‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
नवे लक्ष्य : सोहम बांदेकर
स्टार प्रवाह वाहिनी ही कायमच नव्या विषयांवरील मालिका आपल्यापुढे सादर करण्यात आघाडीवर आहे. नुकतेच सुरु झालेली दर रविवारी प्रसारित होणारी ‘नवे लक्ष्य’ ही मालिका विविध गुन्हे, त्यांची उकल करण्यात पोलिसांचे युनिट किती मेहनत करते हे दाखवणारी आहे. याच मालिकेत पी एस आय जय दिक्षीत ही व्यक्तिरेखा साकारतोय सोहम बांदेकर अर्थात आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा सुपुत्र सोहम बांदेकर. (Soham Bandekar)
सोहमने वझे केळकर कॉलेजमधून बी एम एम ची पदवी मिळवली आहे. त्यानंतर आपण सोहमला ओळखू लागलो ते ‘ललित २०५’ या मालिकेचा निर्माता या नात्याने. सोहम म्हणतो, “ज्यावेळी ‘ललित २०५’ चा निर्माता या नात्याने मी जबाबदारी पेलत होतो, तेव्हा एक निर्माता या नात्याने आपल्याला पडद्यामागच्या सर्व बाजू माहिती असाव्यात, असे मी ठरवले. मग दिग्दर्शन, संकलन, प्रकाशयोजना या सर्व विभागांचा मी अभ्यास करत होतो. चॅनलच्या मिटींग्ज सुद्धाझा मालिकेसाठी कशा महत्वाच्या असतात, हे मला समजत गेलं. ती माझी या क्षेत्रातील शिकण्याची प्रक्रिया होती.”
सोहमच्या मनात आपण अभिनय करावा,असं आधी खरे तर नव्हतं. पण सोहम मुळात खूप संवेदनशील असल्याने सोहम उत्तम अभिनय करू शकेल असं आदेश आणि सुचित्रा यांना वाटायचं. लॉकडाऊनचा काळ हा खरे तर सोहमच्या आयुष्याला एक वेगळं वळण देणारा ठरला. तो या काळात आई बाबांबरोबर अनेक चित्रपट पाहायचा, मग त्यावर चर्चा करायचा. याच काळात सोहमने काही मराठी स्वगते (मोनोलॉग्ज) ऐकली, ती पाठ केली आणि त्याचा व्हिडीओ चित्रित करून आई बाबांना दाखवला. आदेश आणि सुचित्राने ते व्हिडीओज या क्षेत्रातील काही जणांना दाखवले सुद्धा होते आणि आपला मुलगा नक्की अभिनय करू शकेल, याची त्या दोघांनाही खात्री झाली होती. फक्त ही गोष्ट सोहमला तेव्हा माहित नव्हती.
सोहम प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ चं शूटिंग सुरु होतं. सोहमला आईनं म्हणजे सुचित्रा बांदेकर यांनी फोन केला आणि एक ऑडिशन शूट करून पाठवायला सांगितली. सोहमने ती पाठवली. मग ती ऑडिशन चॅनलकडे गेली. त्या वेळी ‘नवे लक्ष्य’ या ‘सोहम प्रॉडक्शन’ची निर्मिती प्रक्रिया सुरु होती. पण आपण आपल्याच मालिकेच्या साठी ऑडिशन देत आहोत, याची कल्पना सोहमला नव्हती. मग त्याला लोकेशनवर बोलावण्यात आलं आणि तिथे पोलिसांच्या वर्दी मध्ये त्याची ‘लूक टेस्ट’झाली आणि त्यातून पी एस आय जय दिक्षीतच्या भूमिकेतून आपल्याला एक चांगला अभिनेता मिळाला अर्थात सोहम बांदेकर.
सोहम म्हणतो, “लॉकडाऊन मध्ये मी फिटनेस वर लक्ष केंद्रित केल्याचा मला फायदा होत आहे. कारण त्यापूर्वी माझं वजन खूप वाढलं होतं. लॉकडाऊन मध्ये मी फिटनेस बाबत खूप जागरूक झालो. माझं वजन कमी केलं. त्याचा फायदा आज ही पोलिसांची व्यक्तिरेखा साकारताना निश्चित होतो. पोलिसांची वर्दी परिधान केल्यावर ते दृश्य साकारताना एक वेगळी स्फूर्ती येते. मुळात यातील ‘जय’ ही व्यक्तिरेखा खूप संवेदनशील व्यक्तिरेखा असून तंत्रज्ञानाची आवड असणारा आणि त्या संदर्भात अभ्यास असणारा असा हा ‘हायटेक’ जय आहे.”
आज सोहमचे या भूमिकेसाठी खूप कौतुक होत आहे. आपणही त्याला खूप शुभेच्छा देऊया.