‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
सर्किट: मुन्नाभाईचा जिवलग मितवा
दोस्ती आणि चित्रपटांचा विषय निघाला तर धरम-वीर, जय-विरू, बडे मियाँ-छोटे मियाँ अशी उदाहरणं सर्रास वापरली जातात. पण या सगळ्यांपेक्षा जास्त चर्चा होते ती मुन्ना आणि सर्किट या जिवलग मित्रांच्या जोडीची. संजय दत्तने साकारलेला मुन्नाभाई आणि अर्शद वारसीने (Arshad Warsi) साकारलेला सर्किट ही दोन धमाल पात्रं सर्वप्रथम २००३ला आलेल्या ‘मुन्नाभाई MBBS’मधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. या दोन्ही पात्रांना प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं आणि त्याचाच परिणाम म्हणून पुन्हा एकदा हे दोघे ‘लगे रहो मुन्ना भाई’ (२००६) मध्ये एकत्र दिसले.
सरकेश्वर उर्फ सर्किट हा मुन्नाचा लहानपणापासूनचा सवंगडी. मुन्ना वयाने मोठा असल्याने सर्किट त्याला कायमच भाई म्हणून हाक मारतो. तरुणपणी शिकून स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी दोघेही गाव सोडून मुंबईला येतात पण नियतीच्या दुर्दैवी खेळात त्यांना भाईगिरीचा पर्याय स्वीकारावा लागतो. यथावकाश मुन्ना मुंबईचा मोठा ‘भाई’ बनतो आणि सर्किट त्याचा उजवा हात. सर्किट डोक्याने जरी कमी असला तरी मनाने मात्र फार निर्मळ आणि निरागस असल्याने त्याच्या विनोदी स्वभावावर आपसूकच प्रेक्षकांचा जीव जडतो.
दंडापर्यंत दुमडलेल्या बाह्यांचा काळा कुर्ता, निळी जीन्स, गळ्यात सोन्याच्या चेन्स, एका हातात ब्रेसलेट, दुसऱ्या हातात घड्याळ आणि दोन्ही हातांच्या चार-चार बोटांमध्ये घातलेल्या अंगठ्या हा सर्किटचा एकदम टपोरी अवतार आणि मुन्नाचा एकही शब्द खाली पडू न देता सगळी कामं पूर्णत्वास नेणं हे त्याचे अवतारकार्य! मुन्ना करत असलेले वसुली, खंडणी, अपहरणासारखे अवैध धंदे सर्किटसाठी एक प्रकारची समाजसेवाच आहे. मुन्नाचे आईवडील गावाहून मुंबईला त्याला भेटायला येतात तेव्हा काही तासांतच तो सगळ्यांना कामाला लावून त्यांच्या अड्ड्याचं हॉस्पिटलमध्ये रुपांतर करून टाकतो आणि मुन्नासोबत खोटा डॉक्टर बनून मुन्नाच्या नाटकाला आधार देतो.
मुन्नावर सर्किटचा खूप जीव आहे त्यामुळे मुन्नाची प्रत्येक चूक सांभाळण्यासाठी तो सदैव तत्पर असतो. मोक्याच्या वेळी मित्राला साथ देण्यासाठी ‘खोटं बोल पण रेटून बोल’ हा दोस्तीतला अलिखित नियम सर्किट कसोशीने पाळतो. मुन्नाला अगदी कश्याचीही गरज असेल तरीही ती पुरवण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो, मग ते डिसेक्शनसाठी सेपरेट बॉडी मिळवणं असो, परीक्षेसाठी डमी मिळवणं असो किंवा हॉस्टेलच्या रूममध्ये मुन्नाला घरातील सुखसोयी पुरवणं असो, सर्किट रात्री-अपरात्रीही मुन्नासाठी सदैव तत्पर असतो. आपल्यावाचून मुन्नाचं पानही हलत नाही याचा कसलाही गर्व न बाळगणारा सर्किट हाच मुन्नाचा खरा भाई असल्याचं कायम प्रेक्षकांना जाणवत राहतं. म्हणूनच की काय, आख्ख्या मुंबईचा भाई असलेला मुन्ना फक्त सर्किटसोबतच आपली मैफिल जमवताना दिसतो.
सर्किट कायमच मुन्नाभाईचा दरारा वाढवण्यासाठी काही न काही धडपड करताना दिसतो. शिपायापासून बॉसपर्यंत सगळ्यांना तो मुन्नाची भीती घालत सुटतो. मुन्नाला कुणीही उलट जाब विचारणे त्याला अजिबातच सहन होत नाही. मुन्ना म्हणेल ती पूर्व दिशा असं मनाशी बाळगून असलेला सर्किट मुन्नासारखंच त्यालाही महात्मा गांधी दिसत असल्याचं भासवतो, जेणेकरून मुन्नाचा आत्मविश्वास ढळणार नाही. तो मुन्नासोबत बारमध्ये, रेडीओ स्टेशनमध्ये, अगदी जेलमध्येही जातो आणि जेव्हा सगळं काही सोडून मुन्ना गावाला निघतो, तेव्हाही त्याला एकटं न सोडता त्याच्यासोबत गावाला जायची तयारी करतो.
‘लगे रहो मुन्नाभाई’मध्ये एक अतिशय हृदयस्पर्शी असा प्रसंग आहे. ज्यात नकळतपणे चूक घडल्यावर मुन्ना रागाच्या भरात सर्किटवर हात उचलतो. दुसऱ्या दिवशी बापू (महात्मा गांधी) मुन्नाला त्याच्या चुकीची जाणीव करून देतात आणि त्याला सर्किटची माफी मागायला लावतात. मुन्ना माफी मागण्यासाठी सर्किटकडे जातो आणि पाठमोरा बसलेल्या त्याला आवाज देतो. दुखावलेला सर्किट त्याच्या अचानक येण्याने गडबडून उठतो आणि काही घडलंच नाही असं दाखवतो. सर्किटच्या डोळ्यांत डोळे घालायला कचरणारा मुन्ना त्याची माफी मागतो. वास्तविक सर्किट आतून कितीही तुटलेला असला तरी त्याला मुन्ना‘भाई’ने माफी मागणं पटत नाही. मुन्ना सर्किटला तो किती चांगला आहे, आपण किती वाईट आहोत हे सांगतो आणि सर्किटच्या डोळ्यांतून आसवं वाहू लागतात. शेवटी मुन्ना सर्किटला जादूची झप्पी देऊन सॉरी बोलून टाकतो.
हा संपूर्ण प्रसंग संजय आणि अर्शदने स्वतःहून इम्प्रोव्हाइज केला होता जिथे रिअल लाईफ मुन्ना आणि सर्किटच्या मैत्रीचं दर्शन झालं. मुन्नाच्या आयुष्यातील सर्किटचं महत्त्व अधोरेखित करणारा हा प्रसंग, ज्यात मुन्ना सर्किटच्या प्रेमाची तुलना त्याच्या आईच्या मायेशी करतो. इथे सर्किट मुन्नापेक्षाही वरचढ ठरतो आणि प्रेक्षकांच्या डोळ्यात आलेलं पाणी खूप काही बोलून जातं. अश्यावेळी वाटतं की, “भाई, बोले तो टेंशन नही लेनेका” म्हणत तणावपूर्ण परिस्थितीत मनाला शांत करणारा सर्किटसारखा एकतरी ‘भाई’ प्रत्येकाच्या आयुष्यात असावाच. समोर कुणीही आलं तरी त्याला “ए मामू” म्हणत आपलं काम काढून घेणारा सर्किट नकळत लाईफ मॅनेजमेंटचे धडे देऊन जातो.
प्रत्येकाच्या आयुष्यात असा एकतरी सर्किट असतोच… इसे दोस्त कहे? नही.. छोटा भाई? नही.. फिर क्या? काय म्हणायचं त्याला? भाई आप टेन्शन मत लो म्हणणारा मित्र… ग्यान अपने पास रखके सडाने के बजाय उसे बाँटनेवाला तत्त्वज्ञानी! फुल कॉन्फिडन्समें जानेका और एकदम विनम्रतासे बात करनेका सल्ला देणारा वाटाड्या, मित्र, तत्त्वज्ञानी, वाटाड्या… तो तर प्रत्येकाचाच ‘मितवा’…