मालिकांमधील बोलीभाषांचं वैविध्य.
सुरुवातीच्या काळात मालिका विश्वात फक्त मराठी प्रमाण भाषेचा वापर पाहायला मिळत होता. शुद्ध मराठीला संवाद लेखनात अतिशय महत्त्व दिलं गेल्याचं पाहायला मिळालं. परंतु हळूहळू मालिकेचा प्रेक्षक वर्ग वाढत गेला. टेलिव्हिजन अगदी खेड्यापाड्यात पोहोचला. तेथील लोकांनाही मालिका आपल्या वाटायला हव्या या दृष्टिकोनातून मालिकेच्या लेखनात बोलीभाषांचा अंतर्भाव झालेला पाहायला मिळाला. काही कलाकारांनी तर थेट त्या त्या प्रांतात शूटिंग आधी जाऊन वास्तव्य करून, निरीक्षण करून भाषेचा अभ्यास केला आणि त्याचा उत्तम परिणाम म्हणजे कलाकार त्या भाषेतील संवाद अचूक हेल काढून बोलू लागले. ती बोलीभाषा सिरीअलची ओळख बनली.
मालवणी भाषेला एक वेगळाच गोडवा आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील हाच गोडवा प्रेक्षकांना भावतोय. ‘इसरलंय’ असं हसत म्हणणारा पांडू असेल, ‘सरिता गो सरिता’ असं सुनेला हाक मारणाऱ्या माई असतील, प्रेक्षकांना खूप आवडतात. हय म्हणजे इकडे, थय म्हणजे तिकडे, गो म्हणजे अगं असे शब्द आपल्याला या मालिकेतून नव्याने कळतात. पहिल्यांदा हे शब्द समजायला अवघड वाटले तरी कालांतराने ते प्रेक्षकांच्या तोंडी कधी बसतात समजत नाही. आधीही ‘गाव गाता गजाली’, ‘मालवणी डेज’ अशा मालिकांतून मालवणी भाषा घरोघरी पोहोचली आपण पाहिली आहे.
‘कारभारी लयभारी’, ‘राजा रानी ची गं जोडी’ या मालिकांमध्ये आपल्याला रांगडी कोल्हापुरी भाषा पाहायला मिळते. खास कोल्हापुरी ठसक्यातील शब्द आपल्याला या मालिकेतून ऐकायला मिळतात. ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकांमध्येसुद्धा गावाकडची भाषा ऐकायला मिळते. कधी कधी एखाद्या मालिकेत विविध जातीची माणस दाखवून भाषेच वैविध्य दाखवतात. कधी नव्या पात्राची एन्ट्री झाली की त्याच्या तोंडी देखील अशी वेगळी बोली दाखवली जाते.
‘चला हवा येऊ द्या ‘मधील भारत गणशपुरे यांची वऱ्हाडी बोली तर स्किटमध्ये चार चांद लावते. नुकत्याच संपलेल्या माझ्या ‘नवऱ्याची बायको’ या मालिकेत राधिकासुद्धा नागपुरी भाषा बोलताना दाखवल गेलं. येऊन राहिले नं, खाऊन राहिले नं या हेलामध्ये बोललेले संवाद आज मालिका संपली तरी प्रेक्षक वर्गाच्या पक्के लक्षात राहिले आहेत.
अशाप्रकारे बारा कोसावर भाषा बदलते हे जरी खरं असलं तरीसुद्धा सगळया प्रांतातील प्रेक्षक वर्गाला आपलसं करण्यासाठी भाषा हे माध्यम महत्त्वाचं आहे हे जाणून मालिकेची भाषा हळूहळू बदलताना दिसतेय. अर्थात या मागे लेखक कलाकारांचा मोठा अभ्यास आणि मेहनत आहे यात कुठलीच शंका नाही. प्रेक्षकसुद्धा अशा प्रकारच्या मालिकांना उत्तम प्रतिसाद देताना दिसत आहेत आणि महाराष्ट्रभरातील भाषा आता मालिकांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचत आहेत.
– सिध्दी सुभाष कदम.