‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
महिला दिनानिमित्त वेबसिरीजचा धुमधडाका…
महिला दिनाचे औचित्य साधून ओटीटी प्लॅटफॉर्मवरही महिलांवर आधारीत वेबसिरीज येत आहेत. त्यापैकी एक आहे बॉम्बे बेगम. 8 मार्च रोजी ही वेबसिरीज नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. अलंकृती श्रीवास्तव निर्मित आणि दिग्दर्शित या वेबसिरीजमधून अभिनेत्री पूजा भट्ट तब्बल दहा वर्षानंतर पडद्यावर येत आहे. वेगवेगळ्या वर्गातील पाच महिलांची ही कथा असून याचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे आपल्या मराठमोळ्या अमृता सुभाषचा ठसकेबाज अभिनय. 8 मार्च रोजी आणखी एक वेबसिरीज येतेय. झी 5 वर मॅरीड वुमन ही वेबसिरीज येत असून यात रिद्धी डोगरा आणि मोनिका डोगरा या अभिनेत्री काम करत आहेत. एका कुटुंबावर आलेल्या संकटाला त्यातील प्रमुख महिला कशी सामोरी जाते हे यात दाखवले असून ही वेबसिरीजही महिलवर्गात लोकप्रिय होईल अशी खात्री सिरीजच्या टीमला आहे.
महिलादिनाचे औचित्य साधून अनेक कार्यक्रम होत असतात. मग या सर्वात सध्या सर्वात चलतीचा प्लॅटफॉर्म म्हणून ओळखला जाणारा ओटीटी प्लॅटफॉर्म कसा मागे राहील. ओटीटीवर महिला दिनी काही चांगल्या वेबसिरीज येत आहेत. शहरी भागात रहाणा-या महिलांच्या समस्या वेगवेगळ्या असतात. प्रत्येकीचा जीवनस्तर जसा असतो तशीच तिला येणारी समस्या असते. बॉम्बे बेगम्समध्ये (Bombay Begums) हाच धागा पकडण्यात आला आहे.शहरी भागात रहाणा-या पाच महिला यात असून त्यांच्याभोवती सर्व सिरीज फिरतेय. शाहना गोस्वामी, प्लाबिता बोरठाकुर, अमृता सुभाष, आराध्या आनंद, राहुल बोस, विवेक गोम्बर, दानिश हुसैन आणि नाहिद कौशिक हे कलाकार बॉम्बे बेगम्स सिरीजमध्ये आहेत.
या पाच महिला वेगवेगळ्या वयाच्या आहेत. त्यांची आर्थिक परिस्थितीही वेगळी आहे. त्यांच्यापुढे येणा-या सामाजिक समस्याही वेगळ्या आहेत. यातून या महिला कशा पद्धतीनं वाट काढतात हे ये वेबसिरीजमध्ये बघता येईल. नेटफ्लिक्सवर येणा-या या सिरीजमध्ये अमृता सुभाष एक डान्सर दाखवण्यात आली आहे. अमृतानं केलेल्या या भूमिकेचं मान्यवरांनी कौतुक केलं आहे.
झी 5 वरही 8 मार्च रोजी मॅरीड वुमन (A Married Woman) ही वेबसिरीज रिलीज होत आहे. नावानुसार यात विवाहित महिलांच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. मॅरीड वुमनचं दिग्दर्शन साहीर रजा यांनी केलं असून नसरुद्दीन शहा यांचा मुलगा इमाद शाह आणि आएशा रजा यात प्रमुख भूमिकेत असतील. मंजू कपूर यांच्या कथेवर आधारीत ही वेबसिरीज आहे. एक विवाहीत महिला आपल्या कुटुंबासह दिल्ली येथे रहाते. अत्यंत धार्मिक असलेल्या या महिलेच्या जीवनात अचानक काही समस्या येतात. काही हिंसक घटना घडतात, मग त्याचे राजकारण होते. या सर्वात तिचे कुटुंब उद्ध्वस्त होते की काय अशी परिस्थिती निर्माण होते. यात रिधि डोगरा, मोनिका डोगरा, इमाद शाह, दिव्या सेठ, नादिरा बब्बर, सुहास आहूजा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ALT बालाजी आणि झी 5 वर ही सिरीज पहाता येणार आहे. ही सिरीज रिलीज होण्यापूर्वी ऑल्ट बालाजी ची सर्वेसर्वा एकता कपूरने महिला दिनाच्या शुभेच्छा देत या सिरीजची झलक दाखवणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
ओटीटी माध्यमावर आणखीही काही सिरीजनं आपली लोकप्रियता कायम ठेवली आहे. यात महिलाच सर्वेसर्वा आहेत. सुष्मिता सेनची आर्या ही त्यापैकीच एक वेबसिरीज आहे. आर्या ही नायिका-प्रधान एक्शन-थ्रिलर सिरीज आहे. राम माधवानी दिग्दर्शित या सिरीजचा दुसरा सिजनही लवकरच येणार आहे. याशिवाय इरोस नाऊवर फ्लेश नावाची सिरीजही चर्चित आहे. यात स्वरा भास्कर पोलीस अधिका-याच्या भूमिकेत आहे.
महिला ट्रॅफिंकींग आणि ड्रग्ज यावर ही वेबसिरीज आधारीत आहे. या काही सिरीजसोबत शी नावाची वेबसिरीज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. मुंबई पोलिसांमधील एका कॉन्स्टेबलवर आधारीत ही वेबसिरीज आहे. ही महिला पोलीस एक मोठ ड्रग्ज रॅकेट उघड करते. यात अदिती पोहनकर मुख्य भुमिकेत असून विजय वर्माही आहेत. इ्म्तियाज अली यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिरीजच्या दुस-या सिजनची घोषणा झाली आहे.
पूजा भट्ट, सुष्मिता सेन यांच्या अभिनयाचा जलवा आता वेबसिरीजवर पुन्हा बघता येणार आहे. पण यासोबतच धकधक गर्ल माधुरी दिक्षितही आता या वेब युगात प्रवेश करणार आहे. त्यामुळेच महिला दिन असो वा नसो वेबसिरीजच्या क्षेत्रात, भावी काळात महिलांचा दबदबा राहणार हे मात्र नक्की.