‘मदर इंडिया’ नावाची अनटोल्ड स्टोरी
भारतीय चित्रपटाच्या इतिहासात दिग्दर्शक मेहबूब यांचा ‘मदर इंडिया’ हा १९५७ साली प्रदर्शित झालेला चित्रपट आजही ‘कल्ट क्लासिक’ म्हणून ओळखला जातो. कृषिप्रधान भारत देशातील नारीच्या संघर्षमय जीवन पटाला यात चितारले होते. मानव निर्मित आणि निसर्ग निर्मित संकटाचा मुकाबला करणारा इथला शेतकरी त्याचे दु:ख, यातना आणि तरीही इथल्या संस्कृतीला जपणारा त्याचा दुर्दम्य आशावाद त्यांना यातून दाखवायचा होता.
भारतात सर्वदूर हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला गेला. या चित्रपटाने ऑस्कर पर्यंत मजल मारली होती. या चित्रपटाची मेकिंग ची कहाणी , त्यातली गाणी , त्यातील कलावंतांचा अभिनय आणि एकूणच भारतीय स्त्रीचे उदात्त असे रूप मेहबूब यांनी या चित्रपटात दाखवले होते. आज २५ ऑक्टोबर! बरोबर ६३ वर्षांपूर्वी म्हणजे २५ ऑक्टोबर १९५७ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.
या चित्रपटाच्या नावाची कहाणी खूप जोरदार आहे त्यात तीव्र राष्ट्राभिमान तर आहेच, शिवाय आपल्या संस्कृतीबद्दल कुणी वाईट लिहिले असेल असेल, तर आपल्या कलाकृतीच्या भाषेतून संयतपणे कसे उत्तर देता येते हे यातून दाखवून दिले गेले.
वस्तुतः हा चित्रपट मेहबूब यांच्याच १९४० साली प्रदर्शित झालेल्या ‘औरत’ या चित्रपटाचा हा रिमेक होता. पंधरा वर्षांनी पुन्हा जेंव्हा त्यांना हा चित्रपट निर्माण करावासा वाटला त्या वेळी या चित्रपटाचे नाव त्यांनी जाणीवपूर्वक ‘मदर इंडिया’ ठेवले!
हे वाचलेत का ? गोष्ट माधुरीच्या ‘एक दो तीन…’ या गाण्याची!
त्याला एक मोठे कारण देखील होते. १९२७ आली अमेरिकेच्या कॅथरीन मायो (१८६७-१९४०) या भारत द्वेष्ट्या लेखिकेने ‘मदर इंडिया’ नावाचे एक पुस्तक लिहिले होते. या पुस्तकात तिने भारताची आणि इथल्या संस्कृतीची प्रचंड निंदानालस्ती केली होती. यात भारतीय परंपरा, रूढी, स्त्री पुरुष लैंगिक संबंध भारतीयांच्या मनातील जाज्वल्य प्रतिमा, येथील राष्ट्रपुरुष ,ब्रिटिशांच्या विरुद्ध ते देत असलेला निकराचा लढा यावर या बाईनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. भारतीय स्वातंत्र्यलढ्याला मिळणारे यश त्यांच्या नजरेला खुपत होते आणि त्यातूनच त्यानी या पुस्तकाची निर्मिती केली होती.
भारत विरोधी ब्रिटन आणि इतर पाश्चात्य देशांमध्ये या पुस्तकांचे स्वागत झाले पण भारतात मात्र या पुस्तकावर प्रचंड टीका झाली. अनेक ठिकाणी या पुस्तकाची आणि लेखिकेच्या पुतळ्याची होळी करण्यात आली . न्यूयॉर्क येथील टाऊन हॉलच्या समोर हे पुस्तक जाळले गेले. ब्रिटिश संसदेत आणि भारतात यावर खूप मोठी चर्चा झाली.
यावर पुस्तकावर टीका करणाऱ्या मध्ये एक प्रमुख होते राष्ट्रपिता महात्मा गांधी! महात्मा गांधी यांनी या पुस्तकाला ‘पूर्वग्रहातून लिहिलेला एका सॅनिटरी इन्स्पेक्टर चा अहवाल’ असे म्हणत टीका केली. महात्मा गांधी यांच्या सोबतच रवींद्रनाथ टागोर, विन्स्टन चर्चिल सरोजिनी नायडू, रुडयार्ड किप्लिंग, अनी बेझंट यांनी देखील या पुस्तकावर परखड भाष्य केले. पुढे १९३६ मध्ये या पुस्तकावर भारतात बंदी देखील आणली होती.
पण हि बंदीच पुस्तकाची लोकप्रियता वाढवायला कारणीभूत ठरली. या पुस्तकाचे जगातील अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले. पन्नासच्या दशकापर्यंत या पुस्तकाच्या जवळपास चार लाख प्रती विकल्या गेल्या होत्या. अर्थात या पुस्तकाच्या विरोधात किमान पन्नास पुस्तके प्रकाशित झाली.
भारतीय नारीचा झालेला अपमान हा तमाम देशबांधवांच्या जिव्हारी लागला होता त्याला उत्तर म्हणून मेहबूब यांनी भारतीय नारीच्या संघर्षाचा दैदिप्यमान इतिहास जगापुढे ठेवण्यासाठी हा चित्रपट बनवला आणि या चित्रपटाचे नाव मुद्दाम ‘मदर इंडिया’ असे ठेवले. भारतीय सरकारला हे पुस्तक कॅथरीन मायो यांच्या त्या वादग्रस्त ‘मदर इंडिया’ वर आधारित आहे असे वाटल्याने त्याची पटकथा त्यांनी मागवून घेतली. मेहबूब यांनी पटकथा तर पाठवली सोबत एक दीर्घ पत्रही जोडले. त्यात त्यांनी सांगितले की “ पुस्तकाचा आणि सिनेमाचा काहीही संबंध नाही उलट ते एकमेकांच्या विरुद्ध आहेत! आम्ही जाणीवपूर्वक त्या पुस्तकाला आव्हान देण्यासाठी हे नाव ठेवले आहे. वाचकांच्या मनात मायोच्या त्या पुस्तकामुळे काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करणे हाच आमचा या चित्रपटाचा मागचा उद्देश आहे!”
हेही वाचा : नौशाद यांना संगीताची पहिली संधी देणारा गीतकार : डि एन मधोक
चित्रपट मोठ्या दिमाखात २५ ऑक्टोबर १९५७ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला समीक्षकांनीही खूप चांगला अभिप्राय दिला. हा चित्रपट पुढे ऑस्करसाठी पाठविण्यात आला. त्या वेळी अमेरिका – रशियात कोल्डवॉर चालू होते. त्यामुळे मेहबूब यांनी त्यांच्या चित्रपट निर्मितीच्या लोगोत विळा कोयत्याचे असलेले चित्र काढून टाकले याचे कारण अमेरिकन समीक्षकांना विनाकारण हा सिनेमा कम्युनिष्ट धार्जिणा वाटू नये म्हणून!
यावर्षी ज्या चित्रपटाला ऑस्कर मिळाले तो चित्रपट होता ‘नाइट्स ऑफ कॅबेरिया’!
आज मदर इंडिया चा विचार करताना त्यामागची दिग्दर्शकाची देशप्रेमाची भावना आजच्या पिढीच्या लक्षात यावी तसेच मदर इंडियाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन वाचकांच्या लक्षात यावा म्हणून या लेखाचं प्रयोजन!