‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
म्होरक्या – ग्रामीण व्यवस्थेचे अस्वस्थ चित्रण.
अमर देवकर यांच्या ‘म्होरक्या’ या चित्रपटाला २०१८ मध्ये सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुण्याच्या आणि कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘म्होरक्या’ला अनेक पुरस्कार मिळाले, प्रतिनिधीची दाद मिळाली परंतु अपुरी जाहिरात आणि वितरण व्यवस्था, यामुळे ‘म्होरक्या’ पाहण्याचा योग खूप उशिराने आला. ‘म्होरक्या’ हा बालचित्रपट म्हणून राष्ट्रीय पातळीवर गौरवला गेला असला तरी त्याची धाटणी चाकोरीबद्ध बालचित्रपटासारखी नाही हे सर्वप्रथम नमूद करायला हवे. नव्वदच्या दशकात इराणमधील चित्रपट निर्मितीवर तिथल्या राजकीय व्यवस्थेने जाचक निर्बंध घातल्यानंतर माजीद माजिदी, मोहसीन मखमलबाफ या सारख्या दिग्दर्शकांनी लहान मुलांना केंद्रस्थानी ठेऊन रचलेल्या कथानकातून प्रस्थापित राजकीय व्यवस्थेवर ताशेरे ओढले.
‘म्होरक्या’ (Mhorkya)ची जातकुळी या प्रकारची आहे. ‘म्होरक्या’ इराणी नववास्तववादी चित्रपटांच्या परंपरेतील असला तरीही त्याचा बाज अस्सल मराठी मातीतला आहे. त्यातील नायक ग्रामीण भागातील शाळेत जाणारा मुलगा आहे मात्र तरीही हा चित्रपट लहान मुलांपेक्षा मोठ्या वयाच्या समजूतदार प्रेक्षकांसाठी निर्माण करण्यात आला आहे हे तो पाहताना सहज लक्षात येतं. दिग्दर्शक लहान मुलांच्या कथेतून भारतातील ग्रामीण प्रदेशात आढळून येणारी वर्गव्यवस्था, उपेक्षित समाजातील लायक व्यक्तींना डावलून नाकर्त्या धनिकांची लागणारी वर्णी आणि त्यातून निर्माण होणारे असमंजस नेतृत्व या मुद्द्यांना अधोरेखित करतो.
म्होरक्याचा नायक आश्या उर्फ अशोक [रमण देवकर] हा मेंढ्या राखणारा धनगर जमातीतील मुलगा. शाळेत जाण्यापेक्षा माळरानावर मेंढ्यांना चरायला नेणं हा त्याचा आवडता उद्योग. इथे त्याच्या बरोबर असतात गोमतर बाबा [रामचंद्र धुमाळ] हे वृद्ध गुराखी. गोमतर बाबा आश्याला जगण्याची रीत आणि देशाची नीती, त्याला समजेल उमजेल अशा भाषेत सांगत असतात. आश्याचा बाप एड्स होऊन मेलेला. घरात मुकी आई, प्रेमळ आजी आणि अखंड गरिबी. मुक्या जनावरांची भाषा समजू शकणारा आश्या आईचं दुःख समजू शकत असतो.
शाळेला जायला कंटाळा करणाऱ्या आश्याला त्याचे मित्र प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या सरावासाठी खेचून शाळेत आणतात आणि त्या दिवसापासून आश्याच्या आयुष्याला एक वेगळेच वळण लागते. आश्याचा खडा आवाज ऐकून मुख्याध्यापक त्याला संचलन प्रमुख व्हायला सांगतात आणि त्यासाठी सराव करण्याची सूचना करतात. शाळेतील श्रीमंता घरच्या बाळ्याला [यशराज कऱ्हाडे] संचलनप्रमुख व्हायचे असते. आश्याला मुख्याध्यापकांनी दिलेल्या आश्वासनामुळे त्याचे मनसुबे ढासळतात. आश्याला काहीही करून संचलनाचे नेतृत्व मिळू द्यायचे नाही यासाठी तो चंग बांधतो. शाळेतील पीटी शिक्षक सुद्धा त्याला सामील होतात. आपण संचालनाचा उत्तम सराव करावा असा निश्चय आश्या करतो पण त्यासाठी योग्य मार्गदर्शन करणारी गावात कोणी योग्य व्यक्ती त्याला सापडत नाही. या शोधात त्याचं लक्ष अन्या [अमर देवकर] कडे जाते. अन्या हा कधीकाळी सैन्यात असलेला आणि आता डोक्यावर परिणाम झाल्याने गावात हिंडणारा भणंग माणूस. आश्या अन्याच्या मागावर राहतो, त्याची सहानुभूती मिळवतो आणि मग अन्या त्याच्याकडून संचलनाचा सराव करून घेऊ लागतो.
आश्याने मेहनत करून संचालनाची तयारी केली तरीही प्रत्यक्षात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी त्याला संचालनाचे नेतृत्व करता येते का? या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहचताना दिग्दर्शक आपल्याला आश्या ज्या व्यवस्थेचा भाग आहे त्याचं अस्वस्थ करणारं चित्रण दाखवतो. ‘म्होरक्या’च्या कथेचा जीव फार मोठा नाही परंतु चित्रपटाची पटकथा रचताना दिग्दर्शकाने आश्या ज्या गावात राहतो तिथल्या लोकांच्या जीवनशैलीचे आणि मानसिकतेचे यथार्थ चित्रण येईल यावर भर दिला आहे. गावातील वर्गव्यवस्था, नेतृत्व मिळवण्यासाठी केलेली षडयंत्र दाखवताना त्याने मेलोड्रामाच्या वाटेला न जाता अत्यंत संयत चित्रण केलं आहे. शाळेत बाळ्याच्या कमरेला असलेला बेल्ट आणि आश्याचा मळकट युनिफॉर्म यातून सूचकपणे त्या दोघांमध्ये असलेली आर्थिक दरी स्पष्ट केली आहे. अन्या या व्यक्तिरेखेबद्दल असलेला संभ्रम कायम ठेवण्याचा त्यांचा निर्णय सुद्धा दाद देण्याजोगा आहे. दिग्दर्शकाला अपेक्षित असलेला संयतपणा आणि वास्तव प्रकाशचित्रणकार गिरीश जांभळीकर यांनी अचूकपणे टिपलं आहे.
‘म्होरक्या’ची मुख्य मदार आश्याची भूमिका करणाऱ्या रमण देवकर या बालकलाकारावर आहे. घरच्या गरिबीमुळे शाळेपासून वंचित रहात असणारा, वडिलांच्या मृत्यूने हवालदिल झालेला आणि शेवटी मेहनत करूनसुद्धा अपेक्षित कामगिरी करायला न मिळालेला आश्या रमण देवकरने अत्यंत स्वाभाविकरित्या उभा केला आहे. अशा प्रकारची भूमिका करण्यासाठी लागणारी तयारी केल्याचं त्याची भूमिका बघताना लक्षात येतं. त्याचा प्रतिस्पर्धी असलेल्या बाळ्याच्या भूमिकेत यशराज कऱ्हाडेनी आवश्यक ती मग्रुरी दाखवली आहे. या दोन्ही बालकलाकारांना अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अन्याची व्यक्तिरेखा टेलरमेड आहे. ती साकारताना अमर देवकरनी वेशभूषेप्रमाणेच तिच्या मानसिकतेचा सखोल विचार केला आहे हे जाणवतं.
गेल्या काही वर्षात, ज्या प्रदेशात आपली जडणघडण झाली त्या प्रदेशातील वास्तव, त्याबद्दलच्या आपल्या जाणीवा चित्रपट माध्यमातून मांडणारे दिग्दर्शक मराठीत येत आहेत. अत्यंत कमी बजेट मध्ये निर्माण होत असलेले हे चित्रपट आशयदृष्ट्या संपन्न आहेत. ‘म्होरक्या’ हा असाच एक यशस्वी प्रयत्न आहे. त्याला राजमान्यता मिळाली असली तरीही ज्या प्रेक्षकांपर्यंत दिग्दर्शकाला तो पोहचवायचा आहे त्यांच्या पर्यंत मात्र तो पोहचू शकलेला नाही. दिग्दर्शक हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण त्याला प्रतिसाद द्यायला हवा.