लता मंगेशकर यांचे अयोध्येत स्मारक जिथे सतत ऐकू येणार संगीत…
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची 93वी जयंती उत्तर प्रदेशमध्ये अनोख्या पद्धतीनं साजरी करण्यात आली. भारताची गानकोकीळा म्हणून ज्यांचा गौरवानं उल्लेख होतो अशा लता मंगेशकर यांच्या नावानं उत्तरप्रदेशच्या अयोध्येमध्ये एक स्मारक उभारण्यात आले आहे. शरयू नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या एका चौकामध्ये हे गानसम्राज्ञी लता मंगेशकर स्मारक असून त्याचे वैशिष्ट्य म्हणजे भव्यदिव्य विणा. (Lata Mangeshkar Chowk)
लता मंगेशकर यांना विणा प्रिय होती. त्यांची आवड लक्षात घेऊन या चौकामध्ये 14 टन वजन असलेली भव्यदिव्य विणा बसवण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही वीणा पद्मश्री पुरस्कार विजेते राम सुतार यांनी बनवली आहे. दोन महिने ही भव्यविणा तयार करण्यासाठी लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हर्च्युअल उपस्थितीत या गानसम्राज्ञी लता मंगेशकर स्मारकाचे उद्घाटन झाले.
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील नया घाट त्यांच्या नावाने विकसित करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार हा प्रकल्प करण्यात आला. याठिकाणी गायनासंदर्भात अन्य सामुग्रीही बसवण्यात येणार असून लता मंगेशकर यांच्याबाबत एक संग्रहालयही उभारण्यात येणार आहे. लता मंगेशकर यांची श्रीरामावर भक्ती होती. राम मंदिराची पायाभरणी केल्यावर त्यांनी पंतप्रधान मोदी यांना फोन करुन आनंद व्यक्त केला होता.
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगींनी अयोध्येतील एक प्रमुख स्थान असलेला नया घाट त्यांच्या नावाने विकसित करण्याची योजना जाहीर केली होती. त्यानुसार ही प्रकल्प विकसीत करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी पद्धतीनं या स्मारकाचे उद्घाटन केले. (Lata Mangeshkar Chowk)
शरयू नदीच्या काठावर वसलेला हा नवीन घाट परिसर आता ‘लता मंगेशकर चौक’ म्हणून ओळखला जाईल. या सर्वांसाठी अंदाजे 7.9 कोटी रुपये खर्च झाला आहे. या स्मारकाचे मुख्य आकर्षण म्हणजे भव्य वीणा. या भव्यदिव्य विणेचे वजन 14 टन असून लांबी 40 फूट आणि उंची 12 मीटर आहे. ही वीणा पद्मश्री पुरस्कार विजेते राम सुतार यांनी बनवली आहे. ही विणा बनवण्यासाठी त्यांना दोन महिने लागले. या वीणेमध्ये देवी सरस्वतीचे चित्रही आहे. हे स्मारक पर्यटकांसाठी आणि संगीत प्रेमींसाठी एक प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
या सर्व परिसरात कायम लता मंगेशकर यांची गाणी आणि वाद्यवृदांची धून ऐकता येणार आहे, अशी संकल्पना असलेला हा बहुधा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. आता या स्मारकात कायम लता मंगेशकर यांची भजनं गुंजणार आहेत. 70 कारागिरांनी मिळून ही 14 टन वजनाची वीणा बनवली आहे. वीणा कांस्य आणि स्टेनलेस स्टीलपासून बनवली गेली आहे. त्यावर मोराची चित्रेही कोरलेली आहेत. वीणासोबत इतर शास्त्रीय वाद्येही या स्मारकात ठेवण्यात आली आहेत. (Lata Mangeshkar Chowk)
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे व्यवस्थापन अयोध्या विकास प्राधिकरणाचे सचिव सत्येंद्र सिंह यांनी केले आहे. जगातील एक उत्कृष्ट संगीत स्मारक म्हणून या लता मंगेशकर स्मारकाचा आणखीही विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या सोहळ्यात पंतप्रधान मोदी लता मंगेशकर यांच्या आठवणीनं भावुक झाले होते. पंतप्रधान मोदी म्हणाले की, लताजी, माँ सरस्वतीच्या साधिका होत्या. त्यांनी आपल्या दैवी आवाजाने संपूर्ण जगाला थक्क केले. अयोध्येतील लता मंगेशकर चौकात स्थापित केलेली माँ सरस्वतीची विशाल वीणा, संगीत ध्यानाचे प्रतीक बनणार आहे. अयोध्या शहरासोबत लतादीदींचे नाव कायमचे जोडले गेले आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
लतादीदींना राम मंदिराच्या उभारणीमुळे खूप आनंद झाला होता याबद्दल पंतप्रधानांनी सांगितले. याबाबत आठवण सांगतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, राम मंदिराच्या उभारणीचे भूमिपूजन पूर्ण झाले तेव्हा मला लतादीदींचा फोन आला. त्या खूप आनंदी, भावूक झाल्या होत्या. राम मंदिराचे बांधकाम सुरू होत आहे यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. त्यांनी मला खूप आशीर्वाद दिले. आज त्यांच्याच आवाजातील रामाचे भजन आठवत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.(Lata Mangeshkar Chowk)
========
हे देखील वाचा : राजू श्रीवास्तव: वेळप्रसंगी रिक्षाही चालवली, पण निर्णयावर ठाम राहिले
========
या स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी लता मंगेशकर यांच्या कुटुंबियांनाही आमंत्रण करण्यात आले होते. त्यांचे पुतणे आदिनाथ, मुख्यमंत्री योगी, केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी लताजींची गाणी शास्त्रीय गायिका सावनी रवींद्र यांनी सादर केली. विशेष म्हणजे लता मंगेशकर चौकाच्या बांधकामाबाबत तीन मिनिटांचा छोटा व्हिडिओ दाखवण्यात आला आणि या चौकाच्या पुढच्या विकासाच्या योजनाही सांगण्यात आल्या.
– सई बने