दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
स्टारडमची फार मोठी किंमत चुकवावी लागते!
बॉलिवूडमध्ये मसालापट देणाऱ्या दिग्दर्शकाच्या रूपात डेव्हिड धवन प्रख्यात आहे. त्याचा मोठा भाऊ अनिल धवनचं व्यक्तिमत्व बॉलिवूडच्या परंपरेला साजेसं असलं तरी अनिल धवनपासून यश तसं दूरच राहिलं ! डेव्हिड धवनचा मोठा चिरंजीव रोहित धवनला अजून तरी यशाचा राजमार्ग सापडला नाही, पण डेव्हिडच्या धाकट्या लेकाने वरुण धवनने त्याच्या ‘डेब्यू’फिल्म मधूनच स्टारडम मिळवलं. वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट ह्या नव्या आणि टवटवीत चेहऱ्यांना घेऊन त्यांच्या ‘मेंटॉर’ करण जोहरने ‘स्टुडन्ट ऑफ द ईअर’ ह्या फिल्मने बॉलिवूडचे दरवाजे सताड उघडे केले, आणि ह्या यशाने वरुण धवनने (Varun Dhawan) आरंभीच सिक्सर मारला..
नंतर त्याचे मै तेरा हिरो, हमटी शर्मा की दुल्हनियां, बद्रीनाथ की दुल्हनियां, दिलवाले, ढिशुम, एबीसीडी, सुई धागा, कलंक, बदलापूर, स्ट्रीट डान्सर आणि अलीकडे प्रदर्शित झालेला ‘कुली नंबर वन’ असे धडाकेबाज परफॉर्मन्स असलेले चित्रपट दिलेत. हल्लीच म्हणजे २४ जानेवारी रोजी वरुणने त्याची प्रेयसी नताशा दलालशी लग्न करून वैवाहिक जीवनही सुरु केले. वरुणचा आज (२४ एप्रिल) ३३वा वाढदिवस… त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या रुपेरी कारकिर्दीवर टाकलेला हा प्रकाशझोत, पण अर्थात त्याच्याशी बोलूनच!
‘वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा वरुण… काय विशेष प्लॅनिंग वाढदिवसाचे?
‘अरे, छोडो यार! काहे का जन्मदिन? मी नुकताच ‘भेडिया’ (Bhediya) ह्या फिल्मचे शूटिंग आसाम,अरुणाचल प्रदेश येथून करून आजच मुंबईत आलोय. दरवर्षीचा वाढदिवस आणि यंदाचा ह्यात खूप फरक आहे. वाढदिवस साजरा करण्याचा कसलाही मूड नाही. आपला देश करोनाग्रस्त झालाय, हजारो मृत्यूमुखी पडताहेत. तनामनाला उभारी देण्यासारखं काही उरलंच नाही. लेकिन मम्मी आखिर मम्मी होती है, माझं औक्षण करून, माझ्यासाठी केक कापून घरातील सगळ्यांचं तोंड गोड़ केल्याशिवाय तिला चैन पडणार नाही!
‘वरुण, तुलाही कोविडचा सामना करावा लागला होता नं?’
‘२०२० मध्ये! माझी फिल्म ‘कुली नंबर वन’ (Coolie No. 1) रिलीज व्हायची धामधूम होती, आणि प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज चंदीगढमध्ये सुरु असतांना मला ताप भरला, निदान कोविडचे झाले आणि मी माझ्या ह्या महत्वकांक्षी फिल्मचे प्रमोशनही धड करू शकलो नाही. माझ्या घरात डॅड, मॉम, भय्या, भाभी आणि तेंव्हा माझं लग्न झालं नव्हतं त्यामुळे नताशा (आताची पत्नी – तेंव्हाची प्रेयसी) आणि तिचे कुटुंबीय तिच्या घरात चिंताग्रस्त होते. मी कोविडमधून बरा झालो आणि त्यानंतर मग ‘भेडिया’चे चित्रण एका गॅपनंतर सुरु झाले. आपल्या इंडस्ट्रीमधील अनेकांना कोरोनाने घेरलं. फार भयंकर विषण्ण करणारी परिस्थिती आहे सर्वत्र !’
‘अभिनयात येणे तुझ्यासाठी नेहमीच सोपे होते, नाही का? वडील थेट मान्यवर दिग्दर्शक, घरचं बॅनर, मोठा भाऊ रोहित धवन देखील दिग्दर्शक… घर की खेती वाला मामला!’
‘हा वंशवाद – नेपोटिझम वगैरे सारखा प्रकार नाही. काका (अनिल धवन) अभिनेता तेही ७०-८०च्या दशकातील, वडील दिग्दर्शक, रोहित माझा भाऊ तोही दिग्दर्शक झाला, ह्या व्यवसायाची उपजत आवड त्यामुळे निर्माण झाली, त्यात नवल ते काय? बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण – पदवी मी नॉर्टिंगहॅम विद्यापीठातून घेतली. पण मला यायचं बॉलिवूडमध्ये हे नक्की झालं होतं. मुंबईत परत आल्यानंतर निर्मिती – दिग्दर्शन अथवा अभिनय ह्यात करियर करायचं मनोमनी मी ठरवलं होतं. फॅमिली फ्रेंड असलेल्या करण जोहरकडे मी त्याचा सहाय्य्यक म्हणून धर्मा प्रॉडक्शनमध्ये काम सुरु केलं.
‘माय नेम इज खान’ (My Name Is Khan) फिल्मचं चित्रण ८० टक्के अमेरिकेत झालं, त्या काळात मी धर्मा टीमसोबत अमेरिकेत होतो. ह्या काळात मी शाहरुख – काजोलसारख्या दिग्गजांसोबत होतो, त्यांचे शूटिंग, त्यांच्या कामाची मेथड, सगळं मी न्याहाळत होतो. हा माझा होमवर्क होता. देशातल्या टॉपच्या बॅनरसोबत काम करायला मिळणं हे माझं भाग्य, माझ्या वडिलांचं ‘गुडविल’ त्यांचा लौकिक! आणि पुढे ह्याच करण जोहरने मला ‘स्टुडन्ट ऑफ द ईअर’मध्ये लीड हिरो म्हणून लाँन्च केलं.
मला मिळालेला ब्रेक मी ‘डिझर्व्ह’ करतो गैरवाजवी नाहीये. नेपोटिझम वगैरे सगळं भंपक आहे. समजा, रणबीर कपूरसारख्या देखण्या – कपूर वारसाला त्याचे वडील स्वर्गीय चिंटू अंकल यांनी लाँच केलं असतं तरी बिघडलं नसतं! पण जर रणबीरमध्ये टॅलेंट नसतं तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या फिल्म नंतर त्याचं पितळ उघडं पडलं असतं! त्याच ऍक्टरचं नाणं खणखणीत वाजतं ज्याच्याकडे नशीब, अभिनय ह्या दोन्ही बाजू सशक्त असतात. आई – बापाने आपल्या लेकीला अथवा लेकाला लाँच केलं म्हणजे ते स्टार झालेत असं नाही’
‘वरूण, स्टारडम मिळाल्यानंतर तुझ्या नॉर्मल जीवनात कितीसा फरक पडला? स्टारडम तू एन्जॉय करतोस का? ‘फोर्ब्ज’ मासिकाच्या अहवालानुसार आपल्या देशातील तुझ्या वयोगटातील अभिनेत्यांमध्ये तू हायेस्ट पेड ऍक्टर आहेस, अनेक ब्रॅण्ड्स तू एन्डोर्स करतोस, हा देखील स्टारडमचा अविभाज्य भाग आहे!’
‘स्टारडम हा शंभरपैकी ९९ कलाकारांच्या करियरचा आरंभी भाग असतो. तो नंतर त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग कधी बनतो हे त्यांचं त्यांनाही कळत नाही. मी ऐकून आहे काकाजी (राजेश खन्ना) यांना त्यांच्या चढत्या काळात मिळालेल्या स्टारडमचा हॅन्गओव्हर कायम राहिला. अशी अनेक उदाहरणं आहेत. आपल्या चाहत्यांकडून किंवा आपल्या फिल्म इंडस्ट्रीकडून मिळणारी उपेक्षा कलावंतांना सोसवत नाही ही वस्तुस्थिती आहे. ढलते सूरज को कोई सलाम नहीं करता हे कटू सत्य उमजण्यासाठी आयुष्याची संध्याकाळ होते.
फार थोडे कलावंत कठोर सत्य परिस्थितीचा स्वीकार करू शकतात. मी जिथे जाईन तिथे चाहत्यांनी मला घेरलं पाहिजे हे मला मी नवा असताना आवडत होते पण कधी तरी असं ही घडलं की चाहते इतका गराडा घालतात, माझ्याशी शेक हॅन्ड, माझी स्वाक्षरी, माझ्यासोबत सेल्फी अगदी कधीही कुठेही हवी असते. आपला अभिनेता घाईत आहे, त्याला कुठे तरी पोहचण्याची कमिटमेन्ट आहे, त्याची काही अगतिकता असू शकते हे चाहते जाणून समजून घेत नाहीत. फॅन्सचा हा हिस्टेरिक क्रेझीनेस मानसिक थकवा देतो हा अनुभव खूपदा आलाय.
आता तर नताशा, माझी पत्नी माझ्यासोबत असते कधी बाऊंसर्स असले तरी चाहते त्यांनाही क्रॉस करण्याचा प्रयत्न करतात मग असं वाटतं स्टारडमची फार मोठी किंमत चुकवावी लागते! व्यक्तिगत आयुष्य उरत नाही. चाहत्यांमुळे स्टारडम मिळतं हे जरी खरं असलं तरी स्टारचा एखादा चित्रपट फ्लॉप झाला की हेच चाहते त्याला ट्रोल करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. सोशल मीडिया तर हल्ली प्रमाणाबाहेर स्ट्रॉंग अगदी भेदक झालाय ! पण स्वतःच्या फिल्म्सचं प्रमोशन करण्यासाठी सोशल मीडिया हा आवश्यक प्लॅटफॉर्म झालाय.
‘आलिया भट्ट ही प्रत्यक्षात रणबीर कपूरची वाग्दत्त वधू जरी असली तरी तू आणि आलिया भट्टची रोमँटिक पेयर अगदी हिट अँड हॉट आहे. आलिया को स्टार म्हणून कशी आहे? तुमच्यात ऑफ स्क्रीन कशी रिलेशनशिप आहे?’
‘आलियाचं आणि माझं नातं आजचं नाही, आमच्या दोघांचा ‘डेब्यू’ हा करण जोहरच्याच ‘स्टुडन्ट ऑफ द ईअर’ पासून झाली. साहजिकच आमच्यात निखळ मैत्रीचं नातं निर्माण झालं. आलियाला, करण त्याची मानस कन्या मानतो, म्हणूनही असेल पण तिला त्याच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये अगदी खास राजेशाही वागणूक मिळते. आमची रोमँटिक पेयर छान आणि फ्रेश दिसते, ह्यात रहस्य आहे ते आमच्यातील मैत्रीचं.
आलियाचं (Alia Bhatt) सगळ्यात मोठं वैशिष्टय म्हणजे कॅमेरा रोल होण्याआधी माझी थट्टा मस्करी करणारी आलिया कॅमेरा रोल झाला की त्या सेटवर ‘दादा’ बनते. आय मिन आलिया दादागिरी पर उतर आती है! आलिया इतकी स्ट्रीक्ट्ट होते कि शंका यावी हीच का आता जोक्स करत खो खो हसणारी आलिया! ती खूप ओरडते. प्लिज मेरे डायलॉग्जस के समय वरूण मुझे कोई लुक्स मत देना! उसको रिहर्सल्स करना अच्छा नहीं लगता. ती स्पॉण्टेनियस आहे पण इतरांना रिहर्सल्सची गरज असते मग आम्ही चुकलो की आलियाचा मूड ऑफ होतो!
सेटवर – शॉट दरम्यान आलिया वेगळीच असते आणि शॉट संपल्यानंतर नॉर्मल आलिया सामोरी येते… विश्वास बसतोय का?’
‘तुझे वडील गोविंदा, चंकी पांडेसारख्या अनेक स्टार्सना घडवणारे… तू देखील तुझ्या वडिलांसोबत ‘कुली नंबर वन’मध्ये हल्लीच काम केलंस, कसा अनुभव असतो डॅडसोबत काम करण्याचा?’
‘भगवान बचाए! माझे वडील कॉमेडी एक्स्पर्ट आहेत. त्यांचे कॉमेडी फिल्म्स खूप चालले. गोविंदाला घडवणारे तेच आहेत पण सेटवर ते कॉमेडी नाहीत तर हायपर होऊन ट्रॅजेडी करतात! मेरे डॅड शूटिंग के समय बहुत हायपर होते है, मुझे उनका यह रवेय्या बिलकुल पसंद नहीं! काही वर्षांपूर्वी डॅडना हार्ट अटॅक आला होता त्यांनी इतकं हायपर होऊन काम करणं मला न पटणारं आहे. त्यांनी इतकं वर्क प्रेशर घेऊन काम करणं मला आवडणारं नाही. नव्या पिढीच्या कलाकारांनाही असा आरडाओरडा न रुचणारा न पटणारा आहे. मी आणि रोहित त्यांना अनेकदा बोललोय, पाहूया त्यांच्यात कधी सुधारणा होतेय ती! मी जसा ‘कुल’ आहे तसं डॅडीनी असावं, अशीच माझी इच्छा आहे. लेट्स होप सो!’
=====
हे नक्की वाचा: आलिया: बॉलीवूडची चुलबुली गर्ल
=====