‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
महासत्ता कसली ? ही तर महाथट्टा!
एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. लोकांच्या हातातील काम थांबल्याने जगायचे कसे हा प्रश्न आ वासून उभा आहे. तर दुसरीकडे उपचारासाठी बेड नाहीत, लस उपलब्ध नाही. सर्वसामान्य लोकांच्या जगण्याचा आणि मरणाचाही बाजार होत आहे. देश ज्या 2020 साली महासत्ता होणार असे सांगितले जात होते त्याच वर्षी कोरोनाचा विळखा पडला आणि त्याच वर्षी महासत्ता होण्याची स्वप्न पाहणारया सरकारच्या तोकड्या आरोग्य सुविधांमुळे लोकांच्या आयुष्याची महाथट्टा केली. हे शब्द कोणत्याही पुस्तकातील नाहीत किंवा सिनेमातील संवाद नाहीत तर संवेदनशील लेखक, अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे याचे आहेत. लस घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या असताना सरकारी यंत्रणा लस पुरवठा करू शकत नाही हे चित्र पाहून हेमंत (Hemant Dhome) व्यथित होऊन सोशल मीडिया पेजवर व्यक्त झाला आहे.
कोरोनाचा फटका अनेक क्षेत्रांना बसला आहे. त्यात मनोरंजन क्षेत्रही आहे. मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार हे समाजातील चुकीच्या गोष्टींवर सातत्याने भाष्य करत असतात. सेलिब्रिटीच्या सोशल मीडिया पेजवर जितके त्यांचे ग्लॅमरस फोटो असतात तितकेच त्यांची सरकारच्या अन्यायी धोरणांच्या मर्मावर बोट ठेवणारी विधानेही असतात. हेमांगी कवी, प्रसाद ओक, प्रशांत दामले असे अनेक कलाकार समाजातील विदारक चित्र मांडत असतात. अभिनेता, लेखक हेमंत ढोमे हा देखील या पंक्तीत आहे. तो त्याच्या सिनेमात, नाटकात समाजातील न पटणाऱ्या गोष्टी अधोरेखित करतोच पण एक सूज्ञ नागरीक म्हणूनही हेमंत काय टिप्पणी करतो याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागलेले असते.
नुकतीच त्याने सध्याच्या लसीकरणाबाबत एक पोस्ट केली आहे. हेमंत राहत असलेल्या भागात एक आरोग्यकेंद्र आहे. गेल्या महिन्याभरापासून सरकारने कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. एकीकडे सरकार लस घ्या म्हणून आवाहन करत आहे पण प्रत्यक्ष लसीकरण केंद्रांवर लसच उपलब्ध नाही. लोक लस घेण्यासाठी रांगा लावत आहेत पण त्यांना लस मिळेल की नाही याची शाश्वती नाही. याच मुद्यावर हेमंतने ताशेरे ओढले आहेत.
हेमंतने या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या, सरकारचे सगळे नियम पाळणाऱ्या नागरीकांना कोरोना प्रतिबबंधात्मक लसही मिळू शकत नाही ही शोकांतिका आहे. गेल्यावर्षी कोरोनाचे वादळ आले आणि प्रत्येक क्षेत्र कोलमडले. सरकारसाठीही ही आपत्ती नवीन होती. त्रुटी राहू शकत होत्या, पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मात्र सरकारी यंत्रणेची तोकडी बाजू प्रकाशात आली आहे. या संकटासाठी सरकारने कोणतेही नियोजन केलेले नाही आणि त्याचा फटका सामान्यांना बसत आहे. देशपातळीवरही यापेक्षा वेगळी अवस्था नाही. महासत्ता होणार असे म्हणणारया देशाने देशात राहणाऱ्या लोकांची महाथट्टा केली आहे.
हेमंत ढोमे याने केलेल्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे. पण त्यावरही हेमंतचे हेच म्हणणे आहे की कलाकार किंवा सेलिब्रिटी म्हणून लक्ष वेधण्यासाठी मी हे विधान केलेले नाही. रूग्णांना बेड मिळत नाहीत, योग्य उपचार होत नाही हे तर दुर्दैवी आहेच पण लसीकरणाचा उत्सव करून शोबाजी करण्यापेक्षा लस उपलब्ध नाही म्हणून केंद्रांना कुलूप लावणे हे लाजिरवाणे आहे.
=====
हे देखील वाचा: हेमंत ढोमे: मराठी चित्रपटसृष्टीतील बहुगुणी कलावंत
=====