‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
भारतीय सिनेमाच्या सुवर्णकाळाला पडलेलं रुपेरी स्वप्न… मधुबाला!
समां मोठा हसिन होता. रूपेरी पडदा कृष्णधवल रंगातला असला तरी, रसिकांच्या हॄदयात सप्तरंगी इंद्रधनुष्याचे रंग बरसवत होता. नादमधुर अर्थवाही शब्द, मनाच्या आतल्या कप्प्यात लपवून ठेवावी अशी मोरपंखी गाणी, मानवी भावभावनांच रसाळ दर्शन घडविणारी इथल्या मातीतील अस्सल कथा, तितकाच भावस्पर्शी अभिनय, जीव ओतून केलेलं दिग्दर्शन आणि या सर्वांना दिलखुलास दाद देणारा काहीसा भाबडा पण रसिक मनाचा प्रेक्षक वर्ग! कलात्मकतेचा भरजरी दिमाख असलेला पन्नासच्या दशकातला हिंदी सिनेमा त्यामुळेच आजही सिनेमाचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो.
याच ‘गोल्डन इरा’ मध्ये कित्येक कलावंतांचे सर्वोत्कृष्ट ‘परफॉरमन्स’ आले. आज इतक्या वर्षानंतर आपण जेव्हा त्या काळाकडे बघतो तेव्हा तिथली हिरे माणकं पाहून डोळे दिपून जातात. याच सुवर्ण युगाला एक रूपेरी स्वप्न पडलं होतं ‘मधुबाला’चं! Madhubala उणीपुरी दहा एक वर्षाची तिची चंदेरी सफर. पण आजही सौंदर्यातील शेवटचा शब्द म्हणजे ‘मधुबाला’च समजला जातो! तिचं आरस्पानी सौंदर्य, तिचं लज्जतदार लाजणं, तिचं खळाळून हसणं, खोडकरपणे हसणारे तिचे जीवघेणे नेत्रकटाक्ष, प्रेमातील उत्कटता आणि विरहातील व्याकुळता टिपणारे तिचे डोळे, सारे कसे जिवंत, रसरशीत आणि मनाला सुखावणारे होते! एकूणच तिचा रूपेरी वावर आजही एक ‘आयडॉल’ समजला जातो.
हे देखील वाचा: मुगल ए आझम – एका अजरामर प्रेमकथेची साठी
आजच्या युवा पिढीला कदाचित हे वाचून आश्चर्य वाटेल, मधुला पडद्यावर पहातानाच नव्हे तर तिच्या उल्लेखानेही रोमांचित होणारे हजारो रसिक होते. अभिनय सम्राट दिलिपकुमार पासून गानसम्राट किशोरकुमार पर्य़ंत सारेच तिच्यावर फ़िदा होते. सौंदर्याच्या या अनभिषिक्त सम्राज्ञीचा जन्म देखील १४ फ़ेब्रुवारी, हा तमाम प्रेमिकांकरीता शुभ संकेत समजायला हवा. आजच्या पिढीला मधुचे सिनेमे पहायला मिळत नसले तरी तिच्यावर चित्रित गाणी यू टयूबच्या माध्यमातून सहज उपलब्ध आहेत.
आज तिच्यावर चित्रित गाण्यांची ही लोभस आठवण खास व्हॅलेंटाइन डे (Valentines Day) च्या निमित्ताने! दिलीप सोबतच्या ‘तराना’तील (सं.अनिल विश्वास) गाणी तर प्रत्येक प्रेमात पडणार्यांनी आवर्जुन पहावीत इतकी भावविभोर आहेत. तलत व लताचे गाण्यातील भावनेत विरघळणारे स्वर गीताची खुमारी आणखी वाढवतात. ‘नैन मिले नैन हुए बावरे, चैन कहॉं मेरे सजन सॉंवरे’ या गाण्याच्या वेळची तिच्या डोळ्य़ातील पहिल्या प्रेमाची पर्युत्सुक भावना रसिकांच्या हृदयापर्यंत पोचली. त्या काळातलं प्रेम, त्याची उत्कटता, सलज्जता सारेच वरच्या श्रॆणीचे होते. याच सिनेमातील ‘सीने मे सुलगते हैं अरमां’ हे गीत तर तलत-लताचे सर्वोत्कृष्ट युगल गीत आहे. प्रीतीच्या संकेतस्थळी विरहाच्या आगीत होरपळत, जुन्या गुलाबी स्मृती जोजवणारी मधुची हळवी अदा ऒलावणारी होती. ‘कुछ ऑंख में ऑंसू बाकी हैं जो मेरे गमके साथी हैं अब दिल हैं न दिल के अरमां हैं बस मैं हूं मेरी तन्हाई हैं’ प्रेम आणि विरह, प्रेमाच्या या दोन टोकाच्या गीतात मधुबाला काळजात घर करते.
के.असिफचा ‘मुगल-ए-आजम’ Mughal-E-Azam शुक्रवार ५ ऑगस्ट १९६० रोजी प्रदर्शित झाला. त्या वेळी तो ‘पार्टली कलर’ होता. (१२ नोव्हेंबर २००४ साली तो पूर्णपणे रंगीत होवून पुन्हा रिलीज केला.) यात मधुबालाला अनेक ‘सोलो’ गाणी होती. ‘परदा नही जब कोई खुदासे बंदोसे परदा करना क्या’ म्हणत थेट शहेनशहालाच नजर भिडवून गाणारी, ‘खुदा निगेहबान हो तुम्हारा धडकते दिल का पयाम ले लो’, ‘मुहोब्बत की झूठी कहानी पे रोये’, ‘हमे काश तुमसे मुहोब्बत ना होती’, ‘बेकस पे करम किजिए सरकार ए मदिना’, ‘मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे’ म्हणतानाची तिची अदा दृष्ट लागावी इतकी सुंदर होती.
‘गेट वे ऑफ इंडीया’ (१९५७) या सिनेमात एक अतिशय सुंदर गीत होते. ‘दो घडी वो जो पास आ बैठे’ यात तिच्या समवेत भारतभूषण होता. ‘हम जमानेसे दूर जा बैठे’ असं म्हणत तिची ‘एन्ट्री’ होते. या जोडीचा सुपर हिट सिनेमा आला १९६० साली ‘बरसात की रात’ यात ओलेत्या मधुबालाने आपल्या प्रेमशरांनी अनेकांना घायाळ केले. पावसात भिजलेले केस गालावरून हळूवार पणे मागे घेणं, निथळत्या पदराला झटकणं, विजेच्या लखलखाटाने नायकाला बिलगणं आणि पुन्हा लाजून दूर होणं सारंचं कसं स्मृतीत जपून ठेवावं असं!
फारसं कधी ऐकायला मिळतं नसलेल्या याच गीताचा दुसरा भाग ‘ड्युएट’च्या स्वरूपात आहे लता-रफीच्या धुंद स्वरात. हे गीत देखील यू टयूब वर आहे. रफीच्या या गाण्याला १९६० सालचा बिनाका टॉपचा मान मिळाला होता. भारतभूषण सोबतच्या ‘फागून’च्या जिप्सी वेषातील मधुचे ‘एक परदेसी मेरा दिल ले गया’, ‘पिया पिया न लागे मोरा जिया’, ‘तुम के रूठ के मत जाना’ ही गाणी कोण विसरू शकेल का?
गोल्डन इरा चे त्रिदेव दिलिप- राज – देव या तिघांसमवेत मधू चमकली. दिलिपसोबत तराना, अमर, संगदील, मुगल-ए-आजम तर देव सोबत निराला, काला पानी, शराबी, नादान, जाली नोट आणि राज सोबत दिल की रानी, नील कमल व दो उस्ताद या प्रमुख सिनेमात ती चमकली. काला पानी मधील ‘अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना’ या गीतातील तिचा लाडीक ‘नखरा’ काही औरच होता! यातील तिची आर्जवी विनंती, लटका राग असलेली रोमॅंटीक अदा कोण विसरेल? हे गीत पाहताना आजही आशाचा आवाज अधिक मादक आहे की मधुचे सौंदर्य अधिक मारक आहे असा प्रश्न कायम पडतो. राज कपूर तर तिचा बालमित्र होता.पण दोघांचे एकत्रित सिनेमे फारसे चालले नाहीत.
दिलिप सोबत मात्र ती अफाट गाजली. सिनेमे आणि मधुबालाची गाणी दोन्ही गाजले. जसे ‘तेरे सदके बलम न करे कोई गम’, ‘जाने वाले से मुलाकात न होने पाई’ (अमर), ‘दिल मे सम गये सजन’ (संगदिल). गुरूदत्त सोबत ‘मि.अॅंड मिसेस ५५’ मध्ये ती होती. यातील ‘इधर तुम हंसी हो उधर दिल जवां है’ हे गीत त्याच्या पिक्चरयज़ेशन मुळे आजही लक्षात आहे. मागच्या पिढीतील आधी नायक व नंतर खलनायक म्हणून गाजलेला प्रेमनाथ देखील तिच्या समवेत ‘बादल’, ‘साकी’ (किसे मालूम था इक दिन मोहब्बत बेजूबां होगी) या सिनेमात होता व तिच्यावर जाम लट्टू होता.
मधुच्या पहिल्या गाजलेल्या सिनेमाचा नायक होता अशोक कुमार. सिनेमा होता १९४९ सालचा गूढ रम्य सिनेमाचा जनक ‘महल’. यातील ‘आयेगा आनेवाला’ (सं.खेमचंद प्रकाश) ने लता आणि मधु दोघीही देशाच्या कानाकोपऱ्यात पोचून कमालीच्या लोकप्रिय झाल्या. अशोक सोबत पुढे हावडा ब्रिज (आईये मेहरबान बैठीये जाने जां), एक साल (सब कुछ लूटा के होश मे आये तो क्या किया) यात चमकली. तिच्या गाण्यांची किती जरी चर्चा केली तरी १९५९ च्या ‘चलती का नाम गाडी’ शिवाय ती पूर्ण होवू शकत नाही. यातील पावसात नखशिखांत भिजलेल्या मधुने कित्येकांची झोप उडवली. ‘एक लडकी भीगी भागीसी’ या गीताने एवढी लोकप्रियता हासिल केली की त्या वर्षीचे ते बिनाका टॉप गीत ठरले.
हे वाचलंत का: बहुगुणसंपन्न असा हा अभिनयाचा राजा: दिलीप कुमार
पुढे हाफ टिकीट, झुमरू या सिनेमात ती किशोर सोबत होती. सुनिल दत्त सोबतच्या ‘इन्सान जाग उठा’ (१९५९) सिनेमात तिला उद्देशून एक गाणं होतं ‘चॉंदसा मुखडा क्यूं शरमाया’. अगदी समर्पक असे हे विशेषण इथे वाटते. गुजरा हुआ जमाना आता नही दुबारा हाफीज खुदा तुम्हारा (शिरी फरहाद), मिल मिल के गायेंगे दो दिल यहां (दुलारी), ठंडी हवा ये चांदनी सुहानी (झुमरू), ठंडी हवा काली घटा आयी गय़ी झुमके (मि.अॅंड मिसेस ५५) ही तिची गाणी आजही वेडावतात. लता,आशा,गीता या त्या काळच्या शिखरावरच्या गायिकांनी मधुला स्वर दिला व गाण्याचं सोनं झालं!
दिलीप सोबतचं तिचं प्रेमप्रकरण पार कोर्टापर्यंत गाजलं. कोर्टात दिलीपने तिच्या वरील प्रेमाची जाहिर कबुली दिली होती. प्रेमनाथ सोबत तिचं नाव जोडलं गेलं. पण लग्न केलं कलंदर कलावंत किशोरकुमार सोबत! १९६० साली दोघांनी लग्न केले. तिच्या साठी किशोरने चक्क धर्मांतर केले. पण मधुचं सौंदर्य शापीत होतं. ऐन तिशीत तिला रक्ताच्या कर्करोगाने गाठले. किशोरने तिला वाचविण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. पण काळाचं विधिलिखित तो टाळू शकला नाही. १४ फेब्रुवारी १९३३ ला जन्मलेली ही भारताची मर्लिन मेन्रो २३ फेब्रुवारी १९६९ साली वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी आपल्यातून निघून गेली!
जिवंतपणी आख्यायिका बनण्याचं भाग्य तिला लाभलं. तिच्या सौंदर्याने तिच्यातील अभिनेत्रीवर मात केली होती. त्यामुळे तिच्यातील अभिनेत्री कायम डावलली गेली हे देखील इथे नमूद करावे लागेल. मात्र आज इतक्या वर्षांनंतरही तिच्या चाहत्यांच्या संख्येत कमी झालेली नाही!