‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
गुल्लक : सुखदुःखाची मध्यमवर्गीय झलक
वेबसिरीज TVFची असेल तर उत्कृष्ट कंटेंट आणि भरपूर मनोरंजन हे समीकरण आता कायमस्वरूपी भारतीय प्रेक्षकांच्या मनात ठसलंय. कधी गावातली दुनियादारी दाखवणारी ‘पंचायत’ असेल किंवा कधी स्टार्टअप वर्ल्ड फिरवून आणणारी ‘पिचर्स’ असेल, TVF प्रेक्षकांना समाधान देण्यात कुठलीही कसर ठेवत नाही. फ्लेम्स, पर्मनंट रूममेट्स सारख्या रिलेशनशिपवर आधारित सिरिजेस एकीकडे आणि बॅचलर्स, इनमेट्स, क्युबिकल्स सारख्या तरुणाईला वेड लावणाऱ्या सिरिजेस एकीकडे. कौटुंबिक सुखदुःखाची वीण उलगडून सांगणाऱ्या आम आदमी फॅमिली, ये मेरी फॅमिली नंतर तुफान लोकप्रिय झालेल्या ‘गुल्लक’चा दुसरा सिझन नुकताच SonyLIV वर रिलीज झाला. याचा पहिला सिझन अमितराज गुप्ता यांनी दिग्दर्शित केला होता तर हा नवा सिझन ‘चीजकेक’फेम पलाश वासवानी यांच्या दिग्दर्शनाखाली प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे.
हे वाचलंत का: “मट्टू की साइकिल”.. सायकल आणि मजुराचं नातं कसं गुंफत गेलं हे सांगणारा हा सिनेमा
गुल्लक.. गुल्लक (Gullak) म्हणजे पैसे साठवण्याचा एक गल्ला. प्रत्येक मध्यमवर्गीय घरात असा एक तरी गुल्लक असतोच. पत्र्याचा, प्लॅस्टिकचा किंवा मातीचा. ह्या गुल्लकमध्ये फारसे पैसे साठत नसले तरी वेळेला हातखर्चाला कामी येतील इतके पैसे मात्र आपोआपच साठत जातात. गच्च भरून जड झालेला गुल्लक अनावधानाने फुटलाच, तर क्षणिक धनलाभाचा फील आपसूकच चेहऱ्यावर उमटतो. असा हा गुल्लक पैशांबरोबरच घरातल्या छोट्यामोठ्या घटनाही त्याच्यात सामावून घेत असतो.
तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाचि वाद आपणांसी ॥
या तुकोबांच्या उक्तीप्रमाणे हा गुल्लक स्वतःशीच घरातल्या घडामोडींबद्दल हितगूज साधत असतो.
ह्या वेबसिरीजची कथा एका मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती फिरते. तेच मिश्रा कुटुंब, ज्याची ओळख आपल्याला पहिल्या सिझनमध्ये झालेली आहे. घरातलं शेंडेफळ, अमन (हर्ष नायर) ची दहावी चालू आहे तर त्याचा मोठा भाऊ अन्नू (विजयराज गुप्ता) आता गावातल्या हनुमान मंदिरात त्याच्या जीवश्च कंठश्च मित्रासोबत, लकी (साद बिलग्रामी) सोबत टवाळक्या करत दिवस रेटतोय. बाकी संतोष मिश्रा (जमील खान) व शांती मिश्रा (गीतांजली कुलकर्णी) यांच्या दैनंदिन कामकाजात काही विशेष फरक पडलेला नाही. आगाऊ आणि खडूस शेजारीण बिट्टू की मम्मीच्या (सुनीता राजवर) टोमण्यांना आता चांगलीच धार चढलेली आहे. आणि चेरी ऑन द टॉप, या घरातला प्रमुख सूत्रधार, निवेदक म्हणजे मातीचा गुल्लक ज्याला हरहुन्नरी युट्युबर शिवांकित सिंग परिहारचा जादुई व्हॉइसओव्हर लाभलाय.
हे नक्की वाचा: दीपिका पादुकोन: गुलाबाचा काट्यांसह प्रवास…
आपल्या मित्रांची बिलं माफ करण्यासाठी बापाला लाच घ्यायला प्रवृत्त करणारा अन्नू आणि काहीही झालं तरीही भ्रष्टाचार करायचा नाही असं मनाशी ठरवून असलेले मिश्राजी यांची नोकझोक ‘बिजली का बिल’मध्ये बघायला मिळते. ‘चिनी कम, पानी ज्यादा’ हा एपिसोड घरातील कर्त्या स्त्रीचं आजारपण आणि तिला घरच्यांकडून मिळणारी मदत व वागणूक दाखवतो. बायकोच्या माहेरचं लग्न म्हणलं की मानपान आणि रुसवेफुगवे हे ठरलेले. अश्या समारंभात आपला मेल इगो जपणारे कसे कुटुंबाच्या आनंदावर विरजण घालतात याची आंबटगोड कहाणी म्हणजे ‘सपरिवार’.
दरवेळी जुळून येणारं दहावीचा पेपर आणि क्रिकेट वर्ल्डकप हे प्रत्येक विद्यार्थ्याला आणि त्याच्या घरातील इतर क्रिकेटशौकीनांना धर्मसंकटात टाकणारं समीकरण. ह्या समीकरणाची उकल होते ‘कल बोर्ड का पेपर हैं’मध्ये. महिन्याचं वाणसामान अर्थात किराणा ही मध्यमवर्गीयांची पहिली प्रायोरीटी. किराणाच्या सामानाची जशी प्रायोरिटी ठरते त्याचप्रमाणे घरात कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं ही बाब नकळतपणे ‘किराणा’ ह्या एपिसोडमध्ये सांगितले जाते.
गुल्लकचा पहिला सिझन सुपरहिट ठरल्यामुळे दुसऱ्या सिझनकडून अपेक्षा वाढली होती आणि ह्या सिझनचं दमदार कथानक व सर्वच पात्रांचा सहजसुंदर अभिनय ती अपेक्षा शतप्रतिशत पूर्ण करतं. छोट्या छोट्या किश्श्यांमधून रंगत जाणारी कहाणी पुरेपूर मनोरंजन करण्यात यशस्वी ठरते. जझीम शर्मा व सिमरन वोहरा यांनी स्वरबद्ध केलेलं सिरीजचं शीर्षकगीत सुश्राव्य झालंय. सततच्या हाणामारी, रक्तपात दाखवणाऱ्या वेबसिरिजेसला कंटाळला असाल तर ‘गुल्लक’ सारखा हलकाफुलका कंटेंट नक्कीच चुकवू नका!!
– प्रथमेश हळंदे