‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
वैविध्यपूर्ण भूमिका करणारी अभिनेत्री : रंजना देशमुख
काही व्यक्तिमत्व अशी असतात, की ती आपल्या हृदयात कायमचं स्थान निर्माण करतात. त्यांच्या आयुष्याकडे पाहिलं की आपल्याला त्यांच्या आयुष्यातील संघर्ष लक्षात येतो. आज ३ मार्च. हा दिवस म्हणजे अभिनेत्री रंजना देशमुख यांचा स्मृतीदिन. अभिनेत्री रंजना (Ranjana Deshmukh) म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख यांच्या कन्या. अभिनेत्री संध्या या त्यांच्या मावशी. परेल येथील इंग्लिश स्कुलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले तर कॉलेजचे शिक्षण बी एम रुईया गर्ल्स कॉलेज मधून झाले होते.
त्यांची कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरु झाली ती ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ या चित्रपटापासून. पण त्याआधी त्यांनी ‘इये मराठीचिये नगरी’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं होतं. ‘झुंज’ चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली. कोण होतास तू काय झालास तू, हे त्यांच्यावर चित्रित झालेलं गीत तुमच्या लक्षात असेल. त्यांच्या भूमिकांत वैविध्य होतं. ‘गुपचूप गुपचूप’ चित्रपटात त्यांचे नायक कुलदीप पवार होते. त्या भूमिकेसाठी आणि ‘अरे संसार संसार’ चित्रपटातील त्यांच्या भूमिकेकरिता त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राज्य पुरस्कार मिळाला होता .
अशोक सराफ आणि रवींद्र महाजनी यांच्या बरोबरचे त्यांचे चित्रपट खूप गाजले. गोंधळात गोंधळ, खिचडी, लक्ष्मीची पावले, सासुरवाशीण, हळदीकुंकू, असला नवरा नको ग बाई, एक डाव भुताचा हे त्यांचे यशस्वी चित्रपट. ‘जखमी वाघीण’ मध्ये त्यांनी खूप वेगळी भूमिका केली. तर ‘सत्यम शिवम सुंदरा’ ही सुशीला चित्रपटात त्यांच्यावर चित्रित झालेली प्रार्थना आजही रेडिओच्या माध्यमातून अनेकदा ऐकवली जाते. त्यांच्या कारकिर्दीविषयी लिहिताना ‘चानी’ चित्रपटाचा उल्लेख केलाच पाहिजे.
हे देखील वाचा: आव्हान पेलणारी रंजना!
चिं त्र्यं खानोलकर यांच्या ‘चानी’ कादंबरीवर आधारित हा चित्रपट होता. त्यातील ‘तो एक राजपुत्र’ हे गीत लक्षात राहते. ब्रिटिश अधिकारी आणि मराठी स्त्री यांची मुलगी असणारी ‘चानी’ ही त्यांची शीर्षक भूमिका होती. मंगला ग मंगला (गोंधळात गोंधळ), काळ्या मातीत मातीत (अरे संसार संसार), अहो नऊवारी नऊवारी (खिचडी), फिटे अंधाराचे जाळे (लक्ष्मीची पावले), हा सागरी किनारा (मुंबईचा फौजदार), निसर्गराजा ऐक सांगतो (झुंज) ही रंजना यांच्यावर चित्रित झालेली काही गीते आजही आपल्या लक्षात राहतात.
यशाच्या शिखरावर असताना मात्र एक दुर्दैवी क्षण त्यांच्या आयुष्यात आला. झुंजार चित्रपटाच्या चित्रिणीकरणाला बंगलोर येथे जाताना त्यांचा अपघात झाला. तेव्हा त्यांचे वय फक्त बत्तीस वर्षे होते. त्यात त्यांना अपंगत्व आलं, पण त्या प्रचंड जिद्दी होत्या. त्या खचल्या नाहीत. अपंगत्व आल्याने एका मुलीला तिचा प्रियकर सोडून जातो, अशा आशयाचे कथानक असणाऱ्या ‘फक्त एकदाच’ या नाटकात त्यांनी व्हील चेअरवर बसून भूमिका केली. या नाटकाचे चाळीस प्रयोग झाले होते. ३ मार्च २००० रोजी त्यांचं निधन झालं. मराठी चित्रपटांच्या इतिहासात रंजना यांचं एक विशेष स्थान आहे, हे आपण लक्षात ठेवायला हवं .