ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
‘सिंघम रिटर्न्स’ फेम संध्याचा अंदाज सदैव ‘स्पेशल’च
एकदा संध्याला (Sandhya Kute) एका गाजलेल्या मालिकेसाठी बोलवणं आलं. ती शूटिंगस्थळी गेली. तिथं नावाजलेले कलावंत होते. दिवसभर त्या कलावंतांसोबत नुसतंच इकडे-तिकडे फिरणं झालं. आपली भूमिका नेमकी काय, हे तिच्या लक्षातच येत नव्हतं. बस्स, त्या कलावंतांसोबत वावरायचं होतं. तिथं आणखी एक ज्येष्ठ कलावंत होता. तो संध्याचं निरीक्षण करीत होता. तो म्हणाला, “प्लीज डोंट डू धिस. तू यासाठी बनलेली नाहीयेस.”
संध्याला आश्चर्य वाटलं. त्या कलाकारानं सांगितलं, “कुणी शूटसाठी बोलवलं म्हणजे जायचंच असं नाही. आपल्या भूमिकेविषयी, दिग्दर्शक कोण, सहकलाकार कोण, विचारायचं असतं. असंच स्वत:ला वाया घालवायचं नाही.” तेव्हा तिला कळलं, की ही प्रोसिजर असते. शिवाय, आपण ‘स्पेशल’ आहोत. म्हणूनच तर त्या कलाकारानं आपली एवढी दखल घेतली, याची जाणीवही तिथं अधिक प्रकर्षानं झाली होती.
संध्या कुटे… ‘सिंघम रिटर्न्स’मध्ये लेडी कॉपची तिची एंट्री जबरदस्त आहे. अमिताभ बच्चन यांच्यासह ‘स्वच्छ भारत अभियान’ तसेच ‘केबीसी’ यांसह बऱ्याच जाहिराती, काही मालिका, ‘सिम्बा’, ‘कैदी बँड’, ‘सर्व लाइन व्यस्त आहेत’ यासारखे चित्रपट, कित्येक शॉर्टफिल्म्स तिच्या नावावर आहेत. माध्यम विश्वातून सुरू झालेला तिचा प्रवास आता मनोरंजनक्षेत्र व्यापू पाहात आहे. अपघातानंच या क्षेत्रात ती आली असली तरी आज भूमिकांसाठी तिचा विचार होतो आहे. (Success story of Sandhya Kute)
मनोरंजनक्षेत्रात जायचं, हे संध्याच्या कधी गावीही नव्हतं. पण, नशीब तिला या क्षेत्रात घेऊन आलं. ‘लोकमत’, ‘सकाळ’ या वृत्तपत्रांत इव्हेंट्सची कामं केली. ‘सकाळ’मध्ये असताना मुलगी स्तुती दहा वर्षांची होती. त्यामुळे तिच्याकडे लक्ष देणं गरजेचं होतं. म्हणून तिनं नोकरी सोडायचं ठरवलं. मात्र, परफॉर्मन्स चांगला होता. त्यामुळे “जॉब सोडू नकोस, हवं तर सहा महिने सुटी घे”, असं वेळोवेळी प्रोत्साहन देणाऱ्या श्रीकांत हिरवे, विनायक पात्रुडकर यांनी समजावून पाहिलं. मात्र, सहा महिने जागा अडवून ठेवणं संध्याला पटलं नाही. पती संदीप इंजिनीअर आहेत. ते टेलिकॉम इंडस्ट्रीत काम करतात. स्तुतीला ते चांगले सांभाळायचे. मात्र, त्यांच्या एकट्यावरच किती ताण द्यायचा, असा विचार संध्यानं केला होता.
दिवस पुढं जात होते. एकदा कुणीतरी संध्याला सांगितलं, “मुंबई दूरदर्शनला निवेदक हवे आहेत, ट्राय कर.” तिनं शरण बिराजदार यांच्याशी संपर्क साधला. ते ‘सांगतो’, एवढंच म्हणाले. साधारणत: महिनाभरानंतर त्यांचा कॉल आला. “सीरियल करणार का, २२ वर्षांच्या मुलीच्या मॉडर्न आईची भूमिका आहे”, असं त्यांनी विचारलं. पण, आजपर्यंत संध्यानं फक्त स्टेजवर निवेदन केलं होतं. कधी कॅमेऱ्याशी संबंध आला नव्हता. अभिनयातलं फारसं काही कळतही नव्हतं. मात्र, बिराजदारांनी भेटायला बोलवलं.
संध्या तिथं गेली तेव्हा विशाखा सुभेदार, अभय कुळकर्णी आदी कलावंत बसले होते. त्या सर्वांनी धीर दिला. कॅमेरा सुरू झाला. मात्र, त्याचं तंत्र तिला कळत नव्हतं. टेकवर टेक होत होते. तिला रडूच आलं. “मला हे जमणार नाही, माझ्यामुळे इतर कलावंतांचा उगाच खोळंबा होतोय”, असं तिनं सांगितलं. मात्र, सर्वांनी, “सात दिवसांत रुळशील, काळजी करू नको”, अशा शब्दांत तिला समजावलं. अखेर तिला ते जमलं. ती सीरियल होती, ‘आतला आवाज.’ (Success story of Sandhya Kute)
त्यानंतर दूरदर्शनच्याच ‘कृषिदर्शन’ कार्यक्रमासाठी तिनं निवेदन केलं. मात्र, ते ‘लाइव्ह’ नसावं, अशी तिची अट होती. एकदा तर धमालच झाली. मुंबई दूरदर्शनवरच्या सायंकाळी सात वाजताच्या बातम्यांसाठी संध्याला बसवलं. त्यावेळी टेलिप्रॉम्टरसाठी नीट ठेवलेल्या कागदांची तिच्याकडूनच गडबड झाली. बातमी पहिली अन् व्हिज्युअल दिसले सातव्या बातमीचे. अर्थात, तिनं ते तिथल्यातिथं सांभाळून घेतलं. मात्र, कॅमेऱ्यासमोर ‘लाइव्ह’साठी आपण तयार नाही, हे तिला कळून चुकलं होतं.
त्याचदरम्यान ठाण्यात स्मिता तळवलकर यांचं वर्कशॉप सुरू होतं. संध्यानं तिथं प्रवेश घेतला. तिथं एक काका भेटले. त्यांनी विचारलं, “बेटा, नाटक करशील का?” संध्यानं सांगितलं, “नाटक कधी केलं नाही, फक्त एक सीरियल केली आहे.” त्या काकांनी अशोक समेळ यांचा नंबर दिला. ते ‘एका अरुणाची गोष्ट’ नाटक बसवत होते. (Success story of Sandhya Kute)
ठाण्यात टेंभी नाक्याला रिहर्सल सुरू होती सोबतही ट्रेनिंग सेशनही चालू होतं. अरुणाची मैत्रीण उषाची भूमिका संध्याला मिळाली. त्यानंतर अशोक समेळ यांनी ‘अश्रूंची झाली फुले’ करायचं ठरवलं. त्याचे ५१-५२ प्रयोग करण्याचं ठरलं होतं. त्यात संध्यानं नीलमची भूमिका साकारली. हे सगळं सुरू असताना मालिका, जाहिरातींच्या ऑफर्स सुरू झाल्या. हिंदीत बालाजी टेलिफिल्म्सच्या ‘बडे अच्छे लगते हैं’ सीरियलमध्ये इन्स्प्टेक्टरचा रोल मिळाला.
असा मिळाला ‘सिंघम रिटर्न्स’
संध्याकडे नाटकं, मालिका, जाहिराती, चित्रपटांच्या ऑफर्स खूप येत होत्या. मात्र, मुलीकडे लक्ष द्यायचं म्हणून बऱ्याच कामांना नकार द्यावा लागत होता. कारण, लवकरच मुलीची दहावी येणार होती. मुंबईतल्या मुंबईत काम असेल तर ठीक, मुक्कामी शेड्युल असलं की अडचण व्हायची. तिनं मुलीच्या संगोपनाला महत्त्व दिलं.
याचदरम्यान, रोहित शेट्टीच्या ग्रुपमध्ये काम करणाऱ्या उमाकांत पाटील, आशिष वारंग या दोन मित्रांनी संध्याला सांगितलं, “तातडीनं तुझे पोलिस युनिफॉर्ममधील फोटो पाठव.” संध्यानं ते पाठविले. चारच दिवसांनंतर रोहित शेट्टींची प्रमुख सहकारी विधीचा कॉल आला. “ऑडिशनला येऊ शकता का”, असं विचारलं. त्यावेळी संध्या सह्याद्री वाहिनीवरच्या एका मालिकेचं शूट करत होती. विधी जे म्हणतेय, तो रोहित शेट्टीचा प्रोजेक्ट आहे वगैरे हे तिच्या ध्यानीही नव्हतं. मात्र, तिनं संध्याला ऑडिशनस्थळाचा मेसेज पाठविला तेव्हा तिला धक्काच बसला. तिनं मालिकेच्या दिग्दर्शकाला विनंती करून ऑडिशनला जाण्याची परवानगी मागितली.
ती ऑडिशनला गेली. दया अर्थात दयानंद शेट्टीसोबतची ती डॅशिंग भूमिका होती. मालाडच्या बॅकयार्डमध्ये शूट ठरलं होतं. ऑडिशन देऊन संध्या घरी परतली. मात्र, आठवडाभर काहीच निरोप आला नाही. त्यामुळे धाकधूक वाढली. कदाचित, दुसऱ्या कुणाला निवडलं असेल, असंही वाटलं. मात्र, दहाव्या-बाराव्या दिवशी विधीचा कॉल आला. तिनं संध्याला डिटेल्स पाठवायला सांगितले. नंतर कळलं, हैदराबादला शूट होतं, विमानाच्या तिकिटांसाठी विधीनं डिटेल्स मागितले होते.
संध्याला गगनच ठेंगणं झालं. दया, पंकज त्रिपाठी यांच्यासोबतचं सुरुवातीच्या टप्प्यातील आठ-दहा दिवसांचं, नंतर एका दिवसाचं शूट होतं. प्रकाश रावच्या भूमिकेतील झाकीर हुसैनला श्रीस्वरा भर स्टेजवर थापड मारते. नंतर तिला अटक करण्यासाठी लेडी कॉपला बोलवण्यात येतं, असा तो गाजलेला सीन आहे. यानंतर रोहित शेट्टीच्याच ‘सिम्बा’मध्येही तिला भूमिका मिळाली. सुरुवातीला या भूमिकेत तिला फारसा दम वाटला नाही. त्यामुळे ती नकार देणार होती. मात्र, रोहित शेट्टीच्या चित्रपटात संधी सोडायची नसते, असं कित्येकांनी तिला समजावलं अन् तिनं ही भूमिका केली. (Success story of Sandhya Kute)
“रोहित शेट्टीचं युनिट म्हणजे एक कुटुंब आहे. युनिटमधली प्रत्येक व्यक्ती चांगली, काळजी घेणारी आहे. रोहित यांना कामावेळी कामच लागतं. सेटवर कमालीची शिस्त असते. मी पहिल्यांदा सेटवर गेले तेव्हा समोर अजय देवगण, रोहित शेट्टी यांना पाहून धास्तावले. मात्र, रोहित शेट्टी खुर्चीवरून उठले, ‘हॅलो मॅम’ म्हणून शेकहॅंड करत स्वागत केलं. तिथं मी रिलॅक्स झाले. रोहित सरांसह युनिटमधले सगळे ‘डाउन टू अर्थ’ आहेत”, असं संध्यानं नमूद केलं. यानंतर यशराज फिल्म्सचा ‘कैदी बँड, मराठीतला ‘सर्व लाइन व्यस्त आहेत’ हेही चित्रपट तिने केले.
नकारात्मक भूमिका अधिक भावतात
“नकारात्मक भूमिका अधिक आव्हानात्मक असतात”, असं संध्या म्हणते. कलर्स मराठीवरच्या ‘सोन्याची पावलं’ या मालिकेतील तिची छबूची भूमिका चांगलीच गाजली. “त्यावेळी नात्यातल्या बायका माझ्या नावानं ओरडायच्या”, असा अनुभव ती सांगते. ‘श्रीगुरुदेवदत्त’, ‘अलमोस्ट सफळ संपूर्ण’ या मालिकांतही तिच्या नकारात्मक भूमिकाच होत्या. मराठीपेक्षा हिंदीतून जास्त ऑफर्स आल्या. ‘क्राइम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’चेही तिनं बऱ्यापैकी एपिसोड्स केले. अल्ट बालाजीच्या ‘होम’ वेबसीरिजमधील तिची इन्सपेक्टरची भूमिका प्रभावी होती. यात ती सुप्रिया पिळगावकरसोबत होती.
‘क्रांती होश में नही’ चांगला अनुभव
राज्य नाट्यस्पर्धेसाठी प्रशांत निगडे लिखित-दिग्दर्शित ‘क्रांती होश में नही’ या नक्षलवादावर आधारित नाटकात तिनं महिला नक्षली कमांडर अम्माची भूमिका केली. या भूमिकेला बरेच शेड्स असल्यानं ती आव्हानात्मक होती. या नाटकाला तीन पुरस्कार मिळाले. याच नाटकाची प्रशांतनं पुढं ‘अवनी’ नावानं एकांकिका बनवली. मात्र, पुढं संध्यानं ते कंटिन्यू केलं नाही. कारण व्यावसायिक गरजा सांभाळायच्या होत्या. या नाटकासाठी म्हणून तिनं बाकीच्या ऑफर्स स्वीकारल्या नव्हत्या. ‘मात्र, या नाटकानं बरंच समाधान दिलं. असं असलं तरी अम्माचं पात्र माझ्यावर भारी पडत होतं. मी तशीच विचार करायला लागले होते. नाटक सोडण्याचं तेही एक कारण होतं’, असं संध्या सांगते. (Success story of Sandhya Kute)
दमदार वकील साकारायचाय…
संध्या भूमिका स्वीकारण्याबाबत कमालीची चोख आहे. भूमिका छोटी असली तरी चालेल; मात्र आपला ‘स्क्रीन प्रेझेन्स’ असलाच पाहिजे, असं तिचं पक्कं तत्त्व आहे. भविष्यात एखाद्या दमदार वकिलाची भूमिका साकारायची तिची इच्छा आहे. “या क्षेत्रात गॉडफादर-गॉडमदर नाही. सगळं स्वत:च्या हिमतीवर करावं लागलं. तरी या प्रवासात माणसं चांगली भेटली, कामाच्या भरवशावरच इतर कामं मिळाली. काही वाईट अनुभवही आलेत. मात्र, ‘काय करायचं नाही’, हे स्वत:चं स्वत:ला ठरवता आलं पाहिजे. मी कधी नखरे केले नाहीत, त्यामुळे मलाही चांगली वागणूक मिळाली”, असं संध्या आवर्जून नमूद करते.
=================
हे ही वाचा: मराठी संस्कृतीचं ‘बॉलिवूडकरण’ होतंय का?
इस बिल्डींग में एक ही मर्द है, और वो है स्मिता तळवलकर
=================
आता मुलगी स्तुती मोठी झालीय. तिचं ग्रॅज्युएशनही पूर्ण झालंय. ती जॉबही करतेय. त्यामुळे संध्या कामाच्या बाबतीत जरा निर्धास्त आहे. ‘राधा-कृष्ण’ मालिकेचं शूट करून ती गुजरातवरून नुकतीच परतली आहे. अवयवदानावर आधारित ‘लाइफलाइन’ हा चित्रपट तसेच ‘वास्तुरहस्य’ ही हिंदी वेबसीरिज, अन्य तिच्या काही सीरिज व चित्रपट येऊ घातले आहेत.
सिंधुताई सपकाळ संध्याला विशेष प्रभावित करतात. दु:ख सोसूनही त्यांच्यासारखं ‘लाइव्ह’ राहता आलं पाहिजे. त्यांचा डोक्यावरचा पदर, साधेपणा, त्यांचं हसणं, ‘लेकरा’ म्हणून हाक मारणं खूपच भावलंय. आजही त्या ऊर्जेचा स्रोत आहेत, असं संध्या सांगते. (Success story of Sandhya Kute)
संध्या अपघातानंच या क्षेत्रात आली असली तरी आपल्या भूमिकेनं पडदा व्यापण्याची ताकद तिच्यात आहे. यशाचे टप्पे ती पार करत असली तरी कमालीची नम्र आणि जमिनीवर आहे, माणुसकीवर विश्वास ठेवणारी आहे. संध्यासमयीच आसमंतात तारे अधिक खुलून चमकत असतात. आपले कलागुणरूपी तारे ही संध्या सामावून आहे, तिचा आसमंत लखलखतो आहे.