला वाद दिसतो. त्यामुळे ती एक थप्पड चित्रीत करणं आवाहन होतं. म्हणजे त्या एका थपडीत चित्रपटाचं सा्रं संचित असणार होतं. चित्रपटाच्या नावातच थप्पड असल्याने ती खरीखुरी असणार याची पूर्ण कल्पना दिग्दर्शकाने तापसीला दिली होती.
तापसी ने स्वत:च्या मनाची पूर्ण तयारी केली होती. पण चित्रपटात नव-याचं पात्र साकारणारा प्रवीण गुलाटी मात्र अस्वस्थ होता. ज्या दिवशी ते शुटिंग होणार होतं तेव्हा तो इतका अस्वस्थ झाला की सेटवरच्या सगळ्यांना तो आजारी वाटू लागला. प्रत्यक्ष सीन शुटच्या वेळी त्याला कसंतरीच होत होतं. या सीनचे ७ टेक झाले. पहिला टेक ओकेच होता पण पुरुष एखाद्या स्त्रीला कोणकोणत्या अॅन्गलने थोबाडीत मारु शकतो हे पूर्ण डिटेल्स सकट अनुभव सिन्हा यांना चित्रीत करायचे होते. त्यामुळे ही थप्पड तापसीला एक दोन नव्हे तर सातवेळा खावी लागली. तिचा चेहरा लालबुंद झाला होता. ७ टेकनंतर सीन ओके झाल्यावर प्रवीणला हुश्श झालं. चित्रपटात दिसणारी ती थप्पड इतकी प्रभावी होण्याचं कारण हे या मेहनतीत दडलेलं आहे.
हा चित्रपट समीक्षक प्रेक्षक दोघांच्या पसंतीस उतरला पण त्याचा सामाजिक परिणामही तितकाच महत्त्वाचा होता. राजस्थान पोलीसांनी याच सिनेमाचं पोस्टर शेअर करताना त्यावर घरगुती हिंसाचार विरोधी हेल्पलाईनचा नंबर शेअर केला. आपल्याकडील स्त्री अत्याचारासंबंधी मानसिकता पहाता ह्या चित्रपटाने घरगुती हिंसाचार, पुरुषी मानसिकतेचे अनेक कंगोरे अजिबात आक्रस्ताळेपणा न करता संयतपणे मांडले. स्त्रीशक्ती, स्त्रीगौरव याविषयी सुंदर अभिव्यक्ती करणा-या चित्रपटांत ‘थप्पड’चं नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल ते याचमुळे.