‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
कमल आणि सलीम यांच्या प्रेमाची गोष्ट… ‘बॉम्बे रोज’!
भारतात सचेतपट [ॲनिमेशन] या शैलीला अजूनही चित्रपटांच्या मुख्य धारेत स्थान मिळालेलं नाही. सचेतपट लहान मुलांच्या मनोरंजनासाठी तयार केल्या गेलेल्या, छोट्या लांबीच्या कार्टूनपटांच्या व्याप्तीमध्ये मर्यादित राहिले आहेत. त्यांचा वापर करून पूर्ण लांबीचा गंभीर आशय व्यक्त करणारा चित्रपट निर्माण करण्याचे धाडस अजून कोणी केलेले नाही. गीतांजली राव यांचा नेटफ्लिक्स वर नुकताच प्रदर्शित झालेला ‘बॉम्बे रोज’ हा सचेतपट याला सणसणीत अपवाद ठरला आहे.
अशा प्रकारचा प्रयोग करणे हे खरं तर अत्यंत कष्टाचे आणि वेळखाऊ काम आहे. एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरण आणि त्यावरील तांत्रिक सोपस्कार काही महिन्यात पूर्ण होऊ शकतात मात्र सचेतपटाच्या संकल्पनेपासून त्याला पूर्णत्व येण्यासाठी काही वर्ष द्यावी लागतात. संगणकाने सचेतपट निर्माण करणाऱ्यांचे काम थोडे फार हलके केले असले तरीही त्याची एकूण निर्मिती प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी असते. या प्रक्रियेतून निर्माण होणारी कलाकृती सुद्धा दीर्घकाळ स्मरणात राहील याची काळजी दिग्दर्शक घेत असतो. गीतांजली रावने निर्माण केलेले सचेतपट पाहत असताना याचा सातत्याने प्रत्यय येतो.
गीतांजली राव (Gitanjali Rao) हे नाव सर्वप्रथम चर्चेत आले ते तिने डीझाईन केलेल्या वोडाफोनच्या जूजूंमुळे. त्यानंतर तिच्या ‘प्रिंटेड रेनबो’ या सचेतपटाला कान चित्रपट महोत्सवात तीन मानाचे पुरस्कार आणि आपल्याकडील मिफमध्ये सुवर्णशंख पुरस्कार मिळाला. सचेतपटातून एक संवेदनशील कथा सांगितली जाऊ शकते याचा अनुभव ‘प्रिंटेड रेनबो’ पाहताना आला होता. एक वृद्ध स्त्री आणि छंद म्हणून जमा केलेल्या काडेपेट्यावरील चित्रांतून तिने केलेली सफर असा अद्भुत विषय मांडताना गीतांजलीने वृद्धापकाळात येणारे एकाकीपण आणि आयुष्यभर संसारासाठी राबलेल्या स्त्रीने आपल्या मनात दाबून ठेवलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न याचं लोभस चित्रण केलं होतं. सचेतपट माध्यमाच्या ताकतीचा यथायोग्य उपयोग केल्याने ‘प्रिंटेड रेनबो’ लक्षणीय झाला होता. त्यानंतर तिने निर्माण केलेल्या ‘True Love story’ या सचेतपटात तिने आपल्या लाडक्या मुंबईत राहणाऱ्या एका युगुलाची प्रेम कहाणी सांगितली होती.
गीतांजली रावने तिच्या ‘बॉम्बे रोज’ (Bombay Rose) मध्ये तिने केलेल्या आधीच्या सचेतपटातील दोन्ही आशयाचा खुबीने उपयोग करत एक नवीन कथानक मांडलं आहे. हे कथानक बॉलीवूड मधील व्यावसायिक चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना नवीन नाही पण सचेतपटातून त्याची गीतांजली रावने केलेली मांडणी मात्र आकर्षक झाली आहे. पन्नास आणि नव्वदीच्या दशकातील मुंबई, जुहू चौपाटीच्या परिसरात राहणारी श्रीमंत आणि कनिष्ठ वर्गातील माणसे, त्यांची जीवनशैली हे सगळं गीतांजलीने वेगवेगळ्या रंगसंगतीचा वापर करून जिवंत केले आहे.
‘बॉम्बे रोज’ ही गोष्ट आहे कमल आणि सलीम यांच्या प्रेमाची! कमल गजरे विकण्याचा व्यवसाय करून घराला हातभार लावीत असते. तिच्या वस्तीत राहणारा सलीम हा काश्मीर मधून विस्थापित झालेला मुस्लीम तरुण. दहशतवादी कारवाई मध्ये त्याचे आई वडील मारले गेले आहेत. त्या दुःखाची भळभळती जखम मनात घेऊन तो जगतो आहे. कब्रस्तानातील कबरींवर वाहिलेली फुल चोरून ती विकण्याचा उद्योग तो करतोय. जवळच्या चित्रपटगृहात जाऊन सुपर स्टार राजा खानचे ‘प्यार का फसाना’सारखे दे मार चित्रपट पाहताना त्यातील नायक नायिकेच्या प्रतिमेत तो स्वतःला आणि कमलला पहात असतो. कमल रात्रीच्या वेळी डान्सबार मध्ये काम करते हे सत्य सलीमला कळते तेव्हा तिच्याबद्दल त्याला वाटणारी अनुकंपा अधिक वाढते.
कमलला या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी तो प्रयत्न करू लागतो. त्यांच्या प्रेमाच्या मार्गात एक मोठा अडसर असतो तो मार्कचा! मार्क कमलच्या वस्तीत राहणारा गुंड. कमलला कामाचे आमिष दाखवून दुबईला पाठवण्याचे मनसुबे तो आखत असतो. त्याच्या या मनसुब्याचे काय होते? कमल सलीमच्या प्रेमकथेची परिणीती या असंवेदनशील माणसांच्या शहरात कशी होते हे ‘बॉम्बे रोज’ मध्ये आपल्याला पहायला मिळते. या शहरात कमल सलीम सारखी माणसे छोटी छोटी स्वप्न उरत बाळगून जगत असतात. त्या स्वप्नांची परिपूर्ती होतेच असं नाही पण म्हणून ही माणसे जगणे सोडत नाहीत. एक नवीन आशेचा किरण कमल सारख्या सामान्य जीवन जगणाऱ्या मुलीच्या आयुष्यात नेहमीच येतो या समेवर ‘बॉम्बे रोज’ येतो.
कमल सलीमची गोष्ट सांगताना गीतांजलीनी त्यांच्या आसपासची माणसे आणि मुंबईतील जुहूचा परिसर आपल्या चित्रांमधून मांडताना हिंदी चित्रपटांचा सामान्य प्रेक्षकावरील प्रभाव ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना’, ‘दिल तडप तडप के’ सारख्या लोकप्रिय गाण्याच्या धून वापरून अधोरेखित केला आहे. कमलच्या लहान बहिणीच्या, ताराच्या, शिक्षणाची जबाबदारी उचलणारी मिसेस डिसुझा, पडद्यावर हिरोगिरी करणारा, कनवाळूपणाचा अभिनय करणारा पण प्रत्यक्ष जीवनात मग्रूर असणारा सुपर स्टार राजा खान, कमलला वाममार्गाला लावणारा मार्क ही सगळी पात्र तिने वेगवेगळ्या घटनांतून उभी केली आहेत. त्यांच्या पेहरावाची रंगसंगती आणि संवाद [सायली खरे, मकरंद देशपांडे, अनुराग कश्यप, गीतांजली कुलकर्णी यांनी या पात्रांना आपले आवाज दिले आहेत.]
यातून त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये चपखलपणे व्यक्त झाली आहेत. सायली खरे आणि योव रोसेनथल याचं कर्णमधुर संगीत यामुळे ‘बॉम्बे रोज’ची लज्जत अधिक रंगतदार झाली आहे. स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेलं व सायली खरेनी गायलेलं ‘रेवा’ हे गीत कमलची आर्तता थेट भिडवते.
मिसेस डिसुझाचे प्रसंग पाहताना ‘प्रिंटेड रेनबो’ मधील आजीबाईंची आठवण होते. त्यांची मनीमाऊ त्यांच्या अवतीभवती सतत घुटमळत असते. आजी आणि मनीचे दिग्दर्शिकेबरोबर असलेले नाते पुन्हा एकदा तिने ठळकपणे मांडलं आहे. कब्रस्तानामधील आत्म्यांनी रात्री बाहेर येऊन साजऱ्या केलेल्या पार्टीचा प्रसंग उत्तम जमून आलाय. मार्क कमलच्या अवतीभवती घुटमळत असताना त्याचे गिधाडा मध्ये केलेलं रुपांतर हे सचेतपटामध्येच प्रभावीपणे येऊ शकते. अशा रूपक प्रतिमांचा सर्जक वापर केल्याने ‘बॉम्बे रोज’ हा त्याच्या सामान्य कथानकामधील प्रेक्षकांची गुंतवणूक शेवट पर्यंत कायम ठेवतो.