‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
थरार नाट्याचा दुसरा अंक- दृश्यम २
पडद्यावर ‘समाप्त’ अशी पाटी झळकते तेव्हा आपण पाहत असलेल्या कथानकाचा शेवट झालेला असला तरीही त्या कथानकातील पात्रांचे पुढे काय झालं ? ही उत्सुकता आपल्या मनात लागून राहते. ओपन एन्ड असलेल्या चित्रपटात तर प्रेक्षकांच्या कल्पना विस्ताराला दिग्दर्शकाने भरपूर खाद्य देऊन ठेवलेलं असतं. एखादी कलाकृती जेव्हा यशस्वी होते तेव्हा त्याच्या दिग्दर्शकाला आपण निर्माण केलेल्या व्यक्तिरेखांचा थांबलेला प्रवास पुढे चितारावा अशी इच्छा निर्माण होण स्वाभाविक आहे.
चित्रपटाचा पुढील भाग [sequel] ही संकल्पना आपल्याकडील व्यावसायिक चित्रपटसृष्टीत अलीकडच्या काळात चांगलीच रुजली आहे. ‘गँगज् ऑफ वासेपूर’, ‘बाहुबली’ ही त्याची काही लोकप्रिय उदाहरणे! त्यामध्ये आता ‘दृश्यम’ ची भर पडली आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे कौटुंबिक थरारनाट्य असलेला जिथू जोसेफचा ‘दृश्यम’ हा मल्याळम भाषेतील चित्रपट २०१३ ला प्रदर्शित झाला तेव्हा भारतभरातील सगळ्या प्रेक्षकांनी त्याला जोरदार प्रतिसाद दिला होता.
मोहनलाल या कसलेल्या कलाकाराचा अभिनय आणि सशक्त पटकथा यामुळे ‘दृश्यम’ चर्चेत आला. दक्षिणेतील इतर सर्व भाषांमध्ये त्याचे रिमेक झाले. हिंदीमध्ये अजय देवगण आणि तब्बूला घेऊन निशिकांत कामतने ‘दृश्यम’ ची निर्मिती केली ज्याला भरपूर लोकप्रियता मिळाली. जिथू जोसेफने ‘दृश्यम’ च्या पुढल्या भागाचा विचार या लोकप्रियतेच्या निकषावर केला असणार हे निश्चित! कारण ज्या वळणावर ‘दृश्यम १’ थांबला होता ते कथेला पूर्णत्व देऊन प्रेक्षकांना समाधान देणार होते. पण तरीही कथेतील पात्रांची त्या घटनेनंतर बदलेली मानसिकता आणि पोलिसांचा अपूर्ण राहिलेला तपास, या घटकांचा आधार घेऊन जिथू जोसेफने ‘दृश्यम २’ ची पटकथा बांधली आहे.
थरारक चित्रपटा कडून असलेल्या आपल्या नेहमीच्या अपेक्षा ‘दृश्यम २’ (Drishyam 2) पूर्ण करेल की नाही याची किंचित शंका पूर्वार्धात येते. पहिल्या भागात असलेली धक्कादायक घटनांची संख्या व त्यांचा वेग दुसऱ्या भागात नाही मात्र तशी अपेक्षा न ठेवता, शेवटाकडे येणाऱ्या घटनांची उकल लॉजिकल व्हावी म्हणून तपशीलवार चित्रित केलेला पूर्वार्ध आणि पहिल्या भागातील संकल्पनेशी जोडून ठेवलेली नाळ, पाहता ‘दृश्यम २’ पुन्हा एकदा एक अनपेक्षित थरारनाट्य पाहिल्याचा आनंद देतो.
हे देखील वाचा: द व्हाईट टायगर: एका गुलामाच्या अस्तित्वाची लढाई
‘दृश्यम’चा दुसरा भाग पहिल्या भागात घडून गेलेल्या घटनाचा परिणाम गडद करत असल्यामुळे ज्या प्रेक्षकांनी पहिला भाग पाहिला आहे त्यांना अधिक मजा येईल याची काळजी घेतानाच आधीच्या भागातील काही घटना आणि त्यांचे संदर्भ संवादातून देऊन प्रथमच ‘दृश्यम’ पाहणाऱ्या प्रेक्षकांचा रसभंग होणार नाही याची काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे. जॉर्जकुट्टीने [मोहनलाल] त्याच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या वरूणचे प्रेत स्थानिक पोलीस स्टेशनच्या इमारतीखाली पुरून ठेवलेलं असते.
या घटनेचा साक्षीदार असलेला जोश एका दुसऱ्याच खुनाच्या आरोपाखाली गजाआड होतो आणि सहा वर्षांनी गावात परततो. या सहा वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं असते. केबल टिव्हीचा व्यवसाय करणाऱ्या जॉर्जकुट्टीने आता एक चित्रपटगृह उभारलेल असते. एका चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी त्याने विनयचंद्रन [साईकुमार] या विख्यात पटकथाकाराला करारबद्ध केलेलं असते . विनयचंद्रनने लिहिलेल्या एका कादंबरीचं तो प्रकाशन करतो. या दरम्यान वरूणचे आई वडील त्याचे श्राद्ध करण्यासाठी परदेशातून परततात. आपल्या मुलाच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार आपण करू शकलो नाही याची त्यांना खंत असते. पोलीस खात्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा जॉर्जकुट्टीवरील संशय कायम असतो. जोशच्या मार्फत त्यांना जॉर्जकुट्टीने केलेल्या कृत्याची माहिती मिळते. ते जॉर्जकुट्टीला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात. जॉर्जकुट्टीला याचा सुगावा लागतो आणि पुन्हा एकदा जॉर्जकुट्टी आणि पोलीस यांच्यातील उंदीर मांजराचा खेळ सुरु होतो.
‘दृश्यम २’ चा क्लायमॅक्स अपेक्षित असला तरीही त्या पर्यंत प्रेक्षकांना घेऊन जाताना त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी दिग्दर्शकाने रचलेला प्लॉट लक्षणीय आहे. या शेवटाकडे येताना प्रेक्षकांना पडलेल्या प्रश्नाचा गुंता सोडवण्यासाठी त्याने पहिल्या प्रसंगापासून जी रचना केली आहे ती दाद देण्याजोगी आहे. चित्रपटातील कोणतेही दृश्य, संवाद किवा प्रतिमा त्या चित्रपटाच्या आशयाला आणि अंतिम परिणामाला पूरक असायला हवेत हे तत्व जिथू जोसेफ पाळतात याचा प्रत्यय ‘दृश्यम २’ पाहताना येतो.
हे वाचलंत का: चॉपस्टिक्स : हरवलेल्या जगण्याचा शोध
कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे मानसिक स्वास्थ बिघडवून टाकेल अशी घटना घडल्यावर त्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून बायको आणि मुलींना धीर देणाऱ्या जॉर्जकुट्टीला आपल्याला पुढील आयुष्यात पुन्हा एकदा संकट ओढवेल याची शंका असतेच. तो या संकटाला तोंड देण्यासाठी हुशारीने तयारी करत असताना पोलीस अधिकारी सुद्धा त्याला जाळ्यात ओढण्यासाठी व्यूहरचना करत असतात. ‘दृश्यम २’ मधील हा भाग संथगतीने जातो. पण तो तसाच असणे ही पटकथेची गरज आहे. शेवटाकडे येणाऱ्या घटना अपेक्षित असल्या तरीही त्यातून दिग्दर्शकाने मांडलेला विचार चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो. हा शेवट जॉर्जकुट्टीच्या व्यक्तिरेखाला एक वेगळा आयाम देतो आणि नियतीने त्याच्या नशिबी लिहिलेल्या अटळ शोकांतिकेच सूचन सुद्धा करतो.
जॉर्जकुट्टीच्या पत्नीच्या भूमिकेतील मीनाच्या वाट्याला पहिल्या भागापेक्षा मोठ्या लांबीची भूमिका येऊन सुद्धा ती फारसा प्रभाव टाकू शकत नाही. जॉर्जकुट्टीच्या शेजारी राहणारी आणि दारुड्या नवराच्या अत्याचाराला रोज बळी पडणारी सरिता,अंजली नायरने प्रभावी केली आहे. पहिल्या भागाप्रमाणे या भागात सुद्धा मोहनलाल आपला करिश्मा दाखवतात मात्र गेली चाळीस वर्ष मोहनलाल यांचे वैविध्यपूर्ण चित्रपट पाहणाऱ्या त्यांच्या चाहत्यांना ही भूमिका पाहताना वेगळं काही हाती लागत नाही.
‘दृश्यम २’ ला ओटीटी वर मिळालेलं यश पाहून जिथू जोसेफ तिसऱ्या भागाच्या तयारीला लागले असल्याची बातमी आली आहे. दिग्दर्शकाच्या मनात त्याची पात्र सतत जिवंत राहतात आणि त्याला कायमचं अस्वस्थ करून टाकतात हेच खरं!