लोकप्रिय कथासंग्रहांवर आधारित आठवणीतील मालिका
आठवणीतील मालिका हे सदर लिहिताना काही मालिकांची प्रचंड आठवण आली. या मालिकांमध्ये सलग एक कथा दाखवण्यात आली नव्हती, तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी कथा दाखवण्यात आली होती. या मालिका साप्ताहिक मालिका होत्या. प्रत्येक भागात वेगळी कथा, वेगळे कलाकार त्यामुळे पुढे काय होणार, ही उत्सुकता नसली तरी, या आठवड्यात कुठली कथा असेल, त्यामध्ये कोणते कलाकार असतील याची उत्सुकता असायची. अशाच काही मराठी मालिकांविषयी (Marathi Serials based on Story Books)-
गहिरे पाणी
‘गहिरे पाणी’ ही मालिका झी मराठीवरची (तेव्हा अल्फा मराठी) साप्ताहिक मालिका होती. नेमकं आठवत नाही पण, बहुदा ही मालिका दर शुक्रवारी रात्री ९ वाजता प्रसारित केली जात असे. ‘गहिरे पाणी’ रत्नाकर मतकरी यांच्या याच नावाच्या गूढकथासंग्रहावर आधारित होती. या मालिकेमध्ये गूढकथा दाखवण्यात आल्या असल्या तरी त्या फारशा भीतीदायक मात्र नव्हत्या. अगदी लहान मुलंसुद्धा ही मालिका आवडीने बघत असत.
ज्यांनी हा कथासंग्रह वाचला होता त्यांनाही वाचलेल्या कथा (गूढकथा असूनही) पडद्यावर पाहणं औत्सुक्याचं ठरलं होतं, तर ज्यांनी हा कथासंग्रह वाचला नव्हता त्यांच्यासाठी तर या गूढकथा बघणं हा एक चित्तथरारक अनुभव होता. कौटुंबिक मालिकांच्या जमान्यात थरारक गूढकथा भाव खाऊन गेल्या नसत्या तर नवल होतं.
मालिकेची सुरुवात झाली ती ‘अंधारवाडा’ या कथेपासून. या मालिकेमधली तारीख, स्टेटमेंट, ट्रॅप, खुनी हातमोजे अशा कथा थरारक होत्या. तर वारस, इच्छा देह, ऋणको या कथा दोन भागांत दाखवण्यात आल्या होत्या. रत्नाकर मतकरींच्या लेखनाचे चाहते असणाऱ्या वाचकांच्या मनात या मालिकेबद्दल उत्सुकता निर्माण झाली असेल, तर आत्ताही ही मालिका तुम्ही यु ट्यूबवर बघू शकता.
पिंपळपान
ही मालिका साहित्य जगतातील नामवंत लेखकांच्या साहित्यावर आधारित होती. यामधील कथांना कोणताही एक प्लॉट नव्हता, तर बॅरिस्टर सारख्या साध्य सरळ कथांपासून अनेक प्रकारचं कथानक या मालिकेमधून प्रेक्षकांसमोर आलं. स्वातंत्र्यपूर्व काळातला भारत या मालिकेमधील काही कथांमधून दाखवण्यात आला होता.
या मालिकेमध्ये श्रेयस तळपदे, प्रास ओक, मृणाल कुलकर्णी, अतुल कुलकर्णी यासारख्या अनेक नामवंत कलाकारांनी विविधरंगी भूमिका केल्या होत्या. मालिकेचे सर्व भाग झी 5 या ओटीटीवर उपलब्ध आहेत. तसंच बहुतांश भाग युट्युबवरही उपलब्ध आहेत. ही मालिका झी मराठी (तेव्हा अल्फा मराठी) वाहिनीवर बहुदा सोमवारी रात्री आठ वाजता प्रसारित केली जात असे. (Marathi Serials based on Story Books)
अनोळखी दिशा
‘अनोळखी दिशा’ ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित केली जात असे. ही मालिका नारायण धारप यांच्या याच नावाच्या कथासंग्रहावर आधारित होती. आता धारप म्हटल्यावर यामध्ये भयकथा असणारच, याचा अंदाज मालिकेचे प्रोमोज पाहतानाच प्रेक्षकांना आला होता. दिग्दर्शक महेश कोठारे यांनी ही मालिका दिग्दर्शित केली होती. त्यांची ही पहिलीच हॉरर मालिका होती.
‘अनोळखी दिशा’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये पुस्तकातील काही निवडक कथा दाखवण्यात आल्या होत्या. या मात्र गहिरे पाणी मधील कथांसारख्या केवळ गूढकथा नव्हत्या, तर भयकथा होत्या.
अनोळखी दिशा ही मालिका प्रसारित झाली तेव्हा सास- बहू टाईप मालिकांचा बोलबाला सुरु झाला होता. या मालिकांना कंटाळलेला प्रेक्षक याकडे सहज ओढला गेला. म्हणूनच ही मालिका दैनंदिन मालिका नव्हती. तरीही प्रेक्षकांना मालिका भावली याचं कारण होतं दर्जेदार कथा आणि त्याचं उत्तम सादरीकरण.
===============
हे ही वाचा: या लोकप्रिय मराठी मालिकांचं कथानक नाही ‘ओरिजिनल’; आहेत अन्य भाषांतील मालिकांचे रिमेक
प्रपंच: विभक्त कुटुंबातील मुलांच्या मनात एकत्र कुटुंबाची ओढ निर्माण करणारी मालिका
===============
अलीकडच्या काळात अशा वेगवेगळ्या कथानकांवर आधारित असणाऱ्या मालिका म्हणजे ‘क्राईम शोज’ असं जणू एक समीकरणच झालं आहे. खरंतर ‘अनोळखी दिशा’ मालिकेबद्दल लिहिताना मला ‘आहट या मालिकेबद्दल लिहायचा मोह झाला झाला होता. पण मी प्रकर्षाने तो टाळला. कारण आहट ही मालिका निःसंशयपणे या सदरात लिहिण्यायोग्य नक्कीच आहे. पण मला आवडले होते ते या मालिकेचे सुरुवातीचे काही सीझन्स. अगदी अलीकडेच तीन चार वर्षांपूर्वीपर्यंत ही मालिका सुरु होती. त्यामुळे आठवणीतील मालिका लिहिताना या मालिकेचा समावेश करायचा की नाही, हा प्रश्न मला पडला. (Marathi Serials based on Story Books)
‘आहट’ ही हॉरर मालिकांमधली माझी आवडती मालिका होती, पण अलीकडच्या काळातल्या काही भागांमध्ये मात्र मालिकेचा दर्जा खालावला होता. तरीही सुरुवातीच्या काही सीझन्समुळे ही मालिका आवडत्या हॉरर आणि आठवणीतल्या मालिकांमध्ये नेहमीच अग्रस्थानी राहणार आहे.