‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
वंदेमातरम या राष्ट्रगीताला चाल लावणारा मराठी संगीतकार…!
मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर (Krishnarao Phulambrikar) यांचा जन्म पुणे जिल्ह्यात आळंदी येथे २० जानेवारी १८९८ रोजी झाला. एक प्रतिभावान गायक, नट व संगीत दिग्दर्शक. त्यांना सुरुवातीचे संगीत शिक्षण बाबूराव फडके यांच्याकडून मिळाले. कृष्णरावांचे वडील पंडित होते. त्यांच्या निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक मंडळी या नाटक मंडळीत काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक होती. आवाजातील गोडी, लवचीकपणा यांमुळे त्यांना काम मिळाले होते. ते “संत” नाटकात विठोबाची भूमिका करत असत. याच नाटक मंडळीत त्यांचा परिचय सवाई गंधर्वांशी झाला व त्यांना नाटकातील गाण्यांसाठी सवाई गंधर्वांचे मार्गदर्शन लाभले. इ.स. १९१० मध्ये मास्तर कृष्णरावांनी पं. भास्करबुवा बखले यांचे शिष्यत्व स्वीकारले.
हे देखील वाचा: …आणि ओपींच्या संगीताने सगळ्यांचे आयुष्य घडले
भास्करबुवांप्रमाणेच त्यांच्याही गायनात ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर या घराण्यांचा संगम दिसून येतो. हमखास मैफल जिंकणारे कल्पक व अष्टपैलू गायक म्हणू मास्तरांची ख्याती असून त्यांच्या एकूण ३,०००हून अधिक मैफली संबंध भारतात ठिकठिकाणी झाल्या. प्रसन्न, उठावदार व प्रभावी गायन शैलीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांची पहिली स्वतंत्र मैफल वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी जालंदरच्या संगीत महोत्सावात झाली. ख्याल, ठुमरी, नाट्यगीत, भजन इ. गानप्रकार ते सारख्याच रंगतीने पेश करीत. ते ‘गंधर्व नाटक मंडळी’ मध्ये साधारणपणे १९२५ ते १९३३ या काळात होते. तेथे गायकनट व संगीत दिग्दर्शक या नात्यांनी त्यांनी बहुमोल कामगिरी बजावली.
शारदा, सौभद्र, एकच प्याला, विद्याहरण, स्वयंवर, द्रौपदी, आशा-निराशा इ. नाटकांतील त्यांच्या पदांच्या चाली ऐकून त्यांच्या कर्तृत्वाची महती पटेल. ‘नाट्यनिकेतन’ च्या रांगणेकरांच्या कुलवधू या नाटकाला त्यांनी दिलेले संगीत फार गाजले. शांताराम बापूंनी त्यांना ‘प्रभात’ मध्ये आणले. १९३५ सालच्या ‘धर्मात्मा’ या सिनेमात त्यांच्यामुळे बालगंधर्व यांनी भूमिका स्विकारली. तेथील वास्तव्यात त्यांनी धर्मात्मा, अमरज्योती, वहाँ, गोपालकृष्ण, माणूस (कशाला उद्याची बात), शेजारी (लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया) इ. मराठी-हिंदी चित्रपटांना सुमधुर संगीत दिले.
हे वाचलंत का: १२१ वर्षांचे बंडखोर नाटक – संगीत शारदा…
१९४२ मध्ये व्ही. शांताराम यांच्या ‘राजकमल’ चित्रपटसंस्थेतर्फे निघालेल्या “भक्तीचा मळा” या चित्रपटात संगीत दिग्दर्शनाबरोबरच त्यांनी सावता माळ्याची प्रमुख भूमिकाही केली. तसेच आचार्य अत्र्यांचा वसंतसेना, विश्राम बेडेकरांचा लाखाराणी व नंतरच्या काळातील कीचकवध (धुंद मधुमती रात रे), विठू माझा लेकुरवाळा या चित्रपटांनाही त्यांनी सुश्राव्य संगीत दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनंतीवरून मास्तर कृष्णरावांनी संपूर्ण बुद्ध वंदना सांगितिक मीटरमध्ये बसवली व बाबासाहेबांनी त्याची ध्वनिमुद्रिका काढली. याकरिता मास्तर कृष्णरावांनी पाली भाषेचा अभ्यास केला होता. वंदे मातरम हे गीत, ते बॅन्डवर वाजवता येत नाही या सबबीखाली राष्ट्रगीत केले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले. वंदे मातरमला विविध चाली लावून, त्यातल्या काही बॅन्डवर वाजवता येतात हे दाखवण्यासाठी त्यांनी पंडित नेहरूंची भेट घेऊन त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला.
पण नेहरूंनी आधीच जन गण मन निश्चित केले असल्याने मास्तर कृष्णरावांची मेहनत फुकट गेली. तरी देखील आज आपण जी वंदे मातरम (Vande Mataram) हे राष्ट्रगीत ऐकतो त्याची चाल (झिंजोटी राग) मास्तरांनीच लावलेली आहे. एवढ्या प्रचंड प्रतिमेचा हा कलावंत पण आज महाराष्ट्रातच विस्मृतीच्या गर्तेत हरवलाय. २० ऑक्टोबर १९७४ ला मास्तरांची प्राणज्योत मालवली. आज २१ जानेवारी मा. कृष्णराव यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने त्यांचे स्मरण.