गाडीच्या टपावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाच्या आवाजातून सुचले हे गाणे!
सैराट: प्रेक्षकांना ‘याड’ लावणारा सिनेमा!
‘फँड्री’ आला आणि मरगळलेल्या मराठी सिनेसृष्टीची झोपच उडवून गेला. ‘पिस्तुल्या’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्यावेळी चर्चेत आलेलं नाव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलं- दिग्दर्शक नागराज मंजुळे! महाराष्ट्रातील गावखेड्यातल्या शोषितांच्या समस्यांना सिनेमामधून मुख्य प्रवाहात आणण्याचं काम नागराजने केलं. तत्कालीन ‘मनोरंजक आणि गल्लाभरू’ मराठी चित्रपटांच्या व्याख्येत ‘फँड्री’ फिट बसत नसल्यामुळे प्रेक्षकांनी तेव्हा थियेटर्सकडे पाठ फिरवली पण कालांतराने त्यांना या चित्रपटाचं महत्त्व कळालं. मराठीतील इतर दिग्दर्शकांपेक्षा हा दिग्दर्शक वेगळा असल्याचं प्रेक्षकांनी हेरलं. सोमनाथ अवघडे, सुरज पवार, राजेश्वरी खरात या कलाकारांना नागराजने नवी ओळख मिळवून दिली. ‘फँड्री’चे संवाद आणि गाणं तर गाजलंच, त्याचबरोबर सिनेअभ्यासकांकडून त्यातील प्रतीके, संकल्पनांवरही भाष्य होऊ लागलं. आता प्रेक्षकांना आतुरता होती नागराजच्या पुढील सिनेमाची…
नागराजने (Nagraj Manjule) आगामी ‘सैराट’ (Sairat) या त्यानेच लिहलेल्या लव्हस्टोरीची घोषणा केली आणि त्यासोबतच यावेळी अजय-अतुल ही संगीतकार जोडीही या प्रोजेक्टचा भाग असल्याचं प्रेक्षकांना कळालं. ‘सैराट’ बनला, ‘बर्लिन फिल्म फेस्टिव्हल’मध्येही गाजला आणि मग २९ एप्रिल २०१६ ला भारतात रिलीज झाला. सुरुवातीला २०० स्क्रीन्सपुरता मर्यादित असलेला हा सिनेमा अल्पावधीतच ४५०हून अधिक स्क्रीन्स व्यापून बसला. सैराट रिलीज झाल्यानंतर पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत दुसरी कुठलीच फिल्म थियेटर्समध्ये आपला जम बसवू शकली नाही. अवघ्या चार करोडमध्ये बनलेल्या या सैराटने बघता बघता कमर्शियल सिनेमामध्ये मानाचा मानल्या जाणाऱ्या ‘१०० करोड क्लब’मध्येही दिमाखात प्रवेश केला. काय खास होतं या चित्रपटामध्ये? कसा बनला हा सिनेमा? चला तर, जाणून घेऊयात…
गाणी ‘सैराट’; पब्लिक झिंगाट!
‘फँड्री’ थियेटर्समध्ये न चालण्याचं प्रमुख कारण होतं त्यातील गाण्यांचा अभाव. सिनेजगताच्या १०० वर्षांनंतरही भारतीय प्रेक्षकांना गाण्याशिवाय सिनेमा अपूर्णच वाटत असल्याची खंत नागराजने कित्येकदा जाहीररित्या बोलून दाखवली होती आणि म्हणूनच त्याने ‘सैराट’मध्ये गाण्यांचा समावेश करायचं ठरवलं. अजय-अतुल आणि नागराजने लिहलेल्या व अजय-अतुल, श्रेया घोशाल आणि चिन्मयी श्रीपदा यांनी गायलेल्या ‘याड लागलं’, ‘आताच बया का बावरलं’, ‘सैराट झालं जी’, ‘झिंगाट’ (Zingaat) या सर्वच गाण्यांचा ‘सैराट’च्या यशात सिंहाचा वाटा आहे. या गाण्यांनी ‘सैराट’ला रिलीज अगोदरच अफाट प्रसिद्धी मिळवून दिली.
संगीत दिग्दर्शनासाठी हॉलीवूड गाठणारा पहिला भारतीय सिनेमा!
चित्रपटाची गाणी जेव्हा लिहून झाली तेव्हा त्यासाठी चाली बसवत असताना अजयला वाटलं की याच्या संगीत संयोजनासाठी लाईव्ह सिम्फनी ऑर्केस्ट्राच हवा, तोही परदेशातला, आणि त्याने तसं बोलून दाखवलं. याआधी हा खर्चिक प्रयत्न करण्याचं धाडस भारतातील कुठल्याही निर्मात्याने दाखवलं नव्हतं पण निर्माते निखील साने यांनी अजयचा हा प्रस्ताव उचलून धरत संपूर्ण अल्बमचं रेकॉर्डिंग परदेशात करायचं ठरवलं. लॉस एंजिलीसच्या जगविख्यात ‘सोनी स्कोअरिंग स्टुडीओज’ मध्ये ‘सैराट’च्या म्युझिक अल्बमचं रेकॉर्डिंग केलं गेलं. इतक्या मोठ्या स्टुडीओत संगीत दिग्दर्शन करण्याचं अजय-अतुलचं (Ajay-Atul) स्वप्न ‘सैराट’मुळे प्रत्यक्षात उतरलं.
ट्रॅक्टर चालवणारी नायिका आणि कविता करणारा हिरो
‘सैराट’साठी नागराजने असेच कलाकार घ्यायचं ठरवलं ज्यांना अभिनयाची आवड तर होती पण सवय मात्र कधीच नव्हती, जेणेकरून अभिनय अधिकाधिक वास्तवदर्शी व्हावा. आर्ची, परश्या, लंगड्या, सल्याच्या भूमिकेतील कलाकारांना तीन महिने नागराजने स्वतःच्याच घरात अभिनयाचे धडे दिले. वेळोवेळी त्यांच्याकडून रिहर्सल्स करून घेतल्या. ‘सैराट’ची कथा ही नायिकेच्या दृष्टीकोनातून सांगण्याचं नागराजचं उद्दिष्ट असल्याने त्याने आपल्या चित्रपटाची नायिका ही कणखर आणि सक्षम बनवण्यावर भर दिला. कथेची गरज म्हणून मुलीचे गुण असणारा मुलगा आणि मुलाचे गुण असणारी मुलगी असं समीकरण नागराजला अपेक्षित होतं. त्यासाठी त्याने आर्चीचं पात्र साकारणाऱ्या रिंकूला बुलेट, ट्रॅक्टर चालवताना आणि विहिरीत सूर मारताना दाखवलं. त्याउलट आकाश साकारत असलेल्या परश्याच्या पात्राला भावनाप्रधान आणि संवेदनशील बनवण्यासाठी त्याने नायकाला कवीमनाची देणगी बहाल केली.
लोकप्रियतेचा कळसाध्याय!
गाण्यांमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोचलेल्या ‘सैराट’ला रीलीजनंतर प्रेक्षकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. ‘सैराट’ची लोकप्रियता इतकी वाढली की ठिकठिकाणी या फिल्मच्या सर्व कलाकारांच्या आणि तंत्रज्ञांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. अनेक शहरांमध्ये या सर्वांचं जंगी स्वागत केलं गेलं. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या कलाकारांच्या घरासमोर चाहते मोठ्या संख्येने जमू लागले ज्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव दोघांनाही बाऊन्सर्स ठेवावे लागले. झी टॉकीज आणि 9Xमराठी सारख्या चॅनल्सवर खास अजय-अतुलच्या गाण्यांचे कार्यक्रम पुन्हा पुन्हा दाखवले जाऊ लागले. सर्वच वयोगटातील प्रेक्षकांनी या चित्रपटाचा मनमुराद आनंद लुटला. ‘झिंगाट’च्या वेळी पडद्याशेजारी नाचायला जाणाऱ्यांचा धसका घेऊन कित्येक थियेटरमालकांनी दंडुकाधारी पोलिसांची कुमक मागवली होती. चित्रपटातील सर्व लोकेशन्स अल्पावधीतच पिकनिक स्पॉट बनले. खास लोकआग्रहास्तव ‘सैराट’चे रात्री १२ आणि ३ वाजता लागणारे शोज पाहून मराठी सिनेजगतातील कित्येक निर्मात्यांनी या कालावधीत आपले महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट्स रिलीज करण्याचं टाळलं…
गेल्या ५ वर्षांत कैक आशयघन आणि दर्जेदार मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले पण मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम अजूनही ‘सैराट’च्याच नावावर आहे. जितकी लोकप्रियता या सिनेमाने मिळवली, तितकी उंची अजूनही कुठलाच मराठी सिनेमा गाठू शकलेला नाही. मराठी चित्रपटांच्या यशाचा मापदंड म्हणून ‘सैराट’कडे पाहिले जाते. ‘इंटर्व्हल’ होण्यापूर्वी ‘झिंगाट’वर जीव तोडून नाचणाऱ्या प्रेक्षकांना ‘क्लायमॅक्स’मध्ये सुन्न होऊन बाहेर पडताना पाहिल्याचं चित्र आजही थियटरमालकांच्या डोळ्यासमोर उभं राहतं…
=====
हे देखील वाचा: अशी आहे मेधा मांजरेकर आणि महेश मांजरेकर यांची ‘लव्ह स्टोरी’
=====