अजीब दास्तान्स: अजब विषयांची गजब मांडणी
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात मोठमोठे बदल घडून आले. सुधारणावादी सामाजिक क्रांतीने देश ढवळून निघाला. स्वातंत्र्य मिळाल्यावर, देशाला लोकशाही आणि संविधानाचा वरदहस्त लाभल्यावर सामाजिक चळवळींना वेग आला. समाजाला प्रगतीपथावर नेणारे कायदे निर्माण झाले. माणूसपणाची व्याख्या रुंदावत गेली. विश्वसत्ता होण्याची स्वप्ने पाहणारा भारत आज आपला सांस्कृतिक वारसा जपत जगाच्या वेगाशी जुळवू पाहतोय, पण अजूनही काही विषयांना पुरेशी समाजमान्यता मिळालेली दिसत नाही. मुख्य प्रवाहात अजूनही अश्या गोष्टी चर्चिल्या जात नाहीत. नुकतीच नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली ‘अजीब दास्तान्स’ (Ajeeb Daastaans) अश्याच काही विषयांना हात घालते.
करन जोहर (Karan Johar) निर्मित या अँथॉलजी फिल्मचं दिग्दर्शन शशांक खैतन आणि नीरज घायवान या नामवंत दिग्दर्शकांबरोबरच कायोझी इराणी आणि राज मेहता या नव्या दिग्दर्शकांनी केलं आहे. ही फिल्म भारतीय समाजाला सहजासहजी न पचणाऱ्या विषयांना अनोख्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडतेच, त्यासोबतच ती वेगवेगळ्या नातेसंबंधांचे कंगोरेही उलगडून दाखवते. चारही कथांमधून निरनिराळे प्रश्न प्रेक्षकांना विचारले जातात आणि त्यांचं उत्तर शोधण्याची जबाबदारीही प्रेक्षकांवरच सोपवली जाते,
शशांक खैतन दिग्दर्शित ‘मजनू’ हा पहिला सेगमेंट फातिमा सना शेख, जयदीप अहलावत आणि अरमान रलहान यांच्या अभिनयाने नटलेला असून यात विवाहबाह्य संबंध, समलैंगिक संबंध आणि वंशपरंपरागत चालत आलेल्या मुजोर मालकशाहीवर बोट ठेवलेलं आहे. नुसरत भरुचा, इनायत वर्मा आणि अभिषेक बॅनर्जी अभिनित आणि राज मेहता दिग्दर्शित ‘खिलौना’ हा सेगमेंट या फिल्ममधील सर्वात डार्क सेगमेंट असून गरीबी आणि श्रीमंती या वादावर अतिशय वेगळ्या दृष्टीकोनातून यात मतप्रदर्शन केलेलं आहे.
‘गीली पुच्ची’ हा तिसरा सेगमेंट ट्रेलरमध्ये दाखवलेल्या समलैंगिक संबंधांपुरता मर्यादित नसून त्यात वर्ग आणि वर्णवर्चस्ववादाचा विषयही दिग्दर्शक नीरज घायवानकडून खुबीने हाताळण्यात आलेला आहे. आदिती राव हैदरी आणि कोंकना सेन शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सेगमेंट अस्पृश्यता आणि पुरुषप्रधान संस्कृतीचीही झलक दाखवतो. सक्षम आणि सुजाण पालकत्वाची व्याख्या अधोरेखित करणारं कथानक कायोझी इराणी दिग्दर्शित ‘अनकही’मध्ये पाहायला मिळतं. त्याचसोबत शारीरिक व्यंगावर मात करून निर्माण झालेल्या नात्यातील भावनिक गुंतागुंतही प्रेक्षकांना यात पाहायला मिळते. शेफाली शाह, मानव कौल, टोटा रॉय चौधरी आणि सारा अर्जुन यांनी या सेगमेंटमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
प्रत्येक सेगमेंट हा लेखन, संगीत, अभिनय आणि दिग्दर्शन अश्या चारही आघाड्यांवर परिपूर्ण भासतो. ‘काँच के दो पन्ने’, ‘भँवरा’, ‘जिंदगी’, ‘मेरा मन’, ‘संग रहना’ आणि ‘कुछ ना कहो’ सारखी नव्या दमाची गाणी त्या त्या सेगमेंट आणि फिल्ममधील कठोर आणि कटू वास्तव मांडतात. अभिनयाच्या बाबतीत सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली असून नुसरत भरूचा, शेफाली शाह, कोंकना सेन शर्मा, आदिती राव हैदरी आणि फातिमा सना शेख यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या मध्यवर्ती भूमिकांना योग्य न्याय दिला आहे.
‘खिलौना’सारख्या डार्क सेगमेंटमध्ये बिन्नीची भूमिका साकारणाऱ्या इनायत वर्माचा हा दुसरा नेटफ्लिक्स प्रोजेक्ट असून, याआधी तिने अनुराग बासू दिग्दर्शित ‘लुडो’मध्ये मिनीची भूमिका साकारली होती. ‘लुडो’प्रमाणेच या फिल्ममध्येही इनायत ‘छोटा पॅकेट बडा धमाका’ ठरली असून, इतर सहकलाकारांच्या तोडीस तोड अभिनय तिने केलेला आहे. लस्ट स्टोरीज, घोस्ट स्टोरीज, पावा कथैगलनंतर ‘अजीब दास्तान्स’च्या निमित्ताने आणखी एक आगळीवेगळी अँथॉलजी फिल्म नेटफ्लिक्सने प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणली असून, प्रत्येक सुजाण प्रेक्षकाने नक्कीच या कलाकृतीचा आस्वाद घ्यावा.