‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
राम सेतु… भारतीयांच्या शक्ती, शौर्याची गाथा!
अक्षय कुमारचा महत्वाकांक्षी चित्रपट राम सेतुचा मुहूर्त नुकताच अयोध्या येथे झाला. अक्षय या चित्रपटात पुरातत्व शास्त्रज्ञाची भूमिका साकारत असून भारताचे सांस्कृतिक आणि ऐतिहासीक वैभव रास सेतुच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. खिलाडीकुमार म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार दरवर्षी किमान चार चित्रपट करतो. गेल्यावर्षी कोरोनाचा कहर असला तरी अक्षयचा लक्ष्मी चित्रपट प्रदर्शित झाला. याशिवाय अक्षयनं आगामी चित्रपटाचीही जोरदार तयारी केली. त्यामध्ये यशराज बॅनरखाली येणारा पृथ्वीराज हा प्रमुख चित्रपट आहे. सर्वात चर्चा झाली ती राम सेतु या चित्रपटाची. अक्षयनं महिन्यापूर्वी या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केल्यावर त्याच्या लूकचीही चर्चा झाली. लांब केस असलेला अक्षयकुमारचा लूक वेगळा भासला. त्याबरोबरच त्याच्या चाहत्यांमध्ये राम सेतुच्या कथेबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.
राम सेतु (Ram Setu) चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक शर्मा आहेत. राम सेतुचे क्रिएटीव्ह दिग्दर्शक म्हणून डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी काम बघणार आहेत. डॉ. द्विवेदी हेच अक्षयच्या आगामी पृथ्वीराज चित्रपटाचे निर्माते आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर या चित्रपटाचे अर्धेअधिक शुटींग मुंबईत होणार आहे. मात्र देशातील काही खास ठिकाणीही राम सेतुचे चित्रिकरण होणार आहे. त्यात अयोध्येचाही समावेश असेल. यातून श्री राम हे आपल्या संस्कृतीचा प्रमुख भाग असल्याचे दाखवण्यात येणार आहे. चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस, नुसरत भरुचा या दोघीही अभिनेत्री महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. मात्र अद्यापही त्यांचा लूक जाहीर न झाल्यानं त्यांच्या भूमिकेबाबतही उत्सुकता आहे.
या चित्रपटाचा मुहूर्त अयोध्येला श्री रामाच्या आशिर्वादानं झाला. यावेळी चित्रपटाची सर्व टीम उपस्थित होती. स्वतः अक्षय राम सेतुबाबत खूप उत्साहीत आहे या चित्रपटाची कथा भारतीयांची शक्ती, शौर्य सांगणारी आहे. अक्षयच्या म्हणण्यानुसार राम सेतु चित्रपटात जुन्या आणि नव्या पिढीचा समन्वय साधण्यात आला आहे. भारताची संस्कृती किती भव्य आहे, हे नव्या पिढीला राम सेतुच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात असल्याचे अक्षय कुमारने सांगितले. अक्षयचा लक्ष्मी चित्रपट ओटीटी माध्यमावर प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र या चित्रपटाला अपेक्षित असे यश आले नाही. (Akshay Kumars upcoming movie Ram Setu)
अक्षयच्या (Akshay Kumar) लूकवर त्याच्या चाहत्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अक्षय राम सेतुच्या लूकबाबत अधिक काळजी घेत आहे. राम सेतु चित्रपट भारताबरोबर अन्य देशातही प्रदर्शित करण्यात येणार आहे. 2022 च्या दिवाळीमध्ये राम सेतु प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्याआधी बेलबॉटम, सूर्यवंशी, बच्चन पांडे, अतरंगी रे, पृथ्वीराज हे अक्षयचे चित्रपट प्रदर्शनाच्या रांगेत आहेत. एकूण 2020 ची कमतरता अक्षय या 2021 मध्ये भरुन काढणार हे नक्की.