दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
बॉलिवूडमधील यशस्वी आई – रिमा
त्यांचे माहेरचे नाव ‘नयन भडभडे’. २१ जून १९५८ या दिवशी त्यांचा जन्म झाला. रिमा यांनी बालकलाकार म्हणून सुद्धा काही चित्रपटात काम केलं. हा माझा मार्ग एकला हा त्यातला एक चित्रपट. त्यांचे बालपण गिरगावात गेले. त्यांची आई मंदाकिनी भडभडे या सुद्धा अभिनेत्री, पण एका ठराविक वयांनंतर त्यांच्या आईने त्यांना पुण्याच्या हुजुरपागेत शिक्षण घ्यायला पाठवलं. मग अकरावी झाल्यावर त्या मुंबईला आल्या आणि विल्सन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला .
श्याम बेनेगल यांच्या एका जाहिरातीत देखील त्यांनी काम केलं.
त्यांनी बँकेत देखील नोकरी केली होती. विवेक लागू यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या मुलीच्या जन्मानंतर काही वर्षांनी त्यांनी बँकेतील नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ अभिनय हेच करिअर करायचं ठरलं.
रिमा यांच्या जीवनातील अतिशय महत्वाचे नाटक म्हणजे ‘पुरुष’. या नाटकातील ‘अंबिका’ त्यांनी साकारली. विजया मेहता यांच्या समर्थ दिग्दर्शनातून रिमा यांना खूप काही शिकता आलं. या नाटकाचे त्यांनी जवळजवळ आठशे प्रयोग केले. दामू केंकरे, विजया मेहता, मो ग रांगणेकर अशा अनेक दिग्दर्शकांच्या नाटकात त्यांनी काम केलं . ‘ती फुलराणी’ मध्ये सुद्धा त्यांची छोटीशी भूमिका होती. पण भक्ती बर्वे, सतीश दुभाषी, स्वतः पु ल देशपांडे यांच्याबरोबर काम करायला मिळणं म्हणजे अभिनयाची एक मोठी कार्यशाळा होती.
त्यांच्या जीवनातील एक महत्वाचा टप्पा म्हणजे ‘सविता दामोदर परांजपे‘. या नाटकाला येणारा प्रेक्षक इतका गुंतला जायचा की प्रेक्षक ही भूमिका पहाताना घाबरायचे सुद्धा. या नाटकातील शीर्षक भूमिका साकारताना दुहेरी व्यक्तिमत्व (स्प्लिट पर्सनॅलिटी) साकारणे हे आव्हानात्मक होते.
रत्नाकर मतकरी लिखित ‘घर तिघांचं हवं‘ हे ताराबाई मोडक यांच्या कारकिर्दीवर असलेलं नाटक. हे नाटक रिमाताईंनी केलेल्या भूमिकांपैकी त्यांचं आवडतं नाटक असल्याचं हे त्यांनी अनेकदा मुलाखतीतून सांगितलं आहे.
हेही वाचा : आव्हान पेलणारी रंजना!
‘सिंहासन‘ चित्रपटात त्यांची भूमिका होती. त्यात त्यांनी दाभाडे यांची सून ही भूमिका केली होती. डॉक्टर लागू यांच्याबरोबर काम करताना त्यांना खूप काही शिकता आलं. मुख्य नायिका म्हणून त्यांनी नणंद भावजय सारखा चित्रपट केला. त्यांनी जवळजवळ अडीचशे चित्रपटात भूमिका केल्या.
सलमान खान, जुहीचावला, अक्षयकुमार, उर्मिला मातोंडकर अशा अनेक नायक नायिकांच्या आईची भूमिका केली. ‘वास्तव’ मधील त्यांनी साकारलेली आई ही त्यांच्या भूमिकांमधील महत्वाचा टप्पा होता. मैने प्यार किया, हम आप के हैं कौन मधील भूमिकांच्या निमित्ताने कौटुंबिक वातावरण, गाणी, त्यातले लग्नसोहळे या गोष्टीतून खूप आनंद त्यांनी अनुभवला. श्रीमान श्रीमती, तू तू मैं मैं या त्यांच्या गाजलेल्या मालिका होत्या.
नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमात त्यांनी भूमिका केल्या, पण त्यांचे आवडते माध्यम म्हणजे नाटक आणि चित्रपट. रिमाताईंनी सामाजिक भान देखील जपलं आहे. अभिनेते अक्षय पेंडसे आणि आनंद अभ्यंकर यांच्या अपघाती मृत्यूंनंतर असे अपघात टाळण्यासाठी दोनशे सी सी टीव्ही बसवण्याची योजना करण्यात आली होती. त्या योजनेसाठी काही कलाकारांनी सहकार्य केलं होतं, त्यापैकी एक रिमाताई देखील होत्या. तसेच अपघात टाळण्यासाठी जी जनजागृती मोहीम असते, काही कलाकारांच्या आवाजात काही ऑडिओज आहेत. त्यासाठी देखील रिमाताईंनी काम केलं. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील महत्वाचा व्हॉइस ओव्हर आहे, तो स्वर रिमाताईंचा आहे.
रिमाताईंना ‘रेशमगाठ‘ चित्रपटासाठी महाराष्ट्र शासनाचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींचे पारितोषिक मिळाले होते. तसेच महाराष्ट्र शासनाचा व्ही शांताराम पुरस्कार देखील त्यांना मिळाला होता.