दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
१४८ वर्षांचे अभिजात नाटक : संगीत सौभद्र
काही नाटकं जन्माला येतानाच यशाची पताका खांद्यावर घेऊन येतात. अण्णासाहेब किर्लोस्कर लिखीत “संगीत सौभद्र” याच परंपरेतील मराठी रंगभूमीवरचं अभिजात नाटक होय.
१८ नोव्हेंबर १८८२ रोजी पुण्यातील पूर्णानंद थिएटरमध्ये या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. आज १४८ वर्षांत ज्या ज्या नाटक कंपन्यांनी सौभद्र साकारलं, त्या प्रत्येकाने यशाची उत्तुंग कमान अनुभवली.
हे नाटक बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी का लिहिलं याची अशी गोष्ट सांगितली जाते की, अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं ‘शाकुंतल’ विलक्षण गाजत होतं. पण मूळ कालिदासाच्या नाटकाचं ते मराठीकरण होतं. कोणत्याही नाटकककाराला स्वत:ची अस्सल कलाकृती सादर करण्याची इच्छा प्रबळ असते. त्याप्रमाणे अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या डोक्यात अर्जुन सुभद्रेचा विषय घोळत होता. त्यातून सौभद्रचा जन्म झाला. संगीत नाटकांच्या जमान्यात एखादीच अशी नाटक कंपनी असेल जिने सौभद्रचा प्रयोग केला नाही. अन्यथा सर्व महत्त्वाच्या कंपन्यांनी सौभद्र रंगमंचावर उभं केलं.
गंमत म्हणजे हे नाटक पहिल्यांदा रंगभूमीवर आलं तेव्हा ते तीन अंकांचंच होतं. नाटक तशा अर्थाने परिपूर्ण नसुनही लोकांनी पहिला प्रयोग डोक्यावर घेतला. कालांतरानं अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी नाटकाचे उरलेले दोन अंक लिहिले आणि १८८३ मध्ये पाच अंकी नाटक सादर झालं.
या नाटकात सर्वप्रथम पडद्याआड केली जाणारी नांदी स्टेजवर होऊ लागली. अर्जून सुभद्रेची पौराणिक कथा लोकांना परिचित होतीच पण या नाटकातील सदाबहार पदांनी नाटकाची रंगत वाढवली. साकी दिंड्यांसह या नाटकात १४५ पदं होती. हासुद्धा एकप्रकारे विक्रमच म्हणावा लागेल. आद्य नाटककार विष्णुदास भावे यांनी हे नाटक पाहिल्यावर गंमतीनं म्हटलं होतं की या नाटकाच्या फक्त डोअरकिपरला गाणं द्यायचं तेवढं राहिलं आहे.
हे ही वाचा: अकाली एक्झिट घेणारा गगनभेदी नटसम्राट- यशवंत दत्त
नभ मेघांनी आक्रमिले, राधाधर मधुमिलिंद जयजय, लग्नाला जातो मी, प्रिये पहा, नच सुंदरी करु कोपा, वद जाऊ कुणाला शरण, पावना वामना, अरसिक किती हा शेला, ही नाट्यपदं आजही लोकप्रिय आहेत.
सुटसुटीत सहज संवाद, गद्य व संगीत यांचं अप्रतिम मिश्रण, गतिमान कथानक आणि दैवी पात्रांना दिलेला मानवी चेहरा यामुळे हे नाटक आजही आवडीने पाहिले जाते. अगदी अलिकडे सादर झालेल्या राहुल देशपांडे आणि आनंद भाटे यांच्या संचातील सौभद्रालाही उत्तम प्रतिसाद लाभला. त्यामुळे वि.स. खांडेकर यांचे,”देवांना ज्याप्रमाणे कधी वार्धक्य येत नाही त्याप्रमाणे देवकोटीला पोहोचलेलं हे नाटक आहे” हे विधान मनापासून पटते.
काही नाटकं अजरामर असतात. ती रंगभूमीला चिरकालासाठी टिकणारा वारसा देतात. किर्लोस्कर यांचे “सौभद्र” हे या वर्गातील अत्यंत विश्वसनीय नाटक ठरावे.