‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
पेंग्विन ब्लूम
काही वर्षांपूर्वी ‘द फेथ’ नावाची एक गोष्ट ऐकली होती. शिक्षकी पेशात असताना आलेल्या अनुभवाची एका फादरने सांगितलेली ही गोष्ट! या फादरला आपलं आयुष्य निरस, निरर्थक वाटत होतं. वर्गात शिकवायचा कंटाळा आल्याने त्याने पहिलीच्या वर्गातील मुलांना ‘द फेथ’ या अगम्य विषयावर निबंध लिहायला सांगितला आणि हा डुलकी घ्यायला मोकळा झाला. तास संपल्यानंतर त्याने मुलांनी लिहिलेले निबंध गोळा केले. त्यातील एका मुलाने लिहिलेल्या निबंधाने या फादरच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून टाकला होता.
त्या मुलाने लिहीलं होतं, ‘माझ्या वडिलांनी एक गाणारा नाजूक पक्षी आमच्या घरी आणला. या पक्ष्याचा आम्हाला खूप लळा लागला. एका रविवारी आम्ही चर्च मधून घरी आलो तेव्हा हा गाणारा पक्षी कपाटाच्या फटीत अडकलेला होता. जखमी झालेला इवलासा जीव काही काळाचाच सोबती असल्याचं डॅडींनी आम्हाला सांगितलं. मला मात्र पूर्ण विश्वास होता की, हा पक्षी पुन्हा उडू लागणार, गाऊ लागणार. मी रात्रभर देवाकडे प्रार्थना केली. सकाळी मी डोळे उघडले तेव्हा आमचा गाणारा पक्षी घरात आनंदाने गिरक्या घेत होता. THIS IS THE FAITH!
एक लहान मुलगा आयुष्यावर अशी श्रद्धा ठेवत असेल तर मी प्रभुने सोपवलेल्या कामाचा कंटाळा का करू? या विचाराने माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून गेला. ‘द फेथ’ ही गोष्ट आठवण्याचे कारण म्हणजे नुकताच नेटफ्लिक्सवर आलेला ग्लेडीअन आयव्हिन या दिग्दर्शकाचा ‘पेंग्विन ब्लूम’ (Penguin Bloom) हा नितांत सुंदर सिनेमा. सॅम ब्लूम या विजीगिषु वृत्तीच्या स्त्रीची कहाणी या चित्रपटात पहायला मिळते.
हे देखील वाचा: क्रिमिनल जस्टीस – बिहाइंड क्लोज्ड डोअर्स: रंगतदार कोर्टरूम ड्रामा
नवरा कॅमेरून आणि नोआ, रुबेन,ओली या मुलांच्या सोबतीत सॅमच आयुष्य अगदी आनंदात व्यतित होत असतं. कुटुंबासमवेत थायलंडला सहलीला गेलेल्या सॅमचा कठड्यावरून पडून अपघात होतो. या अपघातात तिच्या शरीराच्या कमरेखालील भागाच्या संवेदना नष्ट होतात. अंथरुणाला खिळलेल्या सॅमचे आयुष्य यानंतर पूर्णपणे बदलून जाते. नवरा आणि मुलांना आता आपली गरज भासत नाही याची बोच लागून सॅम मानसिकरित्या खचत जाते. आपण गच्चीत बोलावल्यामुळे आईला अपघात झाला ही टोचणी लागलेल्या नोआची सुद्धा आतल्या आत घुसमट होत असते. याचवेळी त्याच्या घरात एक नवीन पाहुणा येतो, हा पाहुणा असतो मुलांना त्याच्या घराच्या आवारात जखमी अवस्थेत सापडलेला मॅगपाय पक्षी! (Australian magpie)
सॅमची मुलं त्याचं नाव पेंग्विन असं ठेवतात. सॅम वगळता सर्वाना पेंग्विनचा लळा लागतो. नवरा आणि मुलं घराबाहेर गेली की पेंग्विनवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सॅम वर येते आणि मग या दोघांमध्ये एक हळुवार नातं निर्माण होतं. अनाहूतपणे ब्लूम कुटुंबाचा सदस्य झालेला पेंग्विन सॅमला तिच्या निराश मनस्थितीतून बाहेर काढण्यास कारणीभूत ठरतो आणि तिला जगण्याची नवी उमेद मिळते हा ‘पेंग्विन ब्लूम’चा उत्तरार्ध लक्षणीय आहे.
‘पेंग्विन ब्लूम’च कथानक सॅम ब्लूमच्या आयुष्यातील सत्य घटनांवर कॅमेरून ब्लूमने लिहिलेल्या पुस्तकावर बेतलेलं आहे. हॅरी क्रीपस आणि शॉन ग्रांट यांनी पटकथा लिहिताना त्याला माहितीपटाचं स्वरूप येणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे. सॅम चिप्लीनने के, ललं ब्लूम परिवाराच्या समुद्र किनारी असलेल्या घराच प्रकाशचित्रण नयनरम्य आहेच पण त्याने सॅम आणि पेंग्विन या दोघांच्या घरातील वावराची टिपलेली दृश्ये देखील खिळवून ठेवणारी आहेत.
हे वाचलंत का: प्रयोगशील ‘जून’ आणि ‘स्टील अलाइव्ह’
हॅरी क्रीपस आणि शॉन ग्रांटच्या पटकथेचा मुख्य भर अपघातामुळे विकलांग झालेल्या व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये झालेले बदल टिपण्यावर आहे.
सॅमच्या स्वछंदी जगण्याला अपघातामुळे बसलेली खीळ, मुलं आता आपल्यावर अवलंबून नाहीत याची जाणीव होऊन तीच खंतावत जाणं, आपलं अस्तित्व अर्थशून्य झालं असल्याची भावना तिच्या मनात बळावणं, हा घटनाक्रम मेलोड्रॅमॅटिक न करता, दिग्दर्शक मोजक्याच प्रसंगातून व्यक्त करतो. कॅमेरूनने समजूतदारपणे सॅमची काळजी घेणं, नोआला वाटत असलेला अपराधीपणा सॅमने त्याच्याशी मोकळेपणाने बोलून दूर करणं, हे प्रसंग चित्रपटाला अपेक्षित उंची गाठून देतात.
केवळ अपघातग्रस्त व्यक्तीच नव्हे तर तिच्या संपूर्ण कुटुंबाची त्या अपघातामुळे होणारी परवड ‘पेंग्विन ब्लूम’ मध्ये ठळकपणे मांडली जाते. पेंग्विनबरोबर मैत्री झाल्यानंतर सॅमच्या केवळ मानसिकतेमध्येच नव्हे तर शारीरिक हालचालींमध्ये सुद्धा बदल घडून येतो. कायाकिंग हा नौकाविहाराचा क्रीडा प्रकार ती प्रयत्नपूर्वक शिकून घेते. पेंग्विनने आपल्या जखमांवर मात करून स्वछंदी होणं आणि सॅमने आपल्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करणं, या दोन समांतर जाणाऱ्या पण एकमेकांना पूरक असलेल्या घटनांमधून ‘पेंग्विन ब्लूम’ ची मांडणी दिग्दर्शक करतो.
पेंग्विनच्या नावापुढे ‘ब्लूम’ हे आडनाव लावून त्याला आपल्या परिवाराचा सदस्य म्हणून ओळख देण्याची सॅम आणि कॅमरूनची कृती त्यांचा सकारात्मक दृष्टीकोन अधोरेखित करते. निओमी वॅटस् (Naomi Watts) या निर्माती/अभिनेत्रीला सॅमची कथा जगापुढे आणाविशी वाटली. त्यातील सॅमची भूमिका तिने तितक्याच समरसतेने केली आहे. अँड्रू लिंकन आणि ग्रिफिन मुरे–जानस्टोन यांनी कॅमेरून आणि नोआच्या व्यक्तिरेखांना योग्य न्याय दिलाय.
एखादा अपघात आपल्या जगण्याला निराशावादी वळणावर आणून सोडतो पण पेंग्विन सारखा पक्षी आपल्या अस्तित्वाने ते जगणं अर्थपूर्ण करण्यास मदत करतो. आपल्या सुंदर आयुष्यावरील श्रद्धा अधिक दृढ करायची असेल तर या ‘पेंग्विन ब्लूम’ची भेट घ्यायलाच हवी.