‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
….जेव्हा तलत महमूद कमालीचे भावनाविवश झाले!
काही कलावंतांना त्यांच्या कारकिर्दीत, खूप लवकर मनाविरुध्द सक्तीची स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागते. त्या कलावंताना त्या काळी रसिकांना देण्यासाठी त्याच्याजवळ खूप काही असतं पण परिस्थितीच अशी बनते की त्याला कलेच्या दुनियेतून इच्छा नसतानाही बाहेर पडावे लागते. सुप्रसिद्ध गायक कलाकार तलत महमूद यांना देखील अशाच निवृत्तीचा शाप सहन करावा लागला होता. २४ फेब्रुवारी १९२४ साली जन्मलेल्या तलत मेहमूद यांची, खरी कला कारकीर्द बहरली ती पन्नासच्या दशकामध्ये.
अतिशय मखमली आणि हळुवार संवेदनशील स्वरात गाणारा कलावंत म्हणून तलत महमूद (Talat Mahmood) यांना आज देखील ओळखले जाते. ‘जिंदगी देने वाले सुन तेरी दुनियासे दिल भर गया’, ‘रात ने क्या क्या ख्वाब दिखाये’,’ शामे गम की कसम आज गमगी है हम आभी जा आभी जा आज मेरे सनम’,’सीने में सुलगते है अरमान आंखो में उदासी छायी है’,’मेरी याद में तुम न आंसू बहाना’,’ है सबसे मधुर वो गीत’,’ मै दिल हूं एक अरमान भरा’, ’जाये तो जाये कहां’, ‘दिल ए नादान जमाने में मुहोब्बत एक धोका है’, ’तसवीर बनाता हूं तसवीर नही बनती’, ’दो दिल धडक रहे है और आवाज एक है नगमे जुदा जुदा है मगर साज एक है’ या आणि अशा चिक्कार गाण्यांनी तलतने आमचं भावविश्व समृध्द करून टाकलं होतं. पन्नासच्या दशकात तलत त्याच्या क्षेत्रातला अनभिषिक्त असा राजाच होता!
साठच्या दशकामध्ये १९६२ सालच्या ‘जहांआरा’ या चित्रपटात तलतचा स्वर शेवटचा उजळून निघाला. पुढे संगीत क्षेत्रात हा स्वर हळूहळू कमी ऐकायला येऊ लागला. संगीताच्या दुनियेतून त्याची अनपेक्षितपणे पीछेहाट होऊ लागली. याला त्या काळचं राजकारण देखील जबाबदार होते. त्याच्या स्वरात गाणी ध्वनिमुद्रित व्हायची पण नंतर तीच गाणी इतरांच्या स्वरात रेकोर्ड होवून ऐकायला मिळायची. साधारणतः १९७० च्या सुमारास तलत चित्रपटसृष्टीतून पूर्णतः बाहेर फेकले गेले. त्यानंतर त्यांनी स्टेज शो च्या माध्यमातून देश-विदेशात अनेक कार्यक्रम करून रसिकांचे मनोरंजन केले. रसिक त्यांचा स्वर ऐकायला व्याकूळ होतेच त्यामुळे त्यांच्या जाहीर कार्यक्रमाला सत्तरच्या दशकात चांगली मागणी होती. ऐंशीच्या दशकात मात्र तलत मुंबई महानगरीत अक्षरश: रिकामे होते. त्याचा गळा गाता होता, त्याचा आवाज चांगला होता, खूप काही गायची त्याची इच्छा देखील होती पण दुर्दैवाने एकही संगीतकार किंवा चित्रपट निर्माता त्याच्याकडे फिरकत देखील नव्हता.
आता मूळ किस्स्याकडे येउयात. ही घटना साधारणतः १९८५-८६ सालची असेल. त्यावेळी कल्चरल एक्सचेंज या नावाखाली पाकिस्तान मधील काही कलाकार, पत्रकार भारतामध्ये आले होते. त्यातील काही पत्रकारांना तलत महमूद यांना भेटायचे होते. त्यावेळी मुंबईला टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात सप्रे हे संगीतप्रेमी काम करीत होते. त्यांच्यापर्यंत ही वार्ता पोहचली. मग त्यांनी डॉ प्रकाश जोशी यांच्याकडे तलत महमूद आणि पाकिस्तानी पत्रकार यांची भेट घडवून आणण्याचे ठरवले. वेळ ठरली, दिवस ठरला. पाकिस्तानी पत्रकार वेळेच्या आधीच डॉ. जोशी यांच्या घरी जाऊन पोहोचले. काही वेळातच तलत महमूद यांचे आगमन झाले. सर्व पत्रकार ताडकन उठून उभे राहिले आणि त्यांनी तलतला अभिवादन केले.
एखाद्या भक्ताने भगवंताकडे पहावे त्या नजरेने हे सर्व पत्रकार तलत महमूद यांच्याकडे पाहात होते! त्यातील एक पत्रकार तलत महमूद यांना म्हणाला “तलत साहब आमच्याकडे दर ‘जुम्मा’ म्हणजे शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी असते. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे ‘जुमेरात’ गुरुवारी आम्ही संगीतप्रेमी एकत्र जमून जुन्या भारतीय चित्रपटातील गाणी ऐकत असतो. मागच्या वीस वर्षापासून आमचा एकच कार्यक्रम असतो की दर गुरुवारी आम्ही फक्त तुम्ही गायलेली गाणी ऐकतो! आज आमचे भाग्य थोर आहे की ज्यांचे गाणे आम्ही गेले अनेक वर्षे ऐकत होतो त्यांना प्रत्यक्ष ‘रुबरू’ भेटण्याचा ‘मौका’ आम्हाला मिळाला आहे. आम्ही आज धन्य झालो!” हे ऐकल्यानंतर तलत मेहमूद अक्षरश: भारावून गेले. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्याचा गळा भरून आला. ते गदगदलेल्या दाटलेल्या स्वरात डॉ. प्रकाश जोशी यांना म्हणाले “देखो डॉक्टरसाब देखो ये लोग क्या कर रहा है…!”
म्हणजे बघा, ज्या स्वराला शेजारच्या देशात वर्षानुवर्षे रसिक आवडीने ऐकत असतात, त्यांची गाणी ऐकण्यासाठी दर आठवड्याला एकत्र भेटत असतात त्याच स्वराला भारतात अनोळखी बनावे लागते. रसिकांच्या मनात तलत जिवंत होताच पण सार्वजनिक जीवनात तलतला मायानगरी विसरून चालली होती. आणखी दोन वर्षानी तलत महमूद यांची शताब्दी सुरु होईल. त्याला आपल्यातून जाऊन (मृत्यू : ९ मे १९९८) देखील आता २३ वर्ष होताहेत. आज ९ मे तलतचा स्मृतीदिन त्या निमित्ताने तलतचे स्मरण!