राष्ट्रीय पुरस्कार विजेती… सुरमयी सावनी!
१) राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय हे कळल्यानंतर तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती?
पहिल्यांदा जेव्हा बातमी समजली त्याक्षणी आत्तापर्यंतचा सगळा प्रवास डोळ्यासमोरून गेला. खरं तर हे गाणं रेकॉर्ड करून खूप वर्ष झाली आहेत पण प्रत्येक गाण्याचं एक नशीब असतं असं मला वाटतं, या गाण्याच्या बाबतीतही तसंच काहीसं झालं आणि इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे यश मिळालं याचा आम्हा सगळ्यांनाच खूप आनंद आहे. अर्थातच पुरस्काराबरोबरच जबाबदारी देखील वाढलेली आहे. देवाचे खूप आभार आहेत कि इतकं मोठं यश दिलेलं आहे मी कायम त्या ऋणातच राहणं पसंत करीन.
२) ज्या गाण्यासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे, त्या ‘रान पेटलं’ विषयी काय सांगशील?
‘रान पेटलं’ हे गाणं खुप वेगळ्या प्रकारचं आहे. बार्डो हा सिनेमाच अत्यंत वेगळा आहे. बार्डो हा तिबेटियन शब्द आहे. स्वप्न बघणं आणि स्वप्न प्रत्यक्षात येण्याचा जो प्रवास आहे त्याला बार्डो असं म्हणतात. पूर्ण चित्रपटात गाणी नाहीयेत आणि एका वळणावर ज्या क्षणाला अचानक हे गाणं सुरु होतं तिथे वेगळीच वातावरण निर्मिती अपेक्षित असल्याने वेगवेगळ्या चालींचा विचार केला गेला. कथेचा बाज ग्रामीण असल्यामुळे हे गाणंही अहिराणी भाषेतलं आहे. त्या भाषेचा लहेजा मला गाण्यात जपायचा होता. प्रत्येक गायकाला ३ – ४ मिनिटांच्या अवधीत, आवाजातून स्वतःला सिद्ध करण्याचं चॅलेंज असतं. आत्तापर्यंत मी अनेक वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायलेली आहेत पण हा अनुभव खूप वेगळा होता. या गाण्याचे संगीतकार रोहन – रोहन यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे हे शक्य झालं असं मला वाटतं.
३) आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे, भावगीत,भक्तीगीत ते अगदी लावणी, आयटम सॉंग्स सगळ्या प्रकारची गाणी तू गायली आहेस. तुला जास्त काय आवडतं?
सगळेच प्रकार हे चॅलेंजिंग असतात असं मला वाटतं. प्रत्येक गीतप्रकाराचा वेगळा अभ्यास असतो. मी मेलोडिअस गाणी जास्त एन्जॉय करते आणि अगदी खरं सांगायचं झालं तर प्लेबॅक या प्रकारात मला आयटम सॉंग्स गायलाही खूप आवडतात. रोमँटिक आणि आयटम नंबर असे दोन्ही प्रकार गायला मला आवडतात.
४) मराठीसोबतच तू हिंदी, तामिळ, कोंकणी, कन्नड भाषेतही गाणी गायली आहेत तो अनुभव कसा होता?
पूर्वीपासूनच मला भाषेची खूप आवड आहे. मी बी. ए. संस्कृत, एम. ए. मराठी केलेलं आहे. वेगवेगळ्या भाषा शिकण्याची आवड असल्यामुळे कॉलेज मध्ये असल्यापासून मी साऊथची गाणी ऐकायचे, ती गाणी आपल्याला ही गाता यायला हवीत हे माझं स्वप्न होतं. त्यानंतर तमिळ चित्रपटातील माझी कारकीर्द सुरु झाली. मल्याळम गाणंही मी गायलेलं आहे आणि आता लवकरच तेलगू गाणंही प्रदर्शित होणार आहे. मला स्वतःला चॅलेंज करायला नेहमी आवडतं त्यातून नेहमी नवीन शिकायला मिळत. माझ्या युट्युब चॅनेलवर देखील बंगाली, गुजराती इत्यादी वेगवेगळ्या भाषेतील गाणी मी गायलेली आहेत. कुणी संधी देईल याची वाट पाहत बसण्यापेक्षा स्वतः संधी निर्माण करावी असं मला नेहमी वाटतं आणि त्यातूनच मी असे नवनवीन प्रयोग करत असते त्यांना रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला की अजून छान वाटतं.
५) मराठीत अनप्लगड गाण्यांचा प्रयोग तू पहिल्यांदा केलास, कशी सुचली संकल्पना?
काही वर्षांपूर्वी या अनप्लगड गाण्यांची लाट संगीतसृष्टीत आली होती पण मराठीत कुणी तसा प्रयोग केला नव्हता. आपल्या मराठी भाषेत अनेक गाण्यांची समृद्ध परंपरा आहे ती सगळी गाणी, माझी स्वतःची गाणी वेगळ्या रूपात रसिकांसमोर घेऊन येण्याच्या उद्देशाने मी हा प्रयोग करण्याचं ठरवलं. अर्थात जुन्या गाण्यांचं पावित्र्य जपून. सोशल मीडिया वर काही व्हिडीओ अपलोड केले, त्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर सावनी अनप्लगड – लाइव्ह कॉन्सर्ट ही सुरु केल्या या सगळ्यासाठी प्रेक्षकांचा नेहमीच भरभरून प्रतिसाद मिळाला.
६) उत्तम गायनासोबतच तू मॉडेलिंगही करतेस… ती आवड कशी निर्माण झाली?
तेजाज्ञा मुळे ही सुरुवात झाली. खरं तर साडी हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळे मला ते शूट करतांना खूप मज्जा आली. त्यानंतर साड्यांच्या वेगवेगळ्या ब्रँड्स सोबत जोडले गेले. स्वतःहून मी मॉडेलिंगकडे वळले नाही पण ते करतांनाही मला खूप शिकायला मिळालंय त्यामुळे नक्कीच यापुढेही मॉडेलिंग करत राहीन.
७) आत्तापर्यन्त मिळालेली बेस्ट कॉम्प्लिमेंट?
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या भावसरगम या कार्यक्रमात मी लहानपणापासून गातेय. अशाच एका कार्यक्रमात मी किशोरीताईंचं अत्यंत अवघड असं ‘हे श्याम सुंदर’ हे गाणं गायले होते. आणि त्यानंतर पंडितजींनी अत्यंत भारावून जाऊन माझं कौतुक केलं होतं. “ओरिजिनल गाण्यानंतरही अनेकांकडून मी हे गाणं ऐकलंय पण आत्ता सावनीने ज्या प्रकारे गायलंय तसं मी इतर कोणाकडूनही ऐकलेलं नाहीये. हे गाणं ऐकून, त्यातून बाहेर यायला मला थोडा वेळ लागेल. आत्ता मी गाऊ शकत नाही” असं म्हणून त्यांनी कार्यक्रमात इंटरव्हल घ्यायला सांगितला. आणि उर्वरित कार्यक्रम इंटरव्हलनंतर सुरु करण्यात आला. ही माझ्यासाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे, जी मी कधीच विसरू शकत नाही.
हे देखील वाचा: सावनी रवींद्रने शेयर केले आहेत तिच्या दिवाळी पहाट मधील सुरेल अनुभव
८) आत्तापर्यंत केलेल्या कामाची पावती म्हणजे हा पुरस्कार आहे. यापुढचे तुझे प्रोजेक्ट्स काय आहेत?
अनेक प्रोजेक्ट्स चालू आहेत. सावनी ओरिजनल्स या सिरीजमध्ये वेगवेगळी गाणी करण्याचं ठरवलं आहे. त्यातील २ – ३ गाणी तयार असून ती मी लवकरच रिलीज करीन. पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे लाईव्ह शो, लाईव्ह ऑडियन्स या साठी आम्ही सगळेच कलाकार वर्षभरापासून वंचित आहोत त्यामुळे सगळं काही सुरळीत होऊन लवकरच लाईव्ह शो च्या माध्यमातून नवनवीन प्रोजेक्ट्स करण्याची इच्छा आहे.
मुलाखत आणि शब्दांकन – धनश्री गंधे