‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
‘ओह माय गॉड’ खरंच विलक्षण आहे
‘देव’ या संकल्पनेचा विचार वेगवेगळ्या माध्यमातून विविध अंगांनी झालेला आहे. पण या वैचारिक चर्चेला मनोरंजन आणि फॅन्टसीची जोड देत आपल्या मेंदूला काम करायला लावणारा चित्रपट म्हणजे ‘ओह माय गॉड! या चित्रपटाची ही पुरी फिल्मी कहानी.
२००१ मध्ये प्रदर्शित ऑस्ट्रेलियन सिनेमा ‘द मॅन हू स्युड गॉड’ यासिनेमा वरून गुजराथी रंगभूमीवर ‘कानजी विरुद्ध कानजी’ हे नाटक आलं होतं. त्याचंच हिंदी रुपांतर झालं, ‘किशन व्हर्सेस कन्हैया’. या नाटकात परेश रावल मुख्य भूमिकेत होते. चित्रपट दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी हे नाटक पाहिलं. त्यांना ते खूप आवडलं. त्याच नाटकाच्या कथानकावर चित्रपट करण्याचं त्यांनी ठरवलं. परेश रावल यांची भूमिका कायम ठेवली गेली. चित्रपटातील कृष्णाच्या भूमिकेसाठी नायकाचा शोध घेण्याची वेळ आली नाही कारण अभिनेता अक्षय कुमार याने हिंदी नाटक ७ – ८ वेळा पाहिलं असल्यानं तो ही भूमिका उत्तम साकारू शकेल याची दिग्दर्शकाला खात्री वाटली. इतक्या उत्तम संकल्पनेवरील सिनेमा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावा यासाठी अक्षय कुमारने चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.
अशी जुळवा जुळव सुरू असताना अक्षयने ही कथा आईला सांगितली. तिने अक्षयला भगवद्गीता वाचनाचा सल्ला दिला. अक्षयने तो अंमलात तर आणलंच शिवाय चित्रपटाच्या संपूर्ण क्रूला गीता पुस्तक रूपाने भेट म्हणून दिली. प्रत्यक्ष देवाची भूमिका साकारताना ते तेज चेह-यावर दिसावं यासाठी अक्षयने चित्रीकरणादरम्यान मांसाहार वर्ज्य करून तो पूर्ण शाकाहारी झाला. त्याचा परिणाम अर्थातच पडद्यावर जाणवला.
चित्रपटाचं शीर्षक ठरवताना ते सर्वांच्यापरिचयाचं हवं याकडे कल होता. आपण दिवसातून अनेक वेळा, ‘हे भगवान’, ‘अरे देवा’, ‘ओह गॉड’ असा पुकारा करत असतो त्याचा विचारकरून ‘ओह माय गॉड’ हे शीर्षक निश्चित झालं.
चित्रपटातील अक्षयची बाईक एंट्री भन्नाट होती. ती खास व्हावी यासाठी पाच महिने मेहनत घेऊन बाईक डिझाईन करण्यात आली. भारतीय तरुणाचा ब्रॅण्ड असलेली ‘वर्देंची’ ही चित्रपटातील अक्षयची बाईक लोकांना खूप आवडली.
हे ही वाचा : रामसेतु…नवीन वाद…
चित्रपटाचा प्रोमो रिलीज झाला तेव्हा त्यात आवाज सलमानखानने दिला असल्याने चित्रपटाचा नायक सलमान असल्याचा गैरसमज काही काळ निर्माण झाला जो अर्थातच नंतर दूर झाला.
हा चित्रपट मनोरंजना पलिकडे एक महत्त्वपूर्ण संदेश देणारा होता. त्यांचा परिणाम प्रेक्षकांवर जितका झाला तितकाच कलाकारांवरही झाला. परेश रावल यांचा कानजीभाई अस्सल वाटला कारण ते स्वत:त्या विचारधारेवर विश्वास ठेवणारे आहेत. पण अक्षय कुमारने एका मुलाखती मध्ये सांगितलं होतं की,या चित्रपटाचा त्याच्यावर विलक्षण प्रभाव पडला दरवर्षी सुरक्षा रक्षकांचा ताफा घेऊन ४ – ५ लाख खर्च करत सहकुटुंब वैष्णोदेवीला जाणा-या अक्षयने ती रक्कम टाटा मेमोरियला देण्याचा निर्णय घेतला.
चित्रपट पाहून लोकं सुधारतात का? ते अगदीनगण्यप्रमाणात!! पण चित्रपटातील विचारांचा सूक्ष्म परिणाम नाकारता येत नाही. मनोरंजन करता करता ‘देव’ संकल्पनेचा नव्याने विचार करायला ‘ओह माय गॉड’ ने भाग पाडले याबद्दल मात्र ‘बाय गॉड’ दुमत नाही.