‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
कहानीमागची कहाणी
नवरात्री, दुर्गापूजेच्या दिवसांत मेजर आठवणारा सिनेमा ‘कहानी’.
गूढ थरारपट म्हणून कहानी चित्रपटाचा एक खास फॅनक्लब आहे. ९ मार्च २०१२ ला ‘कहानी’ प्रदर्शित झाला. सुजोय घोष दिग्दर्शित विद्या बालन अभिनीत हा चित्रपट स्त्रीशक्तीची कथा खूप वेगळ्या प्रकारे सांगतो.
हा चित्रपट कोलकत्यात घडतो. कोलकाता हे या चित्रपटातलं एक पात्र आहे. बंगाली अभिनेता प्रोसेनजित चॅटर्जी यांनी सुजॉय यांना कोलकाता येथे शूटिंग करण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं.वास्तविक कोलकता हे शहर निवडण्यामागे सुजॉय घोष यांची काहीशी अगतिकता होती. दिल्ली आणि मुंबईपेक्षा कोलकातामध्ये चित्रपट शूटिंग करणं हे बजेटच्या दृष्टीने सोयीस्कर होतं.
बजेटची एवढी अडचण का होती? तर सुजॉय घोष यांचा आधीचा २००९ साली प्रदर्शित झालेला ‘अलादीन’ हा चित्रपट फारसा चालला नव्हता. ‘होम डिलिव्हरी’ या चित्रपटालाही फारसे यश प्राप्त झालं नव्हतं. त्यामुळे ‘कहानी’ला निर्माता मिळणं कठीण झालं. त्याशिवाय अन्य तीन महत्त्वाची कारणं म्हणजे एक तर गरोदर स्त्रीला हिरोइन म्हणून प्रेक्षक कसे स्वीकारतील याबद्दल शंका होती. दुसरं म्हणजे चित्रपटात विद्या बालन आणि काही अन्य पात्र वगळता नवोदित किंवा अनोळखी बंगाली कलाकारांनी भरलेला चित्रपट पहायला लोक येतील का? हाही प्रश्न होता आणि तिसरं कारण कोलकत्ता सारख्या शहराचा बॅक ड्रॉप. यातही यशराज फिल्मने चित्रपट निर्माण करण्याची तयारी दर्शवली पण सुजॉय घोष यांनी यशराज फिल्मसाठी पुढे तीन फिल्मचा करार करावा अशी त्यांची अट होती; जी सुजॉय घोष यांनी नाकारली.
चित्रपटाची जुळणी करतानाच सुजॉय घोष आणि चित्रपटाची लेखिका अद्वैता काला यांच्या डोळ्यांसमोर विद्या बालन हेच नाव लीडसाठी होतं.
हा स्त्रीप्रधान चित्रपट विद्या आपल्या खांद्यावर उत्तम तोलू शकते याची त्यांना खात्री होती. मात्र चित्रपटांची स्टोरीलाईन ऐकून विद्याने चक्क नकार दिला. तिला पूर्ण स्क्रीप्ट वाचून दाखवल्यावर तिचं मत बदललं. राणा ही सहायक पोलीसाची भूमिका साकारणारा परमब्रता चॅटर्जी याने विद्यासोबत आधी काम केलेलं असल्याने फारशी अडचण आली नाही. पोलीस अधिकार्याच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दिकी याला जेव्हा भूमिकेसाठी विचारण्यात आलं तेव्हा बॉलिवूडमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका करणाऱ्या नवाजुद्दीनला चक्क भिका-याची भूमिका न देता आपल्याला पोलीस अधिकारी म्हणून निवडलं गेलं याचा आनंद झाला. बॉब विश्वास ही सिरीयल किलरची भूमिका शाश्वता चॅटर्जी या बंगाली अभिनेत्याने उत्तम साकारली. खलनायक म्हणून अगदी सामान्य माणसाचा चेहरा निवडण्यामागे सुजॉय यांचा असा विचार होता की, चित्रपटाच्या कथानकानुसार हा सीरियल किलर तुमच्या आमच्याभोवती कुठेही असू शकतो.
पात्रांची अशी जुळवाजुळव झाल्यानंतर प्रत्यक्ष भूमिका साकारण्यासाठी विद्या बालनने गरोदर स्त्रीच्या या भूमिकेसाठी प्रोस्थेटिक मेकअपची प्रॅक्टिस केली. ती स्वतः डॉक्टरांना तसेच अनेक गरोदर स्त्रियांना भेटली. कॉलेजमध्ये असताना स्टँड अप एक्टिंगमध्ये विद्या अनेकदा गरोदर स्त्रीची नक्कल करत असे त्याचा या पात्रासाठी तिला उपयोग झाला.
कहानीच्या शूटिंगची एक वेगळीच गंमत होती. शूटिंग बजेट कमी असल्याने गरीला फिल्ममेकिंग तंत्राचा वापर या शुटसाठी करण्यात आला. रियल लोकेशनवर फारशी साधनं उपलब्ध नसताना सेट वगैरेची भानगड न करता हे शूटिंग केलं जातं. पब्लिकमध्ये शूटिंग करतानासुद्धा त्याची सूचना न देता किंवा फिल्म परमिट न काढता अचानक शूटिंगला सुरुवात होते. त्यामुळे चित्रपटातला नैसर्गिक भाव कायम राहतो.
हेही वाचा : टेम्पो ते मर्सिडीज व्हाया नाटक
कहानीचा क्रू असाच कोलकत्याच्या रस्त्यावर पसरत अचानक शुटींगला सुरुवात करत असे. कहानीचं शूटिंग कृत्रिम लाईटचा वापर न करता ६४ दिवसात पार पडलं. शेवटचा अत्यंत महत्त्वाचा दुर्गापूजेचा प्रसंग कोलकात्यातील बॅलीगंगे परिसरात बारोवारी दुर्गापूजा उत्सवात पार पडला.
‘कहानी’ प्रदर्शित झाला तेव्हा त्याला मर्यादित प्रतिसाद होता. पण जागतिक महिला दिनाच्या दुसऱ्याच दिवशी भेटीला आलेल्या या चित्रपटाची माऊथ पब्लिसिटी जोरदार झाली आणि त्यानंतर चित्रपट धावू लागला. समीक्षकांची वाहवा या चित्रपटाने मिळवली. या चित्रपटात अनेक गोष्टी वेगळ्या होत्या. स्त्रीचं दुर्गेचे रूप, विद्या- राणाची हळुवार अबोल कथा, एखादा पुरुष गरोदर स्त्रीच्या ही प्रेमात पडू शकतो ही शक्यता प्रेक्षकांना चक्क भावली. चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार, पाच फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाले. चित्रपटाचे ‘अनामिका’ हा तेलगू आणि ‘नी इंगे एन अनबे’ हा रिमेकही गाजला. कोलकाता हे शूटिंगच्या दृष्टीने महत्वपूर्ण शहर ठरू शकते याची बॉलिवूडला उपरती झाली. चित्रपटातील काही ठिकाणांना अचानक महत्त्व प्राप्त झालं. ज्या ‘मोनालीसा गेस्ट हाउस’ मध्ये विद्या राहते असं चित्रपटात दाखवण्यात गेलं; त्या गेस्ट हाउसला नंतर अनेकांनी भेट दिली. मालकानेसुद्धा ‘कहानी’ थीमवर आपल्या रूम्स नव्याने डेकोरेट करत या गर्दीला वसूल केले.
आज बॉलीवुडमधल्या स्त्रीप्रधान चित्रपटात ‘कहानी’चा दर्जा वरचा आहे. चित्रपटाच्या क्लायमेक्सला दिसणारी देवीदुर्गा विद्या बागचीमध्ये प्रेक्षक पाहतात आणि ‘कहानी’तला धक्का पचवत आश्चर्य, कौतुक, सहानुभूती,गूढरम्यता या संमिश्र भावनांसह नेमकं काय झालं हा ट्विस्ट अनुभवत राहतात.