अवॉर्ड्सच्या निवडींवर भडकला जॉन
आपल्या दमदार रॅम्प वॉक्सने देशविदेशातील फॅशन शोज् गाजवणारा जॉन अब्राहम (John Abraham) हा फॅशन वर्तुळातील एक प्रख्यात सेलेब्रिटी आणि अर्थात मॉडेल! पीळदार शरीरयष्टी, लांब वाढवलेले केस, स्मित हास्य करताना गालांना पडणाऱ्या खळ्या या त्याच्या ‘किलर लूक’ने अनेक तरुणींना मोहिनी घातली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बासू ही त्याची पूर्व प्रेयसी असली तरीही सध्या दोघेही आपापल्या नव्या संसारात रममाण आहेत. आणि हो, ‘मॉडेल्स कान्ट ऍक्ट’ अर्थात मॉडेल्सना अभिनय येत नाही अशी आवई उठवणाऱ्या सगळ्यांची तोंडं जॉनने बंद करून टाकली आहेत. अलीकडच्या ६-७ वर्षांमध्ये जॉनच्या करियरच्या आलेख सतत उंचावत आहे.
जिस्म, रेस 2, मद्रास कॅफे, देसी बॉईज, धूम, टॅक्सी नंबर ९२११, परमाणू-द स्टोरी ऑफ पोखरण, सत्यमेव जयते, रोमिओ अकबर वॉल्टर, बाटला हाऊस अशा अनेक फिल्म्समधून जॉनने सप्रमाण सिद्ध केलं आहे की त्याला उत्तम अभिनयही येतो आणि त्याच्या फिल्म्सला व्यावसायिक यशही मिळवता येतं. नुकताच जॉनच्या ‘मुंबई सागा’ ह्या सिनेमाला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक होता. जॉनची अभिनयक्षेत्रातील कारकीर्द आणि निर्मितीक्षेत्रातील कारकीर्द त्याला अन्य फिल्मी हिरोंपासून नेहमीच वेगळं करत आलीये. त्याच्या फिल्म्स नेहमीच आशयघन, समृद्ध आणि शिवाय समकालीन वास्तव दर्शविणाऱ्या असतात. ‘मुंबई सागा’च्या यशाच्या निमित्ताने जॉनशी मारलेल्या ह्या गप्पाटप्पा…
जॉन, देशभक्ती किंवा समकालीन विषयावर जेव्हा चित्रपट निर्माण होतात तेव्हा जॉन त्या फिल्ममधे मध्यवर्ती भूमिकेत असतो. अशा समांतर आणि समकालीन फिल्म्स् निवडणे हा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय असतो का?
जॉन: देशभक्तीपर फिल्म्सची निर्मिती बहुतेकदा मीच माझ्या प्रोडक्शन हाऊसतर्फे केलीये. ज्या व्यक्तिरेखा मला कन्व्हिंसिंगली शोभतात त्या मी स्वतःकडे आवर्जून ठेवून घेतो. माझी ओढ अश्या ‘रियल लाईफ हिरो’टाईप व्यक्तिरेखांकडे अधिकच आहे. माझं दणकट व्यक्तिमत्व पाहूनही मला अश्याच प्रकारच्या भूमिका अन्य निर्माते देत असावेत. असो, मला माझ्या मातृभूमीबद्दल प्रचंड प्रेम, भक्ती आणि आदर आहे.
“मैं फिल्मों का एक्टर और फिर निर्माता बाद में बना हूँ लेकिन हिंदुस्तान के लिए मेरा प्रेम बचपन से है। यह नैचरल जज्बा है देश के लिए। हम सभीमें होता है, होनाभी चाहिए। अपने देश से प्यार यानि अपनी मातृभूमि – माँ से प्यार!”
‘सत्यमेव जयते’, ‘बाटला हाऊस’, ‘मद्रास कॅफे’ अश्या देशभक्तीशी संबंधित सिनेमांच्या स्क्रिप्टला मी कायमच प्राधान्य देत आलो आहे. असे विषय मला नेहमी रेलेव्हंट वाटलेत. मी अशा कथांमध्ये नेहमीच रमलोय. ‘लार्जर दॅन लाईफ’ कथाविषयांपेक्षा मला कधीही ‘रियल लाईफ हिरो’च व्हायला आवडेल. पंचतारांकित संस्कृतीत रमलेल्या फिल्मी नायकापेक्षा असा देशभक्त, प्रामाणिक, डेअरडेव्हिल नायक रंगवणे मला कधीही प्रिय आहे आणि असेल.
नुकताच तुझा ‘मुंबई सागा’ रिलीज झाला. अशा फिल्म्समधून गुन्हेगारीचं उदात्तीकरण होत असतं असं नाही का वाटत तुला?
जॉन: मॅडम, गेलं दशक हे विशेषतः वास्तवदर्शी सिनेमाचं युग आहे. पूर्वी श्याम बेनेगलसारख्या मेकर्सलाही खऱ्याखुऱ्या वास्तववादी घटनांवर फिल्मची निर्मिती करण्याचा मोह आवरला नाही. चारेक वर्षांपूर्वी आलेली ‘तलवार’ फिल्मही आयुषी तलवार हत्याकांडावर आधारित होती. रियलिस्टिक फिल्म असूनही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालला. हल्लीच्या प्रेक्षकांना असे खरे विषय आणि खरी दुनिया बघणं भावतं. गुडी-गुडी, खोट्या तकलादू दुनियेला प्रेक्षक आता बोअर झालेत. अर्थात, फिल्म मेकर त्या पात्रांना, त्या विषयाला कसा तर्कसंगत न्याय देतो ह्यावरही फिल्मचे बरंचसं यश-अपयश अवलंबून असते. ३ वर्षांपूर्वी ‘हसीना पारकर’ हा दाऊदच्या बहिणीवर सिनेमा बनवला होता पण त्याला मात्र प्रेक्षकांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नाही.
गेल्या दशकात जॉन अब्राहम हा एक बँकेबल ऍक्टर कम स्टार झालाय. निर्माता म्हणूनही तुझ्या कामाचा व्याप वाढलाय. तुझी दुहेरी जबाबदारी वाढलीये. अभिनेता म्हणून तुझ्या मनात काय प्रेरणा असतात आणि जेव्हा निर्माता असतोस तेव्हा स्वतःच्या निर्मितीतील चित्रपटाना व्यावसायिक यश मिळावं म्हणून किती तडजोडी तू करतोस?
जॉन – सर्वप्रथम मी हे स्पष्ट करू इच्छितो, मी निर्माता होण्याचे मुख्य कारण म्हणजे मला आरंभीच्या काळात आमच्या बॉलीवूडने फार गृहित धरलं. पाठपोट नसलेल्या सपाट भूमिकांसाठी मला निवडलं जात असे. मी अभिनय करू शकतो, आशयघन सिनेमा माझ्यासाठीही आहे, हे मला सप्रमाण दाखवायचं होतं म्हणूनच मी स्वतः निर्माता झालो आणि ‘जे. ए. फिल्म्स’ (जॉन अब्राहम फिल्म्स) उभारलं. नव्या युगातील रियलिस्टिक सिनेमा घडवावा, नव्या सजग पिढीला उच्च अभिरुचीपूर्ण सिनेमा द्यावा अशी माझी आकांक्षा आहे. जर माझ्यासाठी योग्य भूमिका वाटली तरच ती भूमिका मी माझ्यासाठी ठेवतो. अर्थात प्रेक्षकांनी हे विसरू नये ‘विकी डोनर’ या माझ्या निर्मितीतील पहिल्या फिल्मसाठी मी माझी नव्हे तर आयुष्मान खुराणाची निवड केली होती आणि त्यानेही असा चाकोरीबाहेरचा विषय स्वीकारला. पुढे या फिल्मच्या यशानंतर तो स्टार झाला.
माझ्या निर्मितीतील फिल्म्समध्ये तडजोडी मला अमान्य आहेत. विषय निवडतानाच नेमक्या गरजा काय आहेत यांचा सांगोपांग विचार झालेला असतोच. त्यामुळे तडजोडी करणं कधीही गरजेचं वाटलं नाही. ‘पोखरण’ ह्या माझ्या सिनेमासाठी आम्ही प्रत्यक्ष पोखरणला (राजस्थान) जाऊन शूटिंग केले. ‘मद्रास कॅफे’चे चित्रण मलेशिया, केरळमधील जंगलांत तसेच लंडन आणि भारतातील काही ठिकाणी झाले. कुठल्याही तडजोडी मला निर्माता म्हणून मान्य नाहीत. जर नव्या पिढीला माझा सिनेमा आवडला तर त्याला यश मिळेलच. त्यासाठी गरज नसतानाही आयटम साँग्ज ऍड करणे मला अयोग्य वाटते.
लार्जर दॅन लाईफ फिल्म्स तुला पटत का नाहीत?
जॉन: मी स्वतः माझा मित्र करण जोहरचा ‘दोस्ताना’ केला. यशराज फिल्म्सचा ‘धूम’ केला. हल्लीच ‘पागलपंती’ही केला. अतिशय मनोरंजक आणि प्रेक्षकांच्या डोळ्याची पापणी हलू नये भरगच्च मसाला त्यात असतो. मसाला फिल्म्स म्हणजे राईस प्लेट. ज्याला जो पदार्थ आवडेल त्याने तो खावा. फॉरेन लोकेशन्स, डिझायनर कपडे, स्टायलिस्ट, एकूणच अव्वाच्या सव्वा बजेट. मी नवा निर्माता असल्याने इतक्यात मला हा अफाट खर्च परवडणारा नाही म्हणूनच मी ‘लार्जर दॅन लाईफ’ फिल्म्सपासून दूर राहतो. असे मनोरंजक आणि खर्चिक चित्रपट मला अभिनेता म्हणून आवडतात, पण निर्माता म्हणून नाही. नव्या पिढीच्या प्रेक्षकांना सकस, बुद्धीला चालना देणारं, विचारोत्तेजक मनोरंजन असावं अशी माझी वैचारिक भूमिका असते. इंटेलिजंट फिल्म्स हे माझे वैशिष्ट्य आहे. मी कुठल्याही कॅम्पचा, एका विशिष्ट बॅनरचा अभिनेता नाही. माझी कुठलीही इमेज बनली नाहीये अजून. मी नॉन कन्ट्रोव्हर्शिअल ऍक्टर आहे.
जॉन, फिल्मी पार्टीजना जाणे हा व्यवसायाचा आवश्यक भाग आहे अशी एक धारणा आहे. पण तू मात्र अपवाद आहेस.
जॉन: येस, आय डोन्ट लाईक टु अटेंड फिल्म पार्टीज्. आय डोन्ट ड्रिंक. मी उगाच कुठेही जाणे पसंत करत नाही. माझ्या खास मित्रांचं सर्कलही फार मर्यादित आहे. कुठल्याही कॅम्पची मी चमचेगिरी करत नाही. मी, माझे प्रोडक्शन हाऊस आणि माझी अभिनेता, निर्माता म्हणून ग्रोथ मला महत्वाची वाटते, त्यासाठी वेळ देणे मला गरजेचे वाटते.
तुझ्या प्रत्येक फिल्ममधे वेगवेगळी नायिका असते. जोडी बनवणं हा इथला अलिखित दस्तूर असताना तुझ्या नायिका रिपीट होताना दिसत नाहीत.
जॉन: अक्षय कुमार माझ्यापेक्षा सिनियर आहे.पण त्याच्याही लिडिंग लेडीज (नायिका) अलीकडे रिपीट होत नाहीत. असो, अक्कीबद्दल मी बोलणं प्रशस्त होणार नाही. माझ्या नायिका रिपीट होत नाहीत ह्याचं एकमेव आणि मुख्य कारण म्हणजे, माझ्या बजेटमध्ये आणि उपलब्ध तारखांना जी अभिनेत्री सूट होईल तिलाच माझ्या सिनेमात मी घेतो. महिनोनमहिने वाट पाहणे मला जमणारे नाही.माझ्या सिनेमांचा विषय हाच माझा हिरो असतो. ‘बाटला हाऊस’साठी मराठमोळ्या मृणाल ठाकूरची निवड केली कारण तिच्या डेट्स सहज मिळाल्या.
तुझ्यासाठी पुरस्कार मिळणं कितपत महत्वाचं आहे?
जॉन: माझ्या मनात या पुरस्कारांसाठी फारसा आदर नाही. सध्याच्या पुरस्कारांची श्रेणी तरी नक्की काय आहे? सोशल मिडिया आणि इंटरनेट स्टार? आता ही कसली श्रेणी आहे विजेता ठरवण्याची? मागच्या वर्षी आलेल्या माझ्या ‘परमाणु’ या सिनेमाला पुरस्कार मिळण्याची अपेक्षा होती मात्र मिळाले नाहीत. कारण मी या पुरस्कारांचा यथोचित सन्मान करत नाही!
“इन पुरस्कारों को एंडोर्स करते है पान मसालेवाले! क्या क्रेडिटिबिलिटी रह गयी इन पुरस्कारों की? शादियों में जाकर डांस करते है कलाकार और अगर अवार्ड्स पाते है तो यही सही।”
हल्ली सगळेच ऍक्टर्स ओटीटी (ओव्हर द टॉप) प्लॅटफॉर्म्सवर दिसतात. तुलाही वेब सिरीज करणं आवडेल का?
जॉन: सध्या तरी माझा विचार वेब सिरीज करण्याचा नाहीये. पण माझ्या प्रोडक्शन हाऊसतर्फे आम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म्ससाठी कंटेंटची निर्मिती करत आहोत.