दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
दे मार…. मुंबई सागा !
गँगस्टर, राजकीय नेते, त्यांना पैसे पुरवणारे मोठे व्यापारी, आणि या सर्वांवर वर्चस्व ठेऊ पाहणारे पोलीस. या चौकडीचे होणारे व्यवहार आणि एकमेकांवर वर्चस्व ठेवण्यासाठी सतत होणा-या कुरघोडी, हत्या, मारामारी यावर आधारीत असणारा ‘मुंबई सागा’ (Mumbai Saga) नुकताच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. संजय गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटात ८० ते ९० च्या काळातील मुंबईतील काही घटनांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. जॉन अब्राहम यात एका गँगस्टरच्या भूमिकेत असून त्यांनी साकारलेला अर्मत्य राव बघण्यासाठी मुंबई सागा पहावा असा झाला आहे.
मुंबई सागाची सुरुवात गायतोंडे नावाच्या एका गुंडापासून सुरु होते. हप्ता वसूलीसाठी निघालेल्या गायतोंडेचा आणि लहानग्या अर्जुनचा वाद होतो. यातून गायतोंडे सरळ त्याला पुलावरुन खाली फेकून देतो. पण त्याचा मोठा भाऊ, अर्मत्य राव त्याला वाचवतो आणि गायतोंडेचा बदलाही घेतो. गायतोंडेची तो संपूर्ण गॅंगच संपवतो. त्याला एक मोठा व्यापारी आडकाठी करतो तर त्या व्यापा-याचीही अर्मत्य राव हत्या करतो. यातून त्याचे गुन्हेगारी जगतात नाव होते. दहशत निर्माण होते. हा अर्मत्य राव मग नारी खान नावाच्या ड्रग डीलरसोबत आपला धंदा वाढवतो. हत्यारांचा पुरवठा करणारा मुरली शंकर त्याला सामिल होतो. अर्मत्य रावला एका नेत्याचा पाठिंबा असतो. या अर्मत्य रावचे वाढते वर्चस्व नष्ट करण्याची जबाबदारी एका पोलीस ऑफीसवर येते. हा पोलीस ऑफीसर आल्यावर सगळ्या कथेला कलाटणी मिळते… ती कशी हे मुंबई सागात पहाण्यासारखे आहे.
क्राइम थ्रिलर असलेल्या मुंबई सागामध्ये ॲक्शन सीन पहाण्यासारखे आहेत. याचे सर्व श्रेय दाक्षिणात्य ॲक्शन डायरेक्टर आरिफ-अरबू यांना जाते. जॉन अब्राहम (John Abraham) आणि इमरान हाश्मी(Emraan Hashmi) सोबत महेश मांजरेकर, अमोल गुप्ते, सुनील शेट्टी, समीर सोनी, गुलशन ग्रोवर, प्रतीक बब्बर, रोहित राय या सर्व कलाकारांचा ॲक्शन सीनमध्ये योग्य वापर करुन घेतला आहे. या अभिनेत्यांसोबत काजल अग्रवाल आणि अंजना सुखानी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. इमरान हाशमी पहिल्यांदाच पोलीस अधिका-याची भूमिका करीत आहे. त्याच्या या अभिनयाचे कौतुक होत आहेत. यासोबत अमोल गुप्ते आणि महेश मांजरेकर यांच्या केमिस्ट्रीला तोड नाही.
कोविडमुळे मोजके चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहेत. गेल्या आठवड्यात जान्हवी कपूरचा रुही मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेला एकमात्र चित्रपट असल्याचा रुहीला चांगलाच फायदा झाला आहे. आता मुंबई सागा मुळे रुहीच्या कमाईला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. मुंबई सागासोबत अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्राचा संदीप और पिंकी फरार हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. मात्र कथेतील विस्कळीतपणामुळे हा चित्रपट रेंगाळल्यासारखा झाला आहे. अर्थात याचा फायदा रूही आणि मुंबई सागाला मिळण्याची शक्यता आहे.